६/२४/२०१४

स्वस्त पासचा आज शेवटचा दिवस

Tatkal

बुधवार म्हणजेच २५ जूनपासून रेल्वेची तब्बल दुपटीने भाडेवाढ होणार असल्याने मोठा फटका टाळण्यासाठी सोमवारी सगळ्याच स्टेशनांवर पास काढण्यासाठी तुफान गर्दी उसळली होती. या रांगा रात्री उशिरापर्यंतही कमी झाल्या नव्हत्या. मंगळवारी अखेरच्या दिवशी त्यात अभूतपूर्व वाढ होण्याची शक्यता आहे. मासिक वा त्रैमासिक पासला पसंती देणाऱ्या मुंबईकरांनी आतापर्यंत सहामाही, वार्षिक पासकडे पाठ फिरवली असली, तरी भाववाढ जाहीर झाल्यानंतर गेल्या दोन- तीन दिवसांत मात्र सहामाही, वार्षिक पासवर उड्या पडत आहेत.

पासदरवाढीबाबत शनिवारपासून पसरत असलेली उलटसुलट माहिती रेल्वेकडूनदिण्यात आलेल्या स्पष्टीकरणानंतर कमी झाली. मात्र रांगा जराही कमी झालेल्या नाहीत. उपनगरीय मार्गावर सर्वच स्टेशनवर सकाळपासून रांगा लागलेल्या होत्या. नव्या भाडेवाढीचा तडाखा टाळण्यासाठी शेकडो प्रवासी रांगेत तिष्ठत उभे होते. शनिवारपासून सुरू राहिलेल्या रांगांमध्ये मंगळवारी आणखीनच वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तिकीट खिडक्यांवर गोंधळ

मध्य रेल्वेने पासांमधील फरक वसूल करण्याबाबतचे चुकीचे परिपत्रक रविवारी मागे घेतले. मात्र, सीएसटीसह अनेक ​तिकीट खिडक्यांवर परिपत्रकाच्या झेरॉक्स अजूनही दिसून येत आहेत.

'परे'चा चार कोटींचा महसूल तोटा

नवीन भाडेवाढ टाळण्यासाठी पास काढण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे 'परे'चे किमान चार कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पासविक्रीतून 'परे' ला २१ जून रोजी ८२ लाख तर २२ जून सायंकाळपर्यंत १ कोटी ५८ लाख रुपयांचा महसूल मिळाला. तर मध्य रेल्वेचा सोमवारपर्यंतचा महसुलातील तोटा पावणे दोन कोटींवर गेला आहे. ही रक्कम २४ जून रोजी आणखीनच वाढणार आहे. मात्र, नव्या भाडेवाढीतील रक्कमांचा अंदाज घेतल्यास ​केवळ 'परे' चा किमान तोटा चार कोटी रुपयांवर जाण्याचा दावा केला जात आहे.

एका दिवसांत ८० हजार पास

पश्चिम रेल्वेवर अवघ्या एका दिवसातील पासांच्या विक्रीने ५० हजारांचा, तर मध्य रेल्वेवर ३० हजार पासांचा टप्पा गाठला. हे आकडे संध्याकाळी ४ वाजेपर्यंतचेच असल्याने प्रत्यक्ष आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पश्चिम रेल्वेवर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पासांची विक्री झाली आहे. साधारणपणे एका दिवसात ४० हजार पासांची विक्री होत असताना २३ जूनच्या सायंकाळपर्यंत पासांची विक्री सुमारे ४९ हजारांवर पोहोचली. मंगळवार, २४ जून रोजी एकाच दिवसात पासांची विक्री किमान ७५ हजारांवर जाण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत. मध्य रेल्वेवर सोमवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत पासांची विक्री २९ हजारांवर पोहोचली. या अभूतपूर्व गर्दीमुळे पास काढण्यासाठी किमान पाऊण ते एक तास लागत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.

मनसेचे महायुतीला आवाहन

डिझेल, पेट्रोल वा रेल्वेभाड्यात दरवाढ करून केंद्रातील सरकारला 'अच्छे दिन' आणायचे आहेत का असा सवाल करीत मनसे गटनेते आ. बाळा नांदगावकर यांनी राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी आता ही दरवाढ कमी करून दाखवावी, असे आवाहन केले. रेल्वेमंत्र्यांच्या नुसत्या भेटीगाठी घेतल्याने दरवाढ कमी होणार नाही. जनतेचा असा विश्वासघात होणार असेल, तर काँग्रेसच्या यूपीए आणि भाजपच्या एनडीएमध्ये फरक काय राहील? डोक्यावर घेऊन नाचणारी जनता कधी पायाखाली तुडवील याचा नेम नसतो, एवढे भान नरेंद्र मोदी सरकारने ठेवायला हवे, असा टोला बाळा नांदगावकर यांनी लगावला.

आंदोलनाने साध्य काय?

काँग्रेसने स्टेशन परिसरात केलेले आंदोलन, तसेच पथनाट्य स्टेशन परिसरात होत असतानाही त्याबाबत रेल्वे पोलिसांनी आक्षेप घेतला नाही. तसेच एरवी सर्वसामान्य प्रवासी विनातिकीट आढळले, तर त्यांच्या हाताला दोरखंड बांधून पोलिस स्टेशनात आणले जाते. पण या नेत्यांनी तिकीट काढणार नसल्याचे आगाऊ सांगूनही त्यांना साधी विचारणाही झाली नाही, याबद्दल उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी आश्चर्य व्यक्त केले. या आंदोलनाने नेमके काय साध्य होणार, असा सवालही त्यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search