११/०५/२०१४

सोपं नसतं,


सोपं नसतं,
आपल्या अस्तित्त्वाची वळकटी करून ठेऊन
एखाद्याच्या पायाखालचा गालिचा होणं!

आपलं सुंदर असणं जपताना,
त्याच्या यशापयशाची पाऊलं झेलणं.....झेलत राहणं
नसतंच सोपं....!

कधी अनवाणी, कधी धूळ माखली
कधी कुणाच्या ओढीनं धावत गेलेली,
तर कधी अनिच्छेने परतून आलेली....... पाऊलं

आपलाही रंग कसा टिकावा, कायम...
सतत झेलतं राहिल्यावर?
अस्वच्छ होऊ,
धूतले जाऊ,
वाळवले जाऊ....!
शेवटी विरलो म्हणून टाकून दिले जाऊ....

आता,
अनावधाने आपणच कुठेतरी ठेवलेली,
आपली वळकटीही.......... हरवलेलीच!

....भाग्यश्री देशमुख

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search