६/२३/२०१४

काँग्रेसला गळती; शिवसेनेत भरती

Congress


लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याने आता काँग्रेसमध्ये गळती सुरू होणार असे दिसत आहे. नालासोपाऱ्यातील काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

नालासोपाऱ्यातील काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस धनंजय गावडे तसेच माजी सरचिटणीस नवीन दुबे यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह काँग्रेसचे नालासोपाऱ्यातील ५० पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ३० एसईओंनीही प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. उद्धव यांनी नव्याने पक्षात आलेल्या सर्वांचे भगवा झेंडा हाती देऊन स्वागत केले.

गावडे हे काही वर्षांपूर्वी शिवसेनेत होते व काही मतभेदानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार अॅड. चिंतामण वनगा यांचा प्रचार केला होता. त्यांनी पक्षविरोधी काम केले म्हणून काँग्रेसकडून त्यांना १८ जून रोजी काँग्रेस पक्षसंघटनेमधून बडतर्फही करण्यात आले होते.

शुक्रवारी मातोश्री निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या वेळेस शिवसेना उपनेते आमदार विवेक पंडित, पालघर लोकसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख दिगंबर कांडकर, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, नालासोपारा विधानसभा संघटक प्रवीण म्हाप्रळकर, नालासोपारा शहरप्रमुख जितेंद्र शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. नवीन कार्यकर्ते पक्षात आल्याने आगामी नालासोपारा विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा होईल, असे शिवसेनेला वाटत आहे.

अनेक कार्यकर्ते संपर्कात

काँग्रेसचे हे नाराज कार्यकर्ते शिवसेनेत येण्यासाठी गेले दोन महिने इच्छुक होते. अखेर त्यांना पक्षात प्रवेश मिळाला असून आता आणखीही काही इतर पक्षांचे कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात आले. पंडित व चव्हाण यांनी या दोन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह पक्षात आणण्यात भूमिका बजावली.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search