६/२४/२०१४

सचिन तेंडुलकरला ईस्ट इंडिया कंपनीचा 'सोनेरी' सलाम !



भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ इंग्लंडची दिग्गज ईस्ट इंडिया कंपनीही उतरली आहे.  ईस्ट इंडिया कंपनीने सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ १२,००० पौंड किंमतीचे सोन्याची नाणी जारी केली आहेत.

तेंडुलकरच्या क्रिकेटमधील 24 वर्षांच्या दैदीप्यमान कारकिर्दीचा सन्मान करण्यासाठी कंपनीने हे दुर्मिळ नाणे जारी केलं आहे. कंपनीने प्रत्येकी २०० ग्रॅम वजनाची २१० सोन्याच्या नाण्यांची निर्मिती केली आहे.

जगभरातील अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या लोकांनाच हे नाणे विकत घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे, असं कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

ब्रिटनची ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापारासाठी १६ व्या शतकात आली आणि त्यानंतरच्या शंभर वर्षात तिने अख्ख्या देशावर ताबा मिळवला. व्यापार करायला आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने प्लासीची लढाई जिंकून या खंडप्राय देशाची राज्यकर्ती बनली. काही वर्षांपूर्वी एका भारतीय वंशाच्या उद्योजकाने ही कंपनी लिलावात विकत घेत इतिहास घडवला.

कंपनीने तयार केलेले प्रत्येक २०० ग्रॅम सोन्याचे नाणे संग्राह्य मास्टपीस असणार आहे. कंपनी प्रत्येक नाणे एका खास प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपलब्ध करुन देणार आहे. त्यासोबत त्याच्या अस्सलपणाची खात्री देणारे सर्टिफिकेट आणि सचिन तेंडुलकरची स्वाक्षरी असलेली बॅटही देण्यात येणार आहे.

“माझं पूर्ण आयुष्य मी देशासाठी खेळण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि ते स्वप्न सत्यात उतरल्याचं भाग्य मला लाभलं. आता या खास नाण्यांच्या रुपाने माझ्या कारकिर्दीची दखल घेण्यात येत आहे, तो मी माझा सन्मान समजतो. या नाण्यांची निर्मिती करताना खूप बारकाईने लक्ष देण्यात आलं आहे” अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकरने व्यक्त केली.  

पॅरिसच्या ‘मोना दे पॅरिस’च्या मुख्य एनग्रेव्हर जोआकिन जिमेनेझ या जगातली सर्वात नामवंत कॉईन डिझायनर यांनी या नाण्याचे डिझाईन तयार केले आहे. या नाण्यावर सचिन रहात असलेल्या मुंबई शहराची ओळख, गेटवे ऑफ इंडियाच्या माध्यमातून रेखाटण्यात आली आहे.

तेंडुलकरच्या २०० व्या कसोटी क्रिकेट हा मैलाचा टप्पा त्याच्या स्वाक्षरी असलेल्या बॅट, हेलमेट आणि त्याने घातलेल्या १८७ नंबरच्या टीशर्टच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नोव्हेंबर २०१३ मध्ये झालेल्या कसोटीत सचिनने निवृत्तीची घोषणा केली होती.

ईस्ट इंडिया कंपनीचे सीईओ संजीव मेहता म्हणाले की, मौल्यवान धातूचा व्यापार हा कंपनीचा प्रमुख व्यवसाय आहे. तसेच सोने आणि चांदीच्या नाण्यांची निर्मिती आम्ही गेली काही शतके  करत आहोत. आम्ही २०१० सालापासून परत एकदा या व्यवसायात उतरलो आहोत.

ईस्ट इंडिया कंपनीनेचे कॉमनवेल्थ देशांमध्ये क्रिकेट खेळाचा प्रारंभ केला आणि त्यामुळेच या खास प्रसंगाच्या निर्मित्ताने या नाण्याची निर्मिती करणं याला एक वेगळा अर्थ आहे. आजवर क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडूला सलाम करण्याची संधी आम्हाला प्राप्त होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे.

मुंबईत जन्माला आलेल्या संजीव मेहता यांनी ३३ विविध शेअरहोल्डरकडून इस्टि इंडिया कंपनीचे शेअर विकत घेत कंपनीवर ताबा मिळवला आणि गेल्या पाच वर्षात कंपनीला लक्झरी ब्रँडच्या क्षेत्रात प्रस्थापित करण्यात त्यांना यश आलं आहे. 

ईस्ट इंडिया कंपनी आता मौल्यवान धातू, प्रकाशन, फॅशन, आर्ट आणि ज्वेलरी या क्षेत्रात कार्यरत आहे. सचिन तेंडुलकर लिमिटेड एडिशनची नाणी कंपनीचे संकेतस्थळावरुन तुम्हाला विकत घेता येतील. 

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search