७/२७/२०२४

कढीपत्त्याची चटकदार खमंग सुक्की मिक्स्ड पूड चटणी (पोडी)

 

कढीपत्त्याची चटकदार खमंग सुक्की मिक्स्ड पूड चटणी (पोडी)

प्रास्ताविक

१८ वर्षांपूर्वी, २००६ साली आम्ही पर्यावरणास आपलाही हातभार लागावा या उद्देशाने आमच्या ८९ (१९३५ मध्ये बांधलेला) वर्षांच्या लोड बेअरिंग पद्धतीने बांधलेल्या तीन मजली जुन्या वाड्याच्या गच्चीवर, आपल्याच घरात आपणच निर्माण करत असलेल्या सर्व प्रकारच्या जैविक कचऱ्याचा पुनर्वापर करून त्यापासून मिथेन हा ज्वलनशील गॅस निर्माण करणाऱ्या अपारंपारिक ऊर्जा निर्मिती करणाऱ्या बायो-गॅस संयंत्राची उभारणी केली होती.

यासंयंत्रात तयार होणाऱ्या मिथेन वायूच्या पूरक (Supplementary) वापरामुळे आमचा एलपीजी गॅस नेहमीपेक्षा २०-२५ दिवस जास्त जात असल्याने महिना ५५० ते ६०० रुपयांची बचत सुद्धा होते.

या मिथेन वायुला प्रेशर नसते व टाकीत हा मिथेन वायु जसजसा साठत जातो तसतशी टाकी वर वर जाते. त्यातील मिथेन वायु उताराकडे वाहत असल्याने गच्चीवरील टाकीतला गॅस खालच्या तिसऱ्या  मजल्यावरच्या आमच्या स्वयंपाक घरातील बायो-गॅस स्टोव्ह कडे ग्रॅव्हिटीने येत असल्यामुळे त्याला एलपीजी गॅस सारखे प्रेशर नसते. गॅसच्या आंच  मंद असते. म्हणूनच त्याचा फक्त पूरक महाणूनच वापर करता येतो ( उदा. दूध तापवणे,तूप काढवणे,मसाले,भाजणी, व कोरड्या चटण्यांसाठी मंद आंचेवर धान्य भाजणे,फोडणी झाल्यावर भाज्या शिजवणे ई. साठी)

तसेच २००८ पासून आम्ही आमच्या वाड्याच्या गच्चीत ,जैविक कचऱ्यापासून आम्ही घरीच कंपोस्ट पद्धतीने  बनवलेल्या काळ्या सोन्याचा  वापर करून माती विरहित बाग सुद्धा फुलवली आहे.

या बागेत आम्ही दैनंदिन वापरासाठी आवश्यक अशा  कढीपत्ता,गवती चहा,पुदिना,मिरच्या,कोथिंबीर, लिंबू,आले,हळद,लसूणपात अशा भाजीपाल्याचेही नियमित उत्पन्न घेत असतो.

काल आमच्या या बायो-गॅस ची टाकी मिथेन वायूच्या साठवणीमुळे खूपच वर गेली होती.

पावसामुळे आमच्या बागेतील कढी-पत्ता सुद्धा चांगलाच फोफावलाय.

त्यामुळे माझ्या मनात आले की आपण आपल्याच बागेतल्या कढीपत्त्याची पाने व लसूणपात यांचा वापर करून आपल्याच बायोगॅस शेगडीच्या मंद आंचेवर सर्व घटक पदार्थ भाजून घेऊन कढीपत्त्याची चटकदार खमंग चटणी करू या .

आणि हा विचार मी लगेच अंमलात आणून छान चटणी बनवली.त्याचीच ही सचित्र रेसिपी मी आता येथे तुमच्याबरोबर शेअर करत आहे.

 

साहित्य : दोन वाट्या गांवरान  कढीपत्ता, एक वाटी फुटाण्याचे डाळं , अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे, एक टेबलस्पून उडीद डाळ,एक टेबलस्पून हरभरा डाळ, चवीनुसार ८-१० लाल सुक्या मिरच्या व मीठ , एक चमचा जिरे,५-६ लसणाच्या पाकळ्या , पाव चमचा हळद, हिंग ,चिंचेचे  बुटुक ,एक टेबलस्पून तेल

कृती : कढीपत्त्याची पाने  धुवुन कोरडी करून घेऊन थोड्याश्या  तेलावर हिंग टाकुन परतून  घ्यावीत, डाळं ,सुके खोबरे,उडीद डाळ,हरभरा डाळ,जिरे अन तीळही त्याच कढईत भाजावे,लालसुक्या मिरच्या ,लसणाच्या पाकळ्या व  मिठही परतुन घ्यावे. नंतर सर्व एकत्र करुन त्यात हळद,हिंग व चिंचेचे बुटुक घालून  मिक्सरमध्ये वाटावे अन एखाद्या हवाबंद काचेच्या बरणीत भरावे. 

ही कढीपत्त्याची चटणी आयत्यावेळी दह्यात कालवुन व फोडणी घालून छान लागते.किंवा नुसत्या चटणीवर गरम लसणाची फोडणी घालूनही चपातीबरोबर खायला द्यावी.















टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search