२५ जूनपासून भाडेवाढ लागू होणार, या आशेने आधीच पास काढण्यासाठी जाणाऱ्या मुंबईकरांचा भ्रमनिरास होणार आहे. कारण पासवरची भाडेवाढ ही घोषित झालेल्या दिवसापासून म्हणजे २० तारखेपासूनच झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रेल्वेची दरवाढ होण्यासाठी आणखी ३ दिवस आहेत. त्यामुळे या तीन दिवसात पास काढून किमान वाढीव रक्कम वाचवू, या उद्देशाने मुंबईतल्या तिकीट खिडक्यांवर प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे. पण प्रवाशांना पुरेशी माहिती न मिळाल्याने तिकीट खिडक्यांवर खटके उडण्याचे प्रसंगही झाले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आज स्पष्टीकरण देत लोकलचे पास वाढीव दरानेच मिळतील असं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान पास देत असताना तिकीटावर जुना दर असला तरी नवा दर वसूल केला जाईल आणि सोबत वाढलेल्या दराची पावती दिली जाईल असं रेल्वे प्रशासनानं सांगितलं.
मोदी सरकारने केलेल्या रेल्वेच्या दरवाढीचा सर्वात मोठा फटका मुंबईकर प्रवाशांना बसला आहे. त्यामुळे मुंबईच्या चाकरमान्यांनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली.
दोन स्थानकांमधल्या महिन्याभराच्या पाससाठी सध्या 15 एकेरी फेऱ्यांना लागणारं भाडं द्यावं लागतं. म्हणजे दोन स्थानकांमध्ये सेकंड क्लासचं भाडं जर पाच रुपये असेल, तर मसिक पासासाठी 75 रुपये मोजावे लागतात. आता नव्या नियमासुसार फेऱ्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. म्हणजेच आता 30 फेऱ्यांसाठी लागणारी रक्कम एका महिन्याच्या पाससाठी मोजावी लागेल.
टिप्पणी पोस्ट करा