आगामी 'किक' सिनेमात सलमान खान सायकलवरुन तुफान वेगाने रणदीप हुडाचा पाठलाग करतानाची दृश्यं सध्या प्रोमोजमध्ये दिसतायत. या दृश्यांमध्ये जो आहे तो सलमान नाही, तर तो आहे अजय पडवळ हा मराठी तरुण. या सिनेमासाठी अजयनेच सलमानला सायकलवरील काही स्टंटस शिकवले आहेत.
सलमानच्या आगामी 'किक' सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे. एका तेलुगू सिनेमाचा रिमेक असलेल्या 'किक'मधल्या जोरदार स्टंटसबद्दल खूप उत्सुकता आहे. विशेषतः सलमाननं केलेले सायकलवरचे काही ठराविक स्टंट सीन्स. या थरारक दृश्यांमागे हात आहे अजय पडवळ या १९ वर्षीय मराठी तरुणाचा.
अजय स्वतः प्रोफेश्नल माऊंटन बाइकर आहे. देशातल्या टॉप टेन माऊंटन बाइकर्समध्ये त्याचा नंबर येतो. आणि म्हणूनच त्याची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली. अजय सध्या पुण्याच्या बीएमसीसी कॉलेजमध्ये बीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिकतोय. यातली अनेक दृश्यं सलमानऐवजी स्वतः अजयनेच केली आहेत. अजयची शरीरयष्टी सलमानएवढी नसल्यानं त्याला ही दृश्यं साकारताना बॉडी पॅकिंग लावावं लागलं. म्हणूनच ते स्टंट सीन्स खुद्द सलमाननं केल्याचा फिल येतो. ट्रेनच्या पुढ्यातून सलमान सायकलवरुन अगदी आरामात जातोय हा सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवला जाणारा सीन सध्या खूप गाजतोय. हा स्टंट सीन सलमाननं स्वतः अजयकडून शिकून घेतला आणि केला. अजयचा बॉलिवूडमधला हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून तो माऊंटन सायकलिंग करतोय.
टिप्पणी पोस्ट करा