माझ्या आयुष्याचे निर्णय तूच
घेत आलास आजपर्यंत
कधी बाप म्हणून
कधी भाऊ म्हणून
कधी नवरा म्हणून
आखत आलास माझ्या प्रत्येक
पावला पुढे लक्ष्मणरेषा ........
जन्माला येण्याआधीच घेतलास जीव
अग्निपारीक्षाही दिली तुझ्यासाठी
मीही मान डोलवत राहिले तुझ्या
प्रत्येक निर्णयावर ..........
आज देवघरात बसवतो आहेस
तुझ्याच मर्जीन ..........
उद्या विटंबना करशील
तूच आज पुजलेल्या मूर्तीची
सगळ सगळ फक्त तुझ्या मर्जीन
पण मला कधी विचारलस
मला काय हव ?
मला काय वाटत ?
अर्थात तू विचारशील कधी
अशी आशा नाही पण मीच
सांगते .........
नको करूस माझी पूजा देवी म्हणून
नको ते सारे सोपस्कार ..........
फक्त मी ही एक माणूस आहे
मलाही मन,भावना, सुख ,दु:ख
अपेक्षा आहेत याच भान ठेवून
घेऊ दे या तुझ्या दुनियेत
मोकळा श्वास .................
सौ ज्योत्स्ना राजपूत
पनवेल .