६/२१/२०१४

टवटवीत अनुभव देणारी भातुकली






कलाकार : अजिंक्य देव, शिल्पा तुळसकर, किरण करमरकर, स्मिता तळवलकर, शशांक शेंडे, सुनील बर्वे, समीर परांजपे, तन्वी किशोर, साहिल शेलार.
निर्माता : फ्लॉवर फिल्म फॅमिली
दिग्दर्शक : रोहित जोशी
संगीत : जसराज, सागर, हृषिकेश
वेळ : 130mins
सिनेमा प्रकार : Drama

आपल्याकडे आता नव्या दिग्दर्शकांची कमी नाही. मराठीत पूर्वी हे चित्र नव्हतं. आता मात्र नव्या दिग्दर्शकांची फळी येते आहे. सिनेमा बनवण्याच्या प्रक्रियेची पुरती माहिती घेऊन ही मंडळी येत असल्यामुळे त्यांनी बनवलेल्या कलाकृती किमान 'प्रेक्षणीय' बनल्या आहेत. शिवाय, त्यांचंही ही पहिलंच अपत्य असल्यामुळे सिनेमा पुरता नीट बनावा म्हणून अत्यंत गांभीर्याने ते या माध्यमाकडे पाहताना दिसतात. अशाच दिग्दर्शकांमध्ये रोहित जोशी या तरुण दिग्दर्शकाचा समावेश करावा लागेल. आपल्या 'भातुकली' या चित्रपटाद्वारे त्याने मराठी सिनेनिर्मितीत उडी घेतली आहे. इथे येण्यापूर्वी त्याने या माध्यमाचं अनुभवसिद्ध शिक्षणही घेतलं आहे. त्याचा फायदा 'भातुकली'ला झाला. म्हणूनच हा सिनेमा सर्वच पातळ्यांवर चोख बनला आहे. शिवाय हा विषय निवडताना त्याने कौटुंबिक मूल्यांना अधोरेखित केलंय. देखणी मांडणी, सोपे संवाद, कलाकारांचा उत्तम अभिनय यांमुळे ही 'भातुकली' रंगतदार बनली आहे.

या सिनेमाची गोष्ट याच्या शीर्षकाप्रमाणे गोड आणि तितकीच साधी, सोपी आहे. त्याची चतुर मांडणी केल्यामुळे हा चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो. यातला अडसर इतकाच, की प्रत्येक व्यक्तिरेखा प्रस्थापित करताना त्याने घेतलेल्या वेळापायी पटकथा काहीशी संथ बनली आहे. पूर्वार्धात सुरुवातीपासून घुटमळणारी पटकथा 'रविकांत देशमुख'च्या प्रवेशानंतर वेग घेते. तो आल्यावर तर्क-वितर्कांना सुरुवात होते. पडद्यावर सुरू असलेल्या गोष्टीने किंचित वेग घेतला असला, तरी प्रेक्षकाला पडणाऱ्या प्रश्नांनी धावायला सुरुवात केलेली असते. मध्यंतरानंतर मात्र 'शेन अत्रे' येतो आणि गोष्ट सुसाट धावते. म्हणजे त्या गोष्टीतल्या घडामोडींना लॉजिकल वेग येतो.
'भातुकली'ची गोष्ट साधी आहे. म्हणजे श्रीकांत देशमुख हा बडा बिझनेसमन आहे. अत्यंत कष्टाने त्याने सर्व ऐश्वर्य, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवली आहे. आपल्या रोजच्या जगण्यातही तो अत्यंत शिस्तप्रिय आहे. या श्रीकांतचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त आपली सगळी नेहमीची कामं बाजूला ठेवून त्याला आपल्या कुटुंबाला भेटायचंय. त्यासाठी आपली आई, बायको, तीन मुलं यांना त्याने फार्म हाऊसवर बोलावलंय. तिथेही प्रत्येकासोबत घालवायचा वेळ त्याने निश्चित केला आहे. ठरल्याप्रमाणे श्रीकांत फार्महाऊसवर येतो आणि त्याच्या करड्या शिस्तीत कुटुंबातल्या प्रत्येकाच्या गप्पा-वजा मुलाखतीचा कार्यक्रम सुरू होतो. या गप्पांमधूनच 'भातुकली' आकाराला येते.

चित्रपटाचा लेखक हाच दिग्दर्शक असल्याने आपल्याला काय दाखवायचंय, याचं पूर्ण भान त्याला आहे. सिनेमा पाहताना ते सतत जाणवतं. श्रीकांत आणि त्याच्या कुटुंबाची मांडणी पाहताना हे कुटुंब चार-चौघांसारखंच कसं वाटेल यावर त्याने भर दिलाय. परंतु, देशमुख कुटुंबातल्या प्रत्येकाचा एकमेकांशी असलेल्या नात्याचे वेगवेगळे पदर त्याने प्रेक्षकांना दाखवले आहेत. त्यामुळे या पटकथेत येणाऱ्या श्रीकांत, जानकी, रविकांत, भार्गवी, अन्वय, आदित्य या व्यक्तिरेखांचा अंदाज प्रेक्षकाला येऊ नये, याची काळजीही त्याने घेतली आहे. सोपी कथा, त्यावर बांधलेली गुंतवून ठेवणारी पटकथा, चोख संकलन, उत्तम छायांकन यांमुळे हा सिनेमा टवटवीत बनला आहे. शिवाय, सिनेमाचं संगीत, पार्श्वसंगीतही तितकंच फ्रेश. दिग्दर्शकाने निवडलेल्या कलाकारांचाही यात मोलाचा वाटा आहे. आवर्जून उल्लेख करावा लागेल तो श्रीकांत बनलेल्या अजिंक्य देव यांचा. खरं तर ही संपूर्ण गोष्ट श्रीकांतभवती फिरते. त्या व्यक्तिरेखेला अनेक पैलू आहेत. अजिंक्य यांनी अत्यंत संयतपणे श्रीकांत साकारला आहे. त्यांचं 'दिसणं' हीच श्रीकांतची पहिली गरज आहे. त्यानंतर मध्यंतरात येणारा शेन अत्रे हा किरण करमरकर यांनी विलक्षण जिवंत केला आहे. त्यांचा ऊर्जादायी आणि तितकाच प्रसंगानुरूप येणारं हळवेपण साकारताना त्यांनी कमाल केली आहे. यांसह स्मिता तळवलकर, सुनील बर्वे, शशांक शेंडे, शिल्पा तुळसकर, समीर परांजपे आदीची कामं चोख आहेत. पटकथेला योग्य वेग दिला असता तर सिनेमाने पूर्वार्धातही खिळवून ठेवलं असतं.

एकूण या नव्या दिग्दर्शकाने चांगली कलाकृती देण्याचा प्रयत्न केला आहे. इट्स अ गुड मूव्ही. एकदा पाहायला हरकत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search