सांगली: सुमारे चार दशकं रसिकांच्या मनावर गारूड करणाऱ्या तमाशा कलावंत जोडीतला दुसरा जोडीदारही काळाच्या पद्याआड गेला आहे. काळू-बाळू या प्रसिद्ध तमाशा कलावंत जोडीतले दुसरे जोडीदार बाळू यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. ते 82 वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर सांगलीतील मिरजेमधल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते, तिथेच त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
60, 70 आणि 80 च्या दशकात या जोडीने ग्रामीण भागातल्या रसिकांवर जणू जादू केली होती. एकेकाळी काळू-बाळू यांचा तमाशा म्हटलं की हाऊसफुल्लचे बोर्ड लागायचे. काळू आणि बाळू यांच्यातला खुमसदार संवाद प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावायचे. ज्या काळात टीव्ही, सिनेमा ही माध्यमं परवडणारी नव्हती, त्या काळात काळू आणि बाळू गावा-गावातल्या चौथऱ्यांवरच्या कार्यक्रमातून घराघरात पोहोचले होते.
काही वर्षांपूर्वीच काळू यांचं निधन झालं होतं, तेव्हा बाळू यांनी आपला अर्धा प्राण निघून गेल्याची भावना व्यक्त केली होती. पण आज बाळू यांच्या जाण्याने तमाशा कलावंत आणि त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
टिप्पणी पोस्ट करा