६/२३/२०१४

मुंबईकर टेन्शनमध्ये

Tension


दहावीच्या परीक्षेत मार्कस् कमी मिळाले.... अमूक कॉलेजला अॅडमिशन मिळत नाही... घरात प्रचंड ताण निर्माण झालाय... नोकरीत टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रंचड दबाव आहे... नोकरीचा ताण सहन होत नाही.... धंद्यात आर्थिक तोटा झालाय... पैसे वसुलीसाठी बँका आणि देणीदार तगादा लावताहेत... आत्महत्या करावीशी वाटते... या आणि अशा असंख्य समस्यामुळे मुंबईकरांमध्ये तणाव आणि नैराश्य वाढून लागले आहे, असा निष्कर्ष समॅरिटन्स या स्वयंसेवी संस्थेने काढला आहे.

मुंबईतील समॅरिटन्स ही स्वयंसेवी संस्था गेल्या २१ वर्षांपासून ताण, तणाव, नैराश्य आणि आत्महत्येचे विचार येणाऱ्या मुंबईकरांना भावनिक आधार देण्याचे कार्य अगदी मोफत करीत आहे. समॅरिटन्स याचा अर्थ स्वयंसेवक असा आहे. या संस्थेचे स्वयंसेवक तणावग्रस्तांना मदत करण्याचे काम करतात. शाळा-कॉलेजच्या निकालांच्या काळात आणि अॅडमिशनच्या काळात या संस्थेच्या कॉलसेंटरवर विद्यार्थ्यांचे फोन वाढतात. या संस्थेच्या हेल्पलाइनवर तणावग्रस्तांचे दररोज किमान दहा ते बारा फोन येतात. सध्याच्या काळात तीन ते चार फोन विद्यार्थ्यांचे असतात.

सध्याच्या निकालांच्या दिवसांत विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत. दहावी-बारावीच्या निकालाच्या काळात वैफल्यग्रस्त झालेले विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलतात. सुदैवाने अजूनपर्यंत तरी असे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेणारा एकही फोन संस्थेच्या हेल्पलाइनवर आलेला नाही. मात्र, गेल्यावर्षी दहावीत ६० टक्के गुण मिळालेल्या एका विद्यार्थ्यांला प्रचंड नैराश्य आले होते. तो थेट इमारतीच्या गच्चीत गेला आणि त्याने संस्थेच्या हेल्पलाइनवर फोन केला. संस्थेच्या स्वयंसेवकांना तत्काळ समजले की, हा मुलगा गच्चीत आत्महत्या करण्यासाठी पोहोचला आहे. त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले त्याच्याकडून मनातील त्याच्या सर्व भावना जाणून घेतल्या. तो खूप मननोकळेपणाने बोलला तोपर्यंत त्याच्या मनातील आत्महत्येचा विचार निघून गेला होता. त्याला त्याची चूक उमगली. घरात जे काही होईल त्याचा सामना करतो, असे सांगत त्याने फोन बंद केला याचा अर्थ त्याचा जीव वाचवण्यात संस्थेच्या स्वयंसेवकांना यश आले होते. एकदा एका १७ वर्षांच्या मुलीने रात्री नऊच्या सुमारास फोन केला. तिच्या जवळच्या नातेवाईकाने तिच्यावर बलात्कार केला होता. ती आत्महत्या करायला गच्चीत गेली होती. तिनेही संस्थेच्या हेल्पलाइनवर फोन केला. तिलाही संस्थेच्या स्वयंसेवकांनी बोलण्यात गुंतवून ठेवले. तिच्या मनातील भावनांना वाट मिळाली होती. सुदैवाने तिच्या मनातील आत्महत्येचा निर्णायक क्षण टाळण्यात यश मिळाले होते. भावनिक आधार देण्याचे काम केल्याने आत्महत्या टाळण्यात स्वंयसेवकांना यश मिळाले होते. पण, हल्ली मुंबईकरांमधील ताण वाढत असल्याचे समॅरिटन्सचे म्हणणे आहे.

राजेश चुरी, मुंबई

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search