२/१९/२०१५
शास्त्रीबुवांनी बोटे मोजली घटकापाळांचे गणित मोजले .कुंडलीची घरे ग्रह धरू लागली. कुंडली मांडून होताच शास्त्रीबुवांनी जिजाबाईंकडे पाहिले.
जिजाऊ म्हणाल्या - "शास्त्रीबुवा संकोच न करता स्पष्टपणे सांगा या पोराच्या वेळी दिवस गेले आणी घरादाराचा थारा उडाला कुणाचा कुणाला मेळ लागेना. रक्ताच्या नात्याने वैर पत्करलं, जहागिरीवर सोन्याचे नांगर फिरले, आजोबांचे छत्र हरले (लखुजी जाधव ज्यांचा विजापुरी दरबारात खून करण्यात आला), या मितीला या पोराचे वडील शत्रूमागे धावत आहेत. याचा थोरला भाऊ लहान त्याची ही या वणवणीतून सुटका नाही. सा-या मुलखाची अन्नान दशा झाली आहे. परमुलखात परठिकाणी ना माहेरी ना सासरी मी या मुलाला जन्म देत आहे. पोटात असता ही त-हा आता त्याच्या पायगुणाने आणखी काय धिंडवडे निघणार आहेत. तेवढे सांगून टाका"
हे ऐकून सा-यांचे चेहेरे व्यथित झाले. शास्त्रीबुवा मात्र शांतच होते व त्यांच्या चेह-यावरील लवलेश बदलला नाही
व त्यांनी भविष्य सांगण्यास सुरवात केली, राणीसाहेब असे अभद्र मनात आणू नये , अशुभाचा मनाला स्पर्श ही होऊ देऊ नका. दुर्भाग्य संपल भाग्य उजाडलं प्रत्यक्ष सूर्य पोटी आला आहे. जिजाऊ खिन्न पणे हसल्या.
"मुलाची कुंडली सांगताना प्रत्येक शास्त्री हेच म्हणतो "
शास्त्री गंभीर झाले ते निश्चल आणि खणखणीत आवाजात बोलू लागले.
"राणीसाहेब असा अविश्वास धरू नका. या शास्त्र्याचं भाकीत कधीही खोटे ठरले नाही. द्रव्य लोभाने नव्हे तर ज्ञानाच्या अनुभवानं, आत्मविश्वासाने मी हे भाकीत केले आहे ते कालत्रयी चुकणार नाही हे मूल जन्मजन्मांतरीचे पांग फेडेल. राणीसाहेब पापाचा घडा भरला आहे.धरित्री त्रस्त झाली आहे देवकी वसुदेव बंदीशाळेत असतानाच श्रीकृष्ण जन्माला आला. हे कृपा करून विसरू नका"
आपल्या तोंडात साखर पडो. जीजाबाई समाधानाने म्हणाल्या त्यांची नजर कुशीतल्या बाळाकडे गेली. मुठी चोखीत ते शांतपणे झोपी गेले होते. सर्वांच्या चेह-यावर एक प्रकारचे समाधान झळकत होते. जणू शास्त्रीबुवांनी भविष्य सांगत असतानाच या तेजस्वी पुत्राने शिवनेरी जिंकला होता।
लेखनआधार - श्रीमानयोगी