६/२४/२०१४

‘तत्काळ’ सुविधा बंद?

Tatkal


रेल्वेच्या आगामी अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता


तातडीने प्रवासाला जाणाऱ्यांसाठी रेल्वेची तत्काळ सुविधा फायदेशीर ठरत असली, तरी आगामी रेल्वे अर्थसंकल्पात ही सुविधा रद्द केली जाण्याची शक्यता आहे, असे कळते. रेल्वेगाड्यांना असणारी वेटिंग लिस्ट कायमस्वरूपी बंद करून संबधित गाडीला जादा डबा लावणे किंवा त्या मार्गावर जादा गाडी सोडण्याचे नियोजन अर्थसंकल्पात येणार असल्याचे समजते.

काही वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने तातडीने प्रवासाला जाणाऱ्यांच्या सोयीसाठी तत्काळ तिकीटाची सेवा सुरू केली. 'तत्काळ'च्या एसी प्रवासाच्या तिकिटासाठी प्रवाशांना प्रत्येक तिकीटामागे ३०० रुपये आणि सेकंड क्लासच्या तिकिटामागे १५० रुपये द्यावे लागतात. तत्काळ तिकिटे काढणाऱ्या एजंटाची संख्या देखील मोठी आहे. 'तत्काळ'चे तिकीट काढण्यासाठी संबधित प्रवाशाचे ओळखपत्र देणे बंधनकारक असले, तरी ही तिकिटे काढणाऱ्या एजंटची संख्यादेखील मोठी आहे. बऱ्याचदा वेटिंगलिस्ट असतानाही प्रवासी तिकीट काढतात आणि प्रवासाच्या वेळेस काहीतरी कसरत करून डब्यामध्ये जागा मिळवतात. सध्या वेटिंग लिस्टवर असणाऱ्या प्रवाशांना प्रवास करता येत नाही. रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षी वेटिंग लिस्टची तिकिटे कितीपर्यंत द्यावीत, यावर देखील बंधने घातली आहेत. त्यामुळे वेटिंग लिस्टवर तिकीट असणाऱ्या प्रवाशांना प्रवास करणे कठीण झाले आहे. प्रवाशांचा हा त्रास कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने वेटिंग लिस्ट कायमस्वरूपी बंद करण्याचे निश्चित केले आहे. आगामी रेल्वे अर्थसंकल्पात त्याची अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते.

रेल्वेच्या योजनेनुसार संबधित गाडीला वेटिंग लिस्टवर असणाऱ्या प्रवाशांची संख्या किती आहे, याच्या अंदाजानुसार जादा डबा जोडणे किंवा नवीन गाडी सोडून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे समजते.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search