४/२६/२०१४

मुलींना जीन्स-टी शर्ट वापरण्यास बंदी; वारकऱ्यांचा फतवा



www.24taas.com, झी मीडिया, बुलडाणा 

वारकऱ्यांना आता आपण `खरा वारकरी` असल्याचं आता सिद्ध करावं लागणार आहे. कारण, वारकऱ्यांच्या संघटनेनं वारकऱ्यांनी आणि त्यांच्या मुला-मुलींनी कसं राहावं, याबद्दलेच काही फतवेच जाहीर केलेत. या संघटनेनं घालून दिलेल्या नियमांची पूर्तता झाल्याचं न आढळल्यास त्या वारकऱ्याचं कुणीही किर्तन ठेऊ नये, ठसा ठरावही यावेळी संमत करण्यात आलाय. 

नुकतीच, भागवत धर्म परिषदे अंतर्गत यदुवंश समाजाची बैठक बुलडाणा जिल्ह्यातील पाळा फाटा इथं पार पडली. यावेळी, महाराष्ट्रातील टाळ, वारकरी, माळकरी, बुवांनी आपापल्या घरातील मुलींना तोकडे कपडे घालण्यास प्रतिबंध करावा असा ठराव संमत करण्यात आला. सोबतच मुलींना जीन्स, पॅन्ट, टी-शर्ट घालण्यावरही बंदी घातली गेलीय, अशी माहिती भागवत धर्म परिषदेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष शांताराम महाराज पाळेकर यांनी दिलीय. मुलींनी अंग दिसेल असे वस्त्र अजिबात परिधान करू नये, असा जणू काही फतवाच यावेळी काढण्यात आलाय. 

सोबतच, एखाद्या कीर्तनकाराचा मुलगा वारकरी सांप्रदायाचं काम करत नसेल तर त्या कीर्तनकाराचं कीर्तन कुणीही ठेऊ नये, असंही सांगण्यात आलंय. 

तसंच, कीर्तनकारानं टोपी आणि धोतर घालूनच कीर्तनासाठी उभं राहावं... पायजमा घालून कुणी कीर्तनासाठी उभं राहणार असेल तर त्याच्या कीर्तनावर वारकऱ्यांनी बहिष्कार टाकावा, असाही यावेळी निर्णय घेण्यात आला. 

या बैठकीला राज्यातील टाळकरी, माळकरी, तसेच भागवत धर्म परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भागवत धर्म परिषदेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष शांताराम महाराज पाळेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून बुलडाणा जिल्हाध्यक्ष विठ्ठल महाराज निपानेकर, अकोला जिल्हाध्यक्ष ह.भ.प देवळे गुरूजी, शेगाव तालुकाध्यक्ष रामेश्‍वर कंकाळे, नांदुरा तालुकाध्यक्ष गजानन धांडे, मोताळा तालुकाध्यक्ष बाळू पाटील, भारतीय धर्म परिषद कार्यकर्ते सोमनाथ सावळे, सखाराम आवारकर हेही उपस्थित होते. 

आजपर्यंत पुढारलेल्या विचारसरणीच्या वारकऱ्यांचा या ठरावानं मात्र वारकऱ्यांचा गोंधळ उडालाय. त्यामुळे विविध स्तरांतून वारकऱ्यांच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search