दारू पिऊन पत्नी-मुलांना मारझोड करण्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. मात्र जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यात एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला आहे.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील अंधारी हे गाव व्यसनाने पोखरून गेलं आहे. व्यसनाच्या या विळख्याने अंधारी गावातील महिला दारू विक्रेते आणि मद्यपींच्या त्रासाने वैतागल्या होत्या. या त्रासातून कायमची सुटका व्हावी म्हणून या महिलांनी मद्यपि आणि दारू विक्रेत्यांच्या विरोधात मोठी मोहीम उघडली आहे.
या मोहिमेच्या अंतर्गत गावातील महिलांनी एकाच दिवशी २० मद्यपींचे मुंडण करून त्यांना अद्दल घडवण्याचा प्रयत्न केला. महिलांच्या या अनोख्या भुमिकेमुळे अनेक मद्यपि चांगलेच धास्तावले आहेत.
मद्यपि आणि दारू विक्रेत्यांमुळे गावात नेहमीच भांडण तंटे होऊ लागले होते. मद्यपिंच्या या उच्छादाचा थेट परिणाम त्यांच्या परिवारासह संपूर्ण गावावर होताना दिसू लागला. दारूच्या आहारी गेल्याने गावातील अनेक कुटुंब देशोधडीला लागली.
कुटुंब प्रमुखाच्या दारूच्या व्यसनाने महिलांची मानसिक आर्थिक आणि शारीरिक कुचंबना होऊ लागली. गेल्या काही दिवसात याचा अतिरेक होत असल्याचे लक्षात आल्यावर गावातील विठूबाई निकम यांनी पुढाकार घेतला. समदुखी महिलांना सोबत घेत त्यांनी त्रासातून कायमची सुटका करून घेण्याचा चंग बांधला. आणि सुरू केली एक अनोखी मद्यपि मुंडन मोहिम.
या महिलांनी गावात कोणाताही मद्यपी दारू पितांना अगर कोणी दारू विकताना आढळून आला तर त्या व्यक्तीचे संपर्ण गावासमोर मुंडण करण्याचं ठरवलं. त्यानुसार आत्तापर्यंत या मोहिमेअंतर्गत गावातील महिलांनी २० मद्यपिंचे मुंडण केले आहे.
महिलांच्या या दुर्गावताराने गावातील तळीरामांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. अनेक मद्यपींनी तूर्तास आपला मद्यपानाचा कार्यक्रम स्थगित ठेवला आहे. तर यांपैकी काही तळीराम बाहेरगावी जाऊन आपला कार्येक्रम उरकत आहेत. गावातील महिलांच्या दारूबंदीच्या या अनोख्या उपक्रमाला यश मिळाल्याने साऱ्या गावकऱ्यांनीदेखील त्यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे.
महिलांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे स्वागत करत अनेक मद्यपींनी दारूमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे जे सरकारला जमले नाही ते या महिलांनी करून दाखविले आहे. महिलांच्या या जिद्दीला सलाम.
टिप्पणी पोस्ट करा