सॅमसंगच्या गॅलक्सी S6 या फोनची गॅझेटप्रेमींना मोठी उत्सुकता आहे. गॅलक्सी S6 ची वैशिष्ट्ये काय असतील, याविषयी दररोज नव नवी माहिती लीक होत असते. त्याच मालिकेत आता सॅमसंगच्या गॅलक्सी S6 या फोनला वायरलेस चार्जिंगचा पर्याय असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आलीय.
सॅमसंगचा हा नवा फ्लॅगशिप फोन 1 मार्च रोजी लाँच होण्याची शक्यता आहे.
स्वतः सॅमसंगनेच आगामी गॅलक्सी फोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा असेल, असं सूचित केलंय. आगामी स्मार्टफोनबाबत उत्सुकता वाढवण्यासाठी त्यातील फीचर्सची अनधिकृतपणे चर्चा घडवून आणली जाते. त्यामुळे नव्या उत्पादनाविषयी जास्तीत जास्त उत्सुकता वाढते. एरवी अशा फीचर्सविषयी कंपनीक़ून काहीही अधिकृत माहिती दिली जात नसली तरी वायरलेस चार्जिंगबाबत मात्र सॅमसंगच्या ब्लॉगमधून सुतोवाच करण्यात आलंय. यापूर्वीच सॅमसंगने गॅलक्सी S6 चा कॅमेरा हा हायएन्ड कॅटेगरीतील सर्वोत्कृष्ट असेल, असं जाहीर केलं होतं.
2015 हे वर्षच वायरलेस चार्जिंगची सुविधा असलेल्या गॅझेटचं असेल, असं जाणकारांना वाटतं. कॉलकॉम स्नॅपड्रॅगन या आजच्या मितीला जगातील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन प्रोसेसर उत्पादक कंपनीच्या प्रमुख इंजिनीयर सेहो पार्कच्या मते या वर्षात अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या वायरलेस चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देतील. त्यामध्ये सॅमसंग गॅलक्सी S6 हा फ्लॅगशिप फोन पायोनियर ठरण्याची शक्यता आहे.
सॅमसंगचे तंत्रज्ञ 2000 सालापासूनच म्हणजे तब्बल 15 वर्षांपासून वायरलेस चार्जिंगवर संशोधन करत आहेत. सेहो पार्क यांच्या ब्लॉगमधूनच पहिल्यांदा सॅमसंग गॅलक्सी S6 मध्ये वायरलेस चार्जिंगचं तंत्रज्ञान वापरणार असल्याचं जाहीर झालंय.
सॅमसंगने यापूर्वीच न्यूझिलंडची पॉवरबायप्रॉक्झी ही कंपनी विकत घेतलीय. या कंपनीकडे वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञानाचं पेटंट आहे.
सॅमसंगने वायरलेस चार्जिंगचा एक भाग म्हणून गॅलक्सी S4, गॅलक्सी S5 तसंच गॅलक्सी नोट 3 आणि गॅलक्सी नोट 4 या स्मार्टफोनसाठी बॅटरी बॅकपॅकची विक्री करायला सुरूवात केलीय.
सॅमसंगचा नवा फोन 1 मार्चला म्हणजे मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या दोन दिवस अगोदर लाँच केला जाणार आहे.