७/२३/२०२४

ज्वारीच्या पिठाचे चविष्ट आप्पे

 

ज्वारीच्या पिठाचे चविष्ट आप्पे


 

आज पहाटे पहिला चहा घेतांना सौं नी मला विचारले आज नाष्ट्या साठी काय करू ?

मी थोडासा विचार करून तिला म्हटले, आज नाष्ट्यासाठी आपण एक नविनच डिश करून पाहू. तिचे नांव आहे ‘ज्वारीच्या पिठाचे आप्पे ‘

आमचा हा एक नवा प्रयोग असल्यामुळे मी तिला म्हटले की, आगोदार तू फक्त एकच घाणा काढ. आप्प्यांची चव बघू या. चांगले नाही झाले तर त्या पिठातच थोडे पाणी घालून डोसे / धिरडी करता येतील.

मग सौं नी ११ आप्प्यांचा एक घाणा काढला.

आप्पे चविष्ट व खूपच छान झाले होते.

मग मी मोबाईलवर त्यांचा एक फोटो काढला आणि रेसिपी लिहून काढली.

तीच आता येथे तुमच्या सोबत शेअर करत आहे.

साहित्य : एक वाटीभर ज्वारीचे पीठ,दोन टेबलस्पून आंबट दही,चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा व मीठ, गाजराचा कीस, बारीक चिरलेला कोबी आणि कांदा आप्प्यांसाठी आवश्यक तेल.

कृती : ज्वारीच्या पिठात आंबट दही,व पाणीघालून दोन तास भिजत घालून ठेवले. दोन तास छान मुरल्यावर त्यात हिरव्या मिरचीचा ठेचा , मीठ, गाजराचा कीस, बारीक चिरलेला कोबी आणि कांदा घालून चांगले रूबवून घेतले.

दुसरीकडे गॅसवर आप्पे चा ११ कप्पे असलेला नॉनस्टिक तवा तापायला ठेवला. तवा चांगला तापल्यावत्या प्रत्येक कप्यात चमच्या ने थोडे थोडे तेल सोडून ,दुसर्‍या चमच्याने आप्प्याचे पीठ घातले आणि झाकण ठेवले . ५ मिनिटांनी झाकण काढून चमच्या आप्पे उलटे करून घेतले व पुन्हा थोडेसे तेल घातले.

दोन्ही बाजूंनी आप्पे चागले शिजल्यावर आणि फुगून गोलाकार झाल्यावर बाहेर काढून पेपर नॅपकीनवर ठेवले.

गरमा-गरम टप्पोरे आप्पे दही-साखरे सोबत खायला दिले.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search