संध्याकाळी फिरता फिरता म्हणाला तिला तो
आता जगयाचं तर थोडं सुखानं जगून घेऊ
त्या भूतकाळातल्या लांबलचक टाहो फुटलेल्या
आठवणींना शप्पत शप्पत विसरून जाऊ
बघना कसे तुझे मन गेले ग विझून
आरशात एकदा स्वताला घे ग जरा बघून
म्हातारी म्हणणार नाही
पण स्वताकडे जरा कधी बघ ग निरखून
तळ्या काठी फिरता फिरता
हलकेच त्याने तिचा हात हाती घेतला
काय "हे" असे म्हणून तिने हलकेच हात सोडवून घेतला
पूर्वी कशी त्याच्या मनातल्या इच्छा ती ओळखून असायची
मनातले भाव बघून हलकेच जवळ यायची
हल्ली तिच्या नजरेत त्याला कुठलेच भाव दिसत नाहीत
कोरडवाहू शेती सारखी तिची नजर होऊन गेली
त्याच्याच लडिवाळ नजरेवर कधीतरी ती फुलून जाते
फुलली फुलली वाटता वाटता विझून जाते
लेकराला जाऊन काळ उलटून गेला
तरी अजूनही ती आठवणीत भिजून जाते
आठवून आठवून डोळे ओले करीत बसते
तेव्हा तो तिचा हात मूकपणाने हाती घेतो
तिला त्याचा स्पर्श जाणवून ती कोसळून जाते
त्या स्पर्शात आता फक्त तिचे आभाळ सावरणे असते
तिचे डोळे भिजले की हाही कोसळून जाईल असे तिला भासून जाते
तो फुटेल म्हणून ती स्वताला क्षणात सावरून घेते
चला तुम्हाला चहा हवा असेल थोडा चहा टाकून देते
ती आई म्हणून जरी आता आई नसली तरी
बायको म्हणून सुद्धा त्याची ती आईच होउन जाते ….
प्रकाश