१२/२३/२०२२

तांदुळाच्या ओल्या फेण्या (पापड्या)

 तांदुळाच्या ओल्या फेण्या (पापड्या)

आज सकाळी नाष्टा म्हणून लहानपणी खूप खाल्लेल्या वाफावलेल्या तांदळाच्या ओल्या पापड्या (यांनाच कोकणात व गोव्यात फेण्या असेही म्हणतात) केल्या होत्या. दहा वर्षांपूर्वी नोटा बंदी असतांना या आवडत्या पापड्यासाठी मुद्दाम तुळशिबागेत जाऊन एक स्टेनलेसस्टीलचा १२ प्लेट्सचा पापड्यांचा स्टँड खरेदी केला होता. (पूर्वी आमच्या बालपणी आमची आई रॉकेल तेल, गोडे-तेलाच्या लोखंडी डब्याची व हिंगाच्या पत्र्याच्या डब्यांची झाकणे वापरत असे)
त्याचीच ही रेसिपी
साहित्य : दोन वाट्या तांदुळ,एक टेबलस्पून खसखस,चवीनुसार मीठ,भरडलले जिरे,वाटीभर दही.
कृती : सुरवातीला तांदुळाच्या कण्या धुवून घ्याव्यात. एका पातेल्यात तांदुळाच्या कण्यांच्या दुप्पट पाणी घेऊन त्यात तांदूळ भिजत घालून तीन दिवस या तांदुळाच्या कण्या तशाच झाकून ठेवाव्यात.(पाणीसुद्धा बदलू नये)
तिसर्या दिवशी कण्यांना आंबूस वास येऊ लागतो.
तांदूळाच्या कण्या आंबण्यास सुरवात झाली की चौथ्या दिवशी या तांदुळाच्या कण्या स्वच्छ पाण्याने धुवाव्यात. धुतलेल्या तांदुळाच्या कण्या चाळणीवर गाळून त्यातील पाणी काढून घ्यावे (नंतर ते डायल्युट करून बागेतील कुंड्यांमध्ये टाकावे) व मिक्सर ग्राइंडर वर वाटून घ्याव्यात. वाटताना त्यात अजिबात पाणी घालू नये. त्या घट्टच वाटाव्यात.हे वाटलेले तांदुळाच्या कण्यांचे पीठ नेहमीच्या इडलीच्या पिठाइतके घट्ट असावे.
नंतर त्यात चमचाभर खसखस,चमचाभर भरडलेले जिरे आणि चवीनुसार मीठ घालून ढवळून छान पातळ पीठ करावे. हे झाले फेण्यांचे पीठ (batter) तयार.
आता या पिठाच्या ओल्या फेण्या करायच्या वेळी प्रथम स्टँड मधील ताटल्यांना दह्याचा किंवा तेलाचा हात लावून घ्यावा. नंतर ताटल्यांवर डावाने ओले पीठ (batter) पसरून घालावे एका स्टँड मध्ये ६ ताटल्या मावतात. ताट्ल्यांवर पसरून घातलेले पीठ (batter) खूप जाड अथवा खूप पातळ असू नये.
ढोकळ्याच्या /इडल्यांच्या कुकर मध्ये ,आणि तो कुकर नसेल तर एका मोठ्या पातेल्यात मध्ये तळाशी पाणी घ्यावे व ते पातेले गॅसवर त्यात पाणी उकळण्यासाठी ठेवावे.
पातेल्यातील पाण्याला उकळी आली की फेण्यांच्या ताटल्यांचा स्टँड पातेल्यात ठेवावा व झाकण लावावे.
१० - १५ मिनिटांनी झाकण काढावे व गरम गरम फेण्या ताटल्यावरून सुई किंवा सूरीचा वापर करून सोडवून काढाव्यात आणि दह्याबरोबर किंवा पूड चटणी बरोबर सर्व्ह कराव्यात.
काही महत्वाच्या सूचना :
१) फेण्या करण्यासाठी तांदूळ / कण्या आंबणे खूप गरजेचे आहे.
२) आवडत असल्यास या पिठाला तुम्ही मिरची-कोथिंबीचे वाटण (पेस्ट) लावू शकता.
३) या फेण्यांचा स्टँड भांड्यांच्या दुकानात मिळू शकेल. पुण्यात तुळशीबागेत तर नक्कीच मिळायला हावाच. मी स्टेनलेस स्टीलचा १२ प्लेटचा स्टँड तेथूनच २००८ मध्ये ४०० रुपयांना खरेदी केला होता.
४) हवा असेल तो खाद्य रंग पिठात घालून तुम्ही रंगीत पापड्याही बनवू शकाल.
Vasant Shahane, Vandana Purohit and 9 others
3 comments
Like
Comment
Share

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search