६/२६/२०१४

पाणीकपात अटळ

Dam


जून संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्याने मुंबईत पाणीकपात अटळ आहे. येत्या तीन ते चार दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे बुधवारी पालिका प्रशासनाने जाहीर केले.

उन्हाच्या वाढत्या तलखीने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात झपाट्याने पाण्याची घट होत आहे. २५ जून रोजी वैतरणा नदीत ३१ जुलैपर्यंत पुरेसा ३८ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे. तर भातसा नदीत १५ जुलैपर्यंतचा साठा उरला आहे. त्यामुळे दीड कोटी लोकसंख्येच्या मुंबईला पाणीपुरवठा करण्याची चिंता पालिकेला लागून राहिली आहे.

पावसाच्या जोरदार सरी तलाव क्षेत्रात सुरू होण्यास अद्याप आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. प्रत्येक वर्षी जून महिन्यात तलावांमध्ये ४७८ मिमी पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत आठ ते दहा टक्के म्हणजे १३० मिमी इतकाच पाऊस पडला आहे. त्यामुळे कपातीचा निर्णय घ्यावा लागणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी बुधवारी स्थायी समितीत दिली.

कृत्रिम पावसाची तयारी

पावसाने ओढ दिल्याने तलावांच्या क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. कृत्रिम पावसाचे काम खासगी कंपनीला देण्यात येणार असून त्यासाठी टेंडर काढले आहे. पाणी वाचवण्यसाठी इतर पर्यायही अवलंबिले जात आहेत, असे जलोटा यांनी सांगितले.

पाणी जपून वापरा

तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू होईपर्यंत तसेच तलावांतील पाण्याची पातळी वाढेपर्यंत मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापौर सुनील प्रभू व पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी केले आहे.

पाणीसाठा

२०१३ः ३ लाख १० हजार ६६२ एमएलडी

२०१४ः १ लाख ४१ हजार ४९ एमएलडी

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search