११/०९/२०१७

तेजोमहाल कि ताजमहाल !



भारताच्या इतिहासात हिंदू संस्कृतीचा अभिमान वाटण्यासारख्या अनेक बाबी असताना सहेतूक काहीतरी सांगून भ्रम निर्माण करणाऱ्या तथाकथित इतिहासकारांचे वर्णन सर रा. गो. भांडारकर यांनी "वेदांत विद्युत तारयंत्र' आणि "वाफेचे इंजिन शोधणारे दीडशहाणे' अशी केली होती. ताजमहालला हिंदू तेजोमहाल म्हणणारे पु. ना. ओक हे एक असेच इतिहासकार! त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी ताजमहाल हे शिवमंदिर असल्याचा विषय राजकीय स्वार्थासाठी सतत चालू ठेवला, त्याला एकदाचा
पूर्णविराम मिळाला.
ताजमहालसारखे स्थापत्य भारताखेरीज जगात कोणत्याही देशात आढळत नाही. इस्लामी धर्मतत्त्वानुसार कबरी, दर्गे यांचे बांधकाम निषिद्ध आहे; पण भारतासारख्या मूर्ती पूजकांच्या आणि भव्यदिव्य मंदिरे असणाऱ्या देशात मुस्लिम शासकांनाही धार्मिक स्थापत्यातून भव्य निर्माण करण्याची भुरळ पडली.
साहजिक, या सर्व स्थापत्याच्या रचनेवर हिंदू मंदिरावरील अलंकरणाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला गेला! या स्थापत्याची निर्मिती मुघल शासकांनी केली तरीही सर्वच मजूर, कारागीर, कामगार, नक्षीकाम करणारे कलाकार हे बहुसंख्य हिंदू होते, त्यामुळे ताजमहालवर मुस्लिम आणि हिंदू या दोन्ही पद्धतींचे अलंकरण पाहायला मिळते. जगभरातील विविध धार्मिक स्थापत्ये स्थानिक शैलीतच पाहायला मिळतात. केरळमधील भारतातील सर्वात जुन्या पेरुमल मशिदीची रचना मंदिरासारखी आहे. अजिंठा ही बौद्ध, तर वेरूळ ही हिंदू लेणी; परंतु लेणी गर्भगृहातील मूर्ती वगळता सर्वत्र एकसमान अलंकरण पाहायला मिळते.
ताजमहाल ज्या मुघल घराण्यातील शासकाने बांधला त्या घराण्यावर मंगोलियन, पर्शियन, भारतीय अशा तिन्ही संस्कृतींचा प्रभाव आहे. त्यामुळे धर्माने ते मुस्लिम असले तरी त्यांच्या धर्मश्रद्धा या भारतीय अाध्यात्मिक परंपरेशी मिळत्या-जुळत्या आहेत. पारलौकिक जगाबद्दल कुतूहल आहे. मृत्यू हे जीवनातील शाश्वत सत्य आहे, पण मृत्यूनंतर काय या प्रश्नाने जगातील सर्व धर्मीयांचे भावविश्व वास्तवात व्यापलेले आहे. म्हणून मृत्यूनंतरच्या जीवनाच्या काल्पनिक प्रसंगातून धर्मश्रद्धा विविध स्वरूपात प्रकट होतात. या अाभासी विश्वाची आस मनात बाळगून प्रत्येक धर्मश्रद्ध माणूस जगत असतो. त्यामुळे धार्मिक स्थापत्याच्या निर्मितीवर त्याचा परिणाम दिसून येतो.
वेरूळच्या कैलास लेणीचे खोदकाम सहाव्या शतकापासून नवव्या शतकापर्यंत चालू होते. चालुक्य आणि राष्ट्रकुट घराण्यांच्या आश्रयाने व व्यापारी लोकांच्या दानधर्मातून ही लेणी निर्माण झाली. हिंदू धर्मातील कोणत्याही धर्मश्रद्ध व्यक्तीचे सर्वोच्च पारलौकिक ध्येय मोक्षप्राप्ती असते. मोक्ष ही संकल्पना वैष्णव संप्रदायात "वैकुंठ' आणि शैव संप्रदायात "कैलास' म्हणून प्रचलित आहे. वेरूळचे कैलासनाथाचे मंदिर, त्याची रचना, विलोभनीय मूर्ती, अलंकरण पाहताना श्रद्धाळूंना प्रत्यक्ष कैलासाची म्हणजे मोक्षप्राप्तीची अनुभूती मिळावी, याचा विचार लेणीच्या निर्मितिकारांनी केलेला दिसून येतो. यासाठी म्हणजेच प्रत्यक्ष कैलास पर्वताची अनुभूती यावी म्हणून बर्फ दर्शवण्यासाठी पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टर संपूर्ण कैलास लेणीवरती लिंपण्यात आले होते. इतर कोणत्याही लेणीवर असे प्लॅस्टर दिसून येत नाही. वास्तूला आपण कोणत्या नजरेने पाहतो यापेक्षा निर्मात्याला काय दाखवायचे आहे, याचा विचार करायला हवा!
हिंदू धर्मातील मोक्ष किंवा कैलासप्राप्तीप्रमाणे मुस्लिम धर्मश्रद्ध मनात कयामतच्या दिवसाची आस आहे आणि जन्नतप्राप्ती हे उद्दिष्ट आहे. मुस्लिम श्रद्धेनुसार मृत लोक कयामतच्या दिवसाची वाट पाहत कबरीत विश्रांती घेतात आणि कयामतच्या दिवशी अल्ला न्यायासनावर बसून निवाडा करतो! शहाजहानला स्वत:ला आणि मुमताजला जन्नत प्राप्ती हवी असणे हे स्वाभाविक आहे. ताजमहालच्या बांधकामावर १५७० मध्ये बांधलेल्या हुमायूनच्या मकबऱ्याचा आणि १६१३ च्या फतेहपूर सिक्रीमधील बुलंद दरवाजाच्या बांधकामाचा प्रभाव ठळकपणे दिसून येतो. हुमायूनचा मकबरा म्हणजे भारतीय उपखंडातील बगिचा असणारा पहिला मकबरा आहे. त्याच धर्तीवर जहांगीरची बेगम नूरजहाँ हिने तिच्या वडिलांचा मकबरा बांधला (१६२२) जो ताजमहालचा खराखुरा आराखडा म्हणावा लागेल. कारण ही स्थापत्ये कयामतच्या दिवशी जन्नतमधील अल्लाहच्या न्यायदानाच्या सिंहासनाची प्रतिकृती असून कुराणातील जन्नतच्या वर्णनानुसार या स्थापत्यांची रचना केली आहे.
जहांगीर १५ फेब्रुवारी १६२७ रोजी वारला आणि सत्ता शहाजहानच्या हाती आली. जहांगीर धर्मापेक्षा राजकारभारला महत्त्व देणारा, तर त्याचा मुलगा शहाजहान आध्यात्मिक स्वरूपाचा धर्मश्रद्ध आहे. ज्या राजाच्या कालखंडात बांधकाम झाले, त्याच्या मनोभूमिकेचाही विचार महत्त्वाचा ठरतो. त्याच्या सुलतानपदाच्या कारकीर्दीच्या अवघ्या पाचव्या वर्षांत ताजमहाल बांधण्यास १६३२मध्ये सुरुवात झाली आणि १६४३मध्ये बांधकाम पूर्ण झाले. शिवाय कोरीव कामासाठी पुढे आणखी दहा वर्षे लागली. याचा तत्कालीन खर्च ३,२०,००००० रुपये असावा असा अंदाज आहे. त्या वेळी एवढे उत्पन्न असणारी आणि केवळ वीस वर्षांत एवढे पैसे खर्च करू शकेल अशी राजवट मुघलांखेरीज कोणतीही नव्हती. एक वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी की, ताजमहालला हिंदू मंदिर म्हणण्यासाठी त्या शैलीतील एकही मंदिर इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही.
ताजमहालप्रमाणे कुराणमधील कयामतच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन इतर अनेकांनी जी स्थापत्ये उभी केली, ती सर्वच स्थापत्ये इस्लामी स्थापत्ये आहेत. औरंगाबाद येथील ‘बीबी का मकबरा’, जुनागडमधील "बहाउद्दीन मकबरा' ही ताजमहालपासून प्रेरित झालेली स्थापत्ये आहेत; मात्र ताजमहालची सर कोणी करू शकले नाही. आज ताजमहाल हे भारतीय शैलीतील मनोहारी स्थापत्य असून जगातील आश्चर्य म्हणून त्याकडे पाहिले जाते. जगाचा वारसा ठरल्यामुळे ते आज भारतीयदेखील राहिलेले नाही. त्यामुळे ते न हिंदू आहे, न मुस्लिम! ते जगाच्या पाठीवर भारतातल्या गंगा-जमुना तहजीबचे अस्सल प्रतीक आहे.
- राज कुलकर्णी
https://www.facebook.com/Amhichtevede/posts/1888285964520446

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search