सोलापुरामधील काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध एमआयएम असा सामना रंगलेला असताना त्यात शिवसेनेनेही उडी घेतली आहे. 'सामना'तून प्रणिती शिदे यांची जोरदार पाठराखण करण्यात आली आहे.
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची वक्तव्यं ही देशद्रोही असल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. त्यामुळे अशा देशद्रोहींविरोधात काँग्रेसमधून निघालेला सूर जमेची बाब असल्याचं 'सामना'त म्हटलं आहे.
“देशद्रोही, दहशतवादी आणि एमआयएम यांच्यात फरक नाही, त्यामुळे त्यांच्यावर बंदी घाला” अशी आगपाखड प्रणिती शिंदे यांनी केली होती. त्यावर "प्रणिती शिंदे यांनी आठ दिवसांत जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं," अशी नोटीस एमआयएमच्या वकिलांनी पाठवली आहे.
काय म्हटलं आहे सामनात?
"प्रणिती शिंदेंचा गुन्हा काय आहे. एमआयएम ही देशद्रोही संघटना असून देशाचे व समाजाचे तुकडे पाडण्याचे मनसुबे ते रचत आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालावी. एमआयएमच्या विखारी टीकेविरोधात शिवसेना दोन हात करत आली आहे, पण काँग्रेसच्या गोटातून एक सूर विरोधात निघाला, ही जमेची बाजू आहे. एमआयएमने दोन आमदार निवडून आणले आणि 14 मतदारसंघात दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकाची मते पडल्याने त्यांचा उन्माद वाढल्याचं दिसत आहे. फडणवीस सरकारने एमआयएमवर कारवाई केली पाहिजे. प्रणिती शिंदेंनी एक भूमिका घेतली. त्यांना वाऱ्यावर सोडू नये. शिवसेना पाठीशी राहिलच."
-ABP Majha