१२/२६/२०२२

शेवग्याची कोवळी पाने व पोहे यांचे थालीपीठ

 

शेवगा खूपच औषधी आहे. त्याला पॉवरबॅंक असेही म्हटले जाते. मधुमेहींना शेवगा हे वरदान आहे. त्यांनी आहारात नेहमी शेवग्याचा समावेश करावा. त्याच्या शेंगा किंवा पाला (कोवळी पाने)दोन्हीही आरोग्यास हितकारक आहेत.

आज मी येथे शेवग्याच्या कोवळ्या पानांचा वापर करून रुचकर व स्वादिष्ट थालीपीठ जे पूर्ण आहार म्हणून नाश्त्याला खाता येईल ,त्याची रेसिपी शेअर करणार आहे

 शेवग्याची कोवळी पाने व पोहे यांचे थालीपीठ




साहित्य : एक मोठा बाउल भरून शेवग्याची पाने,एक मध्यम आकाराचा बाउल भरून भात, एक मध्यम आकाराचा बाउल भरून भिजवलेले पोहे,एक एक काचेची वाटी भरून चिरलेला कांदा,काचेची वाटी भरून चणा डाळीचे पीठ (बेसन) , एक काचेची वाटी भरून ज्वारीचे पीठ,एक छोटी काचेची वाटी किंवा चवीनुसार दोन चमचे कोथिंबीर,हिरवी मिरची,आले,लसूण यांची पेस्ट,एक चमचा जिरे,चवीनुसार मीठ,एक छोटा चमचा हळद,चिमूटभर हिंग,जरुरीनुसार तेल,थालीपीठा सोबत तोंडीलावणे म्हणून देण्यासाठी ताजे मलईचे दही किंवा लोणी.

कृती : एका लंगडीमध्ये (उथळ पसरत आकाराचे पातेले) किंवा परातीत थालीपीठासाठी निवडलेली ताजी कोवळी शेवग्याची पाने घ्या व त्यात चिरलेला कांदा,भिजवलेले पोहे,भात, बेसन व ज्वारीची पिठे,चवीनुसार कोथिंबीर,हिरवी मिरची,आले, लसूण, यांची पेस्ट, जिरे,चवीनुसार मीठ, हळद, हिंग व थोडेसे पाणी घालून थालीपीठासाठीचे पीठ भिजवून व मळून घ्या व १०मिनिटे मुरत ठेवा.

एका नॉनस्टिक तव्यावर एक चमचा तेल घालून त्यावर या पिठाचा एक गोळा ठेवून गोल आकारात थालीपीठ थापावे. त्यावर हाताच्या बोटाने मध्यभागी एक व गोलाकार भागावर ३-४ भोके पाडून त्यात चांचाने तेल सोडावे व तवा गॅसवर ठेवून वर झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी थालीपीठ खमंग भाजावे.

गरम थालीपीठ मलईच्या दह्यासोबत किंवा लोण्याबरोबर सर्व्ह करावे.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search