६/२३/२०१४

'कॅम्पा'कर नरमले!





मरेपर्यंत घरे रिकामी करणार नाही, असे सांगत पालिकेच्या अतिक्रमण विभागाला रोखून धरणाऱ्या कॅम्पा कोलाच्या अनधिकृत घरांमधील रहिवाशांनी अखेर रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर नमते घेतले. आज, सोमवारी सकाळपासून पालिकेची चार पथके अनधिकृत घरांचा वीज, पाणी व गॅसपुरवठा तोडणार असून त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरवली जाईल.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही घरे सोडून जाण्यास नकार देणाऱ्या कॅम्पा कोला रहिवाशांनी रविवारी राष्ट्रपतींकडे धाव घेतली. माणुसकीच्या भावनेतून आमच्याबाबत निर्णय घ्या, असे पत्र राष्ट्रपतींना पाठवण्यात आल्याचे रहिवाशांतर्फे सांगण्यात आले. मात्र, राष्ट्रपती भवनातून कारवाई रोखण्याबाबत काहीच सूचना न आल्याचे सांगत मुंबई महापालिकेने कारवाई थांबवण्यास नकार दिला. गेल्या दोन दिवसांपासून पालिकेला कारवाई करण्यास रोखणाऱ्या रहिवाशांना रविवारी पालिका अधिकाऱ्यांनी सज्जड दम भरला. 'अध्र्या तासात निर्णय घ्या, अन्यथा गरज पडल्यास पोलिसी बळाचा वापर केला जाईल,' असे सांगून पालिका अधिकारी दुपारी परतले. याच दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही रहिवाशांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. रहिवाशांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देतानाच कायद्याच्या आड येऊ नका, असेही मुख्यमंत्र्यांनी या प्रतिनिधींना सुनावले. त्यानंतर रहिवाशांनी नमते घेत पालिकेला कारवाईत सहकार्य करण्याचे जाहीर केले.
याहून अधिक सहन करणे आम्हाला शक्य नाही. आम्ही सर्व कायदेशीर बाजू चाचपडून पाहू. घरे वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. यात आमची चूक नव्हती. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्ही वागणार आहोत. पालिकेच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी इमारतीचे प्रवेशद्वार आम्ही खुले करणार आहोत. - आशीष जालान, रहिवासी
पालिकेची चार पथके सोमवार सकाळपासून कारवाई करत या रहिवाशांचे वीज, पाणी व गॅस पुरवठा खंडीत करणार आहेत. ही अनधिकृत बांधकामाविरोधातील पहिली पायरी असेल. या कारवाईचा अहवाल दाखल केल्यानंतर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी पुढील कारवाईसंदर्भात निर्णय घेतील
आनंद वागराळकर, पालिका उपायुक्त

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search