१२/२४/२०२२

दलियाचा झटपट कुरडयाचा चिक

 #दलियाचा झटपट कुरडयाचा चिक




माझ्या सिगनेचर रेसिपीमधील अजून एक रेसिपी म्हणजे गव्हाचा चिक ही होय. बाजारात वाण्याच्या (Grocery -Provisional Stores) दुकानांत ‘ दलिया ‘ नावाने गव्हाचा भरड असा रवा मिळतो. (त्याचा तिखट-मिठाचा सांजा / उपमा किंवा गोडाची खीर बनवतात) याच दलियाचा वापर करून झटपट कुरडया किंवा शिजवलेला चिकही बनवता येतो व तो खायला लागतोही खूपच छान. मला तर तो चिक इतका जबरदस्त आवडतो की मी दरवर्षी पूर्वी आईच्या आणि लग्नानंतर बायकोच्या मागे सतत भुणभुण करून किमान दोन तीनदा तरी हा चिक हट्टाने करून घेतोच. [#रेसिपी साहित्य: दोन मोठ्या वाट्या गव्हाचा दलिया, एक चमचा मीठ, तुरटीचा छोटासा खडा व पाणी कृती : दोन मोठ्या वाट्या (२५० ग्रॅम) दलिया भिजत घालावा. दुसऱ्या दिवशी त्याला आंबूस वास येईल. असे झाल्यास तो कुरडया करण्यास योग्य आहे असे समजावे. तो पुरेसा आंबला नसेल तर आणखी एक दिवस भिजत ठेवून पुरेसे आंबलेला वाटल्यावर तो एकदा मिक्सरवर एकदा फिरवून घेऊन प्लास्टिकच्या गाळणीने गाळून घ्यावा. असेच पुन्हा दोन वाट्या पाणी टाकून पुन्हा गाळणीने गाळून घ्यावे. आता दलिया हाताला मोकळा लागतो. गाळून घेतलेले सत्त्व एकसारखे ढवळून घ्यावे. जाड बुडाच्या पातेल्यात अथवा हिंडालियमच्या कढईत अर्धी वाटी पाणी, त्यात आवश्यकतेनुसार थोडे मीठ , हिंग व जिरेपूड आणि कुरड्या पांढर्‍या शुभ्र व्हाव्यात म्हणून अर्धी चिमुट तुरटी पावडर घालून ते पाणी उकळावे. उकळी आली की त्या पाण्यात गव्हाचे सत्त्व टाकून चांगले हलवून पातेल्यावर ताटलीचे उताणे झाकण ठेवावे. ताटलीत थोडे पाणी ठेवावे. असे ताटलीत पाणी ठेवल्याने खालून व वरुन असा दोन्हीकडून वाफेची उष्णता मिळून शिजण्यास मदत होते. पाच ते दहा मिनिटांनी झाकण काढून पुन्हा चांगले हलवून गॅस बंद करावा. एका मोठ्या प्लॅस्टिकच्या कागदावर सोर्‍याने कुरडया घालाव्या. (मध्यम आकाराच्या आठ ते दहा कुरडया होतील.) कडकडीत उन्हात वाळवून ठेवाव्यात. हवे तेव्हा तळाव्यात.शिजवलेला चिकही गरम असताना साजूक तूप घालून खायला उत्तम लागतो. ता.क. : आजचा चिक हा स्ट्रॉबेरी रंगाचा आणि फ्लेवरचा बनवला आहे. कालच तांदुळाच्या ओल्या पापड्या (फेणया) खाऊन झाल्या मग आज हा चिक मनसोक्त खाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search