६/२३/२०१४

अदितीचा मराठीला मुजरा

aaditi


मराठी इंडस्ट्री, मराठी सिनेमे यांची मनोरंजनसृष्टीत सध्या खूप चर्चा आहे. अनेक बॉलिवूडकर पाहुणे कलाकार म्हणून मराठी सिनेमात हजेरी लावून जातायत. आगामी 'लय भारी' सिनेमात सलमान खान दिसणार आहे. 'मर्डर ३'फेम अदिती राव हैदरीच्या दिलखेचक नृत्याची कमाल मराठीत पाहायला मिळणार आहे. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित आगामी 'रमा माधव' या मेगा प्रोजेक्टमध्ये तिनं तिच्या नृत्याची झलक दाखवली आहे. या चित्रपटातल्या एका गाण्यात तिनं मुजरा पेश केला आहे. 

'रमा माधव' हा चित्रपट १७६०च्या कालखंडावर बेतलेला आहे. हा काळ मराठी साम्राज्याचा सुबत्तेचा काळ समजला जातो. पेशवे पुण्यात असतानाच्या काळात विशेष समारंभांसाठी नर्तिकांना आमंत्रित केलं जायचं. त्यामुळे या गाण्यासाठी ट्रेंड क्लासिकल डान्सरची आवश्यकता होती. या गाण्याची कोरिओग्राफी सरोज खान यांनी केलीय. त्यांनीच मृणाल कुलकर्णी यांना आदितीचं नाव सुचवलं. हिंदी भाषेतलं हे गाणं वैभव जोशी यांनी लिहिलं आहे. 'लुट लियो मोहे शाम सवरिया, बर्बस जमुना किनारे' असे या गाण्याचे बोल आहेत. माधवराव पेशवे यांचे काका रघुनाथराव यांच्या आवडत्या नर्तिकेच्या भूमिकेत अदिती दिसेल. लाल रंगाची लेहेंगा-चोली आणि भरगच्च दागिन्यांमध्ये सजलेली आदिती यात पाहायला मिळेल. कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी या गाण्यासाठी सेट डिझाइन केला होता. २०० वर्षं जुनं गाण्याचा फील देण्यासाठी मुद्दामहून लांब शॉट्स घेण्यात आल्याचं मृणाल कुलकर्णी यांनी सांगितलं. या गाण्यात आदितीसोबत प्रसाद ओकही दिसेल. अदितीचं हे नृत्य चित्रपटाच्या खास आकर्षणांपैकी एक असेल. 



या गाण्यासाठी माझ्या डोक्यात काही वेगळी नावं होतं. पण सरोज खान यांनी अदितीचं नाव सुचवलं. तेव्हा मला, ती ट्रेंड क्लासिकल डान्सर असल्याचं समजलं. या गाण्यासाठी तिनं खूप मेहनत घेतलीय. फक्त नाचंच नव्हे तर त्याबरोबर तो इतिहासही तिनं आवडीनं जाणून घेतला. कुठलेही नखरे न करता अक्षरशः एका रात्रीत तिने या गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं. या प्रोजेक्टनिमित्त अदितीसारख्या उत्तम अभिनेत्रीसोबत काम करायला मिळणं ही उत्तम संधी होती.

- मृणाल कुलकर्णी,

दिग्दर्शिका (रमा माधव)

संधी साधली

सरोज खान या गाण्यासाठी कोरिओग्राफी करणार आहेत म्हटल्यावर मी कुठलाही विचार न करता लगेचच होकार दिला. आजकालच्या हिंदी गाण्यांमध्ये क्लासिकल डान्स करायला मिळत नाही. ती हौस मी या गाण्यातून पूर्ण करून घेतली आहे. मराठीत काम करायला मिळणं हा मस्त अनुभव होता.

- अदिती राव हैदरी

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search