लिफ्ट हा मूळचा इंग्रजी शब्द असला तरी त्याला इंग्रजीत ‘एलीव्हेटर’ असा आणखी एक शब्दही त्यासाठी प्रचलित आहे. मराठीत त्याला ‘उद्वाहन’ असे म्हणतात. लिफ्टचा संबंध उंच इमारतींशी असल्याने माणसाने उंच इमारती बांधायला सुरुवात केल्यानंतरच त्याने लिफ्टचा शोध लावला असावा, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु पहिल्या लिफ्टचा उल्लेख खूप प्राचीन काळातला आहे, असे सांगितले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. ग्रीक गणितज्ञ आर्किमिडीजने इसवी सन पूर्व २३२ मध्ये पहिली लिफ्ट तयार केली होती. ती नेमकी कशी होती आणि तिचा कशासाठी वापर होत होता, याची मात्र माहिती उपलब्ध नाही.
प्राचीन काळी माणसे, प्राणी यांनी खेचायच्या आणि रहाटाचे (वॉटर व्हील्स) तंत्र असलेल्या लिफ्ट वापरात असल्याचेही उल्लेख आहेत. त्या काळी इजिप्तमध्येही लिफ्ट वापरात होत्या. सतराव्या शतकात फ्रान्स आणि इंग्लंडमधील काही राजवाड्यांत लिफ्टसारखे वाहन असल्याचे उल्लेख सापडतात. फ्रान्सचा राजा पंधरावा लुई यांनी आपल्या राजवाड्यात लिफ्ट बसवली होती. त्याच्या राणीचा कक्ष पहिल्या मजल्यावर होता. तिथे जाण्यासाठी लुई ही लिफ्ट वापरत असे. ती राजवाड्याच्या बाहेरून लावण्यात आली होती आणि लुई राजवड्याच्या सज्जातून तिच्यात प्रवेश करत असे. या लिफ्टला फ्लाईंग चेअर म्हणजे उडती खुर्ची असे म्हटले जाई. वजन आणि पुली यांचा समतोल साधून तयार केलेल्या या लिफ्टला राजाच्या आदेशासरशी त्याचे सेवक वर ओढत असत. ही लिफ्ट केवळ एकाच व्यक्तीसाठी असली तरी ती जगातली पहिली ‘पॅसेंजर लिप्ट होती .एकोणीसाव्या शतकात वाफेवर चालणार्या लिफ्ट वापरात आल्या. त्या कारखाने, खाणी, गोदामांमध्ये वापरल्या जाऊ लागल्या. १८२३ मध्ये लंडन बर्टन आणि होर्मर यांनी ‘असेंडिंग रूम’ नामक लिफ्ट तयार केली.लंडनचे विहंगम दृश्य पर्यटकांना दाखवण्यासाठी त्यांना वर घेऊन जाण्यासाठी या लिफ्टचा वापर केला जायचा. १८४६ मध्ये विल्यम आर्मस्ट्रॉंगने पहिली ‘हायड्रोलिक लिफ्ट’ तयार केली. काही वर्षांतच त्यांनी वाफेवर चालणार्या लिफ्टची जागा घेतली. १८५० मध्ये न्यूयॉर्कच्या हेन्री वॉटरमनने ‘स्टँडिंग रोप कंट्रोल’ या नावाने लिफ्ट तयार केली. या सगळ्या लिफ्ट उंच इमारतींसाठी मात्र कामाच्या नव्हत्या.
लिफ्टच्या स्वरूपात क्रांतिकारी बदल करण्याचं श्रेय अमेरिकेच्या एलिशा ओटिसना जाते. १८४२ मध्ये त्यांनी पहिली सुरक्षित लिफ्ट तयार केली. लिफ्टला वर-खाली करणारे दोर तुटले तरी ही लिफ्ट खाली कोसळत नसे. ही लिफ्ट आज वापरल्या जाणार्या लिफ्टच्या तंत्राच्या जवळपास होती. ओटिस यांनी खरे तर लिफ्टचा शोध लावला नव्हता, पण केवळ तिचे ब्रेक्स तयार केले होते. विशेष म्हणजे, ओटिस यांनी त्यापूर्वी रेल्वे सेफ्टी ब्रेक्सचाही शोध लावला होता. १८५७ मध्ये ओटिसने तयार केलेली पहिली पॅसेंजर लिफ्ट न्यूयॉर्कमध्ये बसवण्यात आली. सुरुवातीच्या काळातील या लिफ्टमध्ये वाफेचे इंजिन बेल्ट आणि गिअर असलेल्या एका फिरत्या ड्रमला जोडलेले असे. १८६१ मध्ये ओटिस यांनी रीतसर कंपनी स्थापन केली आणि वाफेच्या लिफ्टचे पेटंटही घेतले. ओटिस बंधूंनी त्यानंतर मॅनहटन येथील एका पाच मजली इमारतीमध्ये जगातली पहिली सार्वजनिक लिफ्ट तयार केली. सुरक्षित लिफ्टचा शोध लागेपर्यंत जगात उंच इमारती बांधण्याला मर्यादा होत्या. कारण, या इमारतीत चढ-उतार करणे अवघड होते. लिफ्टने ही गैरसोय दूर केल्यावर गगनचुंबी इमारती बांधण्याचे माणसाचे स्वप्न पूर्ण झाले.