मुंबई : मुंबईच्या ट्राफीकचा फटका अनेकांना बसतो. यामध्ये होम डिलिव्हरी देणाऱ्या अनेक हॉटेल व्यावसायिकांची तर कायमच गोची होते. ग्राहकांची ऑर्डर वेळेत पोहोचू शकली नाही तर त्यांचा ओरड खावी लागते. पिझ्झाने तर 30 मिनीटात पिझ्झा आपल्या दारात ही योजना आणली होती. पण ट्रॅफीकमुळे कित्येकांना पिझ्झा मोफत द्यावे लागले. मात्र मुंबईतील एका पिझ्झा शॉपने यावर तोडगा शोधलाय. ‘फ्रँन्सिस्को पिझ्झेरिया’ या पिझ्झा शॉपने आपली ऑर्डर आता अमेरिकन ड्रोनने पाठविण्याचा यशस्वी प्रयोग केला.
अमिरिकेने पहिल्यांदा यो ड्रोनचा वापर केला होता. अफगानिस्तानातील अतिदुर्गम भागात असलेल्या अतिरेक्यांचे प्रशिक्षण तळ शोधून त्यावर ड्रोनच्या सहाय्याने हल्ला चढवला होता. त्यानंतर कालांतराने ऑनलाईन विक्री कऱणाऱ्या अमेझॉन डॉट कॉमने या ड्रोनचा वापर करणार असल्याचे डिसेंबर 2013 मध्ये जाहीर केले होते. त्याच पार्श्वभूमीवर ही संकल्पना सुचल्याचे रजनी यांनी सांगितले.
11 मे रोजी या पिझ्झा शॉपने अमेरिकन बनावटीच्या ड्रोनने दीड किलोमीटर अंतरावरील आपल्या ग्राहकाला पिझ्झाची ऑर्डर पोहोचवण्याचा यशस्वी प्रयोग केला. तसेच ही ऑर्डर वेऴेत पोहोचल्याची माहिती शॉपचे कार्यकारी अधिकारी मिखेल रजनी यांनी दिली. मात्र हा केवळ प्रयोग होता, येत्या काही वर्षात अशा प्रकारची सेवा ग्राहकांना पुरवता येईल असंही त्यांचं म्हणणं आहे. मिखाईल हे टेक्सटाइल उद्योजक आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षापूर्वीच हे पिझ्झा शॉप सुरू केले आहे.
मुंबईच्या लोअर परेल भागातून ही ऑर्डर ड्रोनच्या सहाय्याने दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या वरळी भागातील एका इमारतीत पोहोचवण्यात आली. अशा पद्धतीने ड्रोनने ऑर्डर पोहोचवण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याचे पिझ्झा शॉपकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता पिझ्झाप्रेमी खवय्यांसाठी ही आनंदाचीच गोष्ट आहे.
याप्रकारची डिलिव्हरी ड्रोन बनविण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये इतका खर्च येतो. यामध्ये ही डिलिव्हरी करताना त्याचं शुटिंग देखील केलं जाणार आहे. या प्रकारच्या ड्रोनमुळे डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी लागणारा वेळ आणि तो पोहोचवण्यासाठी लागणारा खर्चही कमी होणार आहे. येत्या चार-पाच वर्षात या प्रकारची ड्रोन सेवा बऱ्याच ठिकाणी वापरली जाऊ शकते. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅथॉरिटीकडून याला येत्या वर्षात परवानगी मिळणार असल्याचेही हॉटेल प्रशासनाने सांगितलं.
पण अशा प्रकारचे ड्रोन वापरावर काही मर्यादादेखील आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या ड्रोनला 400 फुटांच्यावर उडविण्याची समंती नाही. तसंच हा ड्रोन केवळ 8 किलोमीटर अंतरावरच पोहोचू शकतो, त्यानंतर त्याच्या बॅटरीवर मर्यादा येतात. या मर्यादा टाळण्यासाठी शहरात पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशनची सुविधा करणे गरजेचे आहे. मात्र हे सर्व असले तरी आगामी काळात खवय्यांच्या खवय्येगिरीचा वेग वाढताना दिसेल.
टिप्पणी पोस्ट करा