११/१६/२०१९

जेजुरी-खंडोबा मंदिर



जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आरध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले आणि सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले.

निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिक रित्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.

गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.


देऊळ व परिसर
जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता. दुर्दैवाने शिखर-शिंगणापूर तीर्थक्षेत्राप्रमाणेच येथेही दाक्षिणात्य शैलीचे या वास्तूशी पूर्ण विशोभित शिखर नव्याने बांधण्यात आले आहे. देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत.

देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे. यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात. चांगभले खंडोबांचा येळकोट असा जयघोष करीत या भंडाऱ्यांची उधळण होते. तळि भरणे हा एक विधी असतो. ताटात खोबरे व भंडारा घ्यावयाचा, पूजा करून तळि त्रिवार डोक्यावर घ्यावयाची व मग खोबऱ्याची उधळण करावयाची.

खंडोबा ही सकाम देवता आहे. नाना फडणवीस यांनी नवसाप्रीत्यर्थ एक लाख रुपये देवाला वाहिले होते. पंचवीस हजाराच्या मूर्ती केल्या, दगडी मंडपी रुप्याने मढवली व उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुखवटे वगैरे सामग्री वाहिली. मंदिरात चांदी-पितळेचे तीन मूर्ति-जोड होते. एक सोन्याचा जोड इ.स. १९४२ च्या सुमारास चोरीला गेला; बाकी शिल्लक आहेत.

खंडोबाची यात्रा व जत्रा

खंडोबाच्या यात्रा व जत्रा चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात. देवास वाहिलेल्या मुला-मुलींचे वाघ्या-मुरळींत रूपांतर होते. कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याच्या कावडी वाहणे, वाघ्या-मुरळींकडून जागरण किंवा तळि भरणे-उचलणे, बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे, लंगर साखळी तोडणे, वारी किंवा भीक मागणे व हाळावरून (विस्तवारून) चालणे अशा अनेक प्रकारे नवसपूर्ती करण्यात येते. पौषी व माघी पौर्णिमांच्या यात्रांसाठी वर्‍हाड, खानदेश, कोकण इत्यादी भागांतून उपासक येतात. खैरे, होलम व होळकर यांच्या काठ्या म्हणजे लाल पागोट्याचे फडके गुंडाळलेले उंच कळक मिरवणुकीने वद्य द्वितीयेस कोटात येतात व शिखरास स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात. नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो. जेजुरीस अनेक भक्तगण महाराष्ट्रातून नियमाने येतात व खंडोबाच्या कृपेने यात्रेत संतुष्ट होऊन परत फिरतात.







संदर्भ: mr.wikipedia.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous



Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search