शिवाजी राजा मध्ययुगांतील एक सर्वश्रेष्ठ रचनाकार, लोकोत्तर पुरुष होता. राज्ये नष्ट होतात, साम्राज्याचे विघटन होते, राजघराणी नेस्तनाबूत होतात, परंतु ‘लोकनायक राजा’ अशा शिवाजी राजाची स्मृती म्हणजे मानवजातीला मिळालेला एक अक्षय ऐतिहासिक वारसा होय.
शिवाजी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर १९.२.१६३० (जुनी तारीख ६.४.१६२७) रोजी झाला. मराठी राष्ट्र हे शिवाजी राजांची निर्मिती होय. शहाजीने आपली पुणे, सुपे येथील जहागीर, जी प्रायः स्वतंत्र होती. ती शिवाजी राजांना बहाल केली. त्यांनी मावल, कोकण, आणि देश या प्रदेशातील लोकांच्या समोर स्वराज्याचे, महाराष्ट्र धर्माचे ध्येय ठेवून त्यांना संघटित केले, आणि परकी सत्तांना परभूत करून स्वराज्य स्थापन केले. या नूतन महाराष्ट्र राज्याला कार्यक्षम लष्करी आणि सनदी प्रशासन देऊन त्यांनी ते भक्कम पायावर उभे केले. आर्थिक दृष्ट्या देखील ते स्वावलंबी बनविले. सर्वधर्मसमभावाचे तत्व आचरून सर्व धर्म पंथांना आपल्या राज्यांत सामावून घेतले. आपल्या राज्याभिषेक प्रंसंगी (१६७४) राजशक सुरू करणारा, आणि स्वतःची शिवराई आणि होन’ ही सोन्याची नाणी चालू करणारा शिवाजी राजा हा पहिला मराठी छत्रपती होय. त्याच्या अकाली मृत्यूमुळे-वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी (५ एप्रिल १६८०) महाराष्ट्रांत एक पोकळी निर्माण झाली. मध्ययुगाच्या इतिहांसातील शिवाजी महाराजांचे स्थान सुप्रसिद्ध वंग इतिहासकार, यदुनाथ सरकार यांनी आपल्या शिवचरित्रांत विशद केले आहे. ते म्हणतात,`शिवजी राजा हा केवल मराठी राष्ट्राचा निर्माता नव्हता, तर तो मध्ययुगांतील एक सर्वश्रेष्ठ रचनाकार, लोकोत्तर पुरुष होता. राज्ये नष्ट होतात, साम्राज्याचे विघटन होते, राजघराणी नेस्तनाबूत होतात, परंतु ‘लोकनायक राजा’ अशा शिवाजी राजाची स्मृती म्हणजे मानवजातीला मिळालेला एक अक्षय ऐतिहासिक वारसा होय.
शिवाजी राजांचा पुत्र संभाजी (इ.स. १६५७-८९) याची कारकीर्द अवघे नऊ वर्षांची झाली. या छोट्या काळांत त्याला अंतर्गत कलह आणि शिद्दी, पोर्तुगीज, मुघल यासारखे शत्रू यांच्याशी मुकाबला करावा लागला. मुघलांच्या हातून त्याचा १६८९ साली जो अमानुष वध झाला त्यामुळे मराठी लोकामध्ये देशप्रेमाची जाज्वल्य भावना निर्माण झाली, आणि शिवाजी महाराजांचा कनिष्ठ पुत्र राजाराम (१६७०-१७००) याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाच्या सत्तेविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारले. आपला बलाढ्य फौजफाटा घेऊन औरंगजेब बादशहाने मरेपर्यंत (१७०७) मराठी सत्ता नेस्तनाबूत करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. राजारामाच्या मृत्युनंतर त्याची पत्नी ताराबाई हिने स्वातंत्र्ययुद्धाची सुत्रे आपल्या हाती घेतली, आणि आपला पुत्र दुसरा शिवाजी यास छत्रपती म्हणून घोषित केले. परंतु औरंगजेबाच्या नजरकैदेत असलेला संभाजीचा पुत्र शाहू याची जेव्हा १७०७ साली सुटका झाली तेव्हा शाहूपक्ष आणि ताराबाई पक्ष असे दोन तट मराठी राज्यात पडले आणि त्यांच्यात यादवी युद्धाला सुरवात झाली. शाहूने साताऱ्यास तर ताराबाईने पन्हाळ्यास आपली स्वंतत्र गादी स्थापन केली. या दुसऱ्या गादीच्या संदर्भात १७१४ साली एक राजवाड्यांतच छोटीशी राज्यक्रांती कोल्हापुरात झाली. आणि राजारामाचा दुसरा पुत्र संभाजी (इ.स. १६९८ ते १७६०) यास कोल्हापूरची गादी मिळाली. शाहूने वारणेच्या तहान्वये (१७३१) संभाजीस कोल्हापूरचा छत्रपती म्हणून मान्यता दिली.