१२/०५/२०१४

'लाइक्स'चा व्हायरस'



ई-मेल, एस.एम.एस.,फेसबुक, व्हॉट्स अॅप.. माहिती तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे खूप काही घडतंय. त्यामुळे व्यावहारिक जगात एका बाजूला विकास होतो आहे, पण त्याहीपेक्षा मोठी उलथापालथ होते आहे ती मानवी नातेसंबंधात! त्यातली एक म्हणजे जोडीदारांमधील दुरावा. गेल्या काही महिन्यात मोबाइल, सोशल नेटवर्किंगमुळे दुरावा आलेल्या जोडप्यांच्या प्रमाणात वाढ होऊ लागलीय. त्यांचे अनुभव ऐकले आणि त्यातल्या भयाण सत्याची जाणीव झाली. म्हणूनच हे वापरणाऱ्यांनी वेळीच स्वत:वर र्निबध घालणं हे कुटुंबाच्या सौख्यासाठी महत्त्वाचं आहे, नुकत्याच झालेल्या जागतिक कुटुंब दिनानिमित्ताने..  
ई-मेल एस.एम.एस.,फेसबुक, व्हॉट्सअॅप..माहिती तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे खूप काही घडतंय. मुख्य म्हणजे जग जवळ आल्याने एका क्लिकने संपर्क साधणं सहज होतंय. ऑफिसची कामं अनेकदा प्रत्यक्ष उपस्थितीपेक्षा ई-मेल, व्हॉट्स अॅपवर फॉर्वर्ड होऊ लागली. कॉन्फनर्ि्सग मोबाइलवर होऊ लागले. प्रसंगी दहा दहा किंवा जास्त मंडळीही फोनवरच 'मीटिंगा' आटपायला लागली. झटपट निर्णय घेणे, कामाला गती येणं, त्यातून खूप चांगल्या, उपयुक्त गोष्टी घडणं होऊ लागलं. व्यावहारिक जगात या सगळय़ाच संपर्कसाधनांनी खूप मोठा बदल घडवला, त्यामुळे एका बाजूला विकास घडत आहे, पण त्याहीपेक्षा मोठी उलथापालथ होते आहे ती मानवी नातेसंबंधात!
    कामाच्या व्यापात महिनोन्महिने भेटायला तर सोडाच फोनवर बोलायलाही न मिळालेली नाती व्हॉट्स अॅप, फेसबुकमुळे रोजच्या रोज संपर्कात राहू लागली. अनेक वर्षे न भेटलेल्या शाळा, कॉलेजमधल्या मित्र-मैत्रिणींच्या अखंड नात्याच्या झरा पुन्हा खळखळून वाहू लागला. तर दुसऱ्या बाजूला नवी नाती निर्माण झाली. ई-मेल आयडी, मोबाइल नंबरची देवाणघेवाण नात्याला वेगळं वळण देऊ लागली. एका 'लाइक'ने नात्याला वेगळं परिमाण मिळू लागलं, मुख्य म्हणजे डिलीटचं बटण 'प्रायव्हसी' अबाधित ठेवू लागलं. नात्यात आणि म्हणूनच मग भाषेतही जरा मोकळेपणा.. मग जरा जास्तच मोकळेपणा आला.  'लव्ह यू' शब्द 'डीअर'च्या पंक्तीत बिनदिक्कत जाऊन बसला. व्यक्तिगत आयुष्य, व्यक्तिगत प्रश्नाचं शेअरिंग नात्याला घट्ट करत गेलं.. काळाच्या ओघात जे नवऱ्याकडून वा बायकोकडून अपेक्षित होतं ते मित्राकडून वा मैत्रिणीकडून अपेक्षिलं जाऊ लागलं. आयुष्य पुन्हा एकदा हवंहवंस वाटू लागलं. नवरा-बायकोच्या नात्यातील कसर दुसऱ्या नात्याने भरून जायला लागली. घरातल्या घरात दोन स्वतंत्रपणे जगणारी, स्वत:ची 'स्पेस' सांभाळणारी बेटं तयार झाली. आपल्याच आयुष्यात रमणारी! त्यातून एका बाजूला प्रेमाचं नातं तर काही ठिकाणी आपल्या जोडीदाराबद्दल संशयाचं, उपेक्षेचं नातं निर्माण झालं. काही वेळा राईचा पर्वत केला गेला आणि यातूनच निर्माण झाले गुंते.. काहींनी विवेकाचा वापर करत तिथेच थांबायचा.. नात्याला वेगळं रूप न द्यायचा निर्णय घेत माघार घेतली. काहींनी नीट 'हॅण्डल' केलं प्रकरण! पण काही गुंते मात्र इतके वाढले की समुदेशकांपर्यंत पोहोचले. प्रेमाच्या नात्यातून अविश्वास, अस्वस्थतेच्या, असुरक्षिततेच्या वळणापर्यंत प्रवास सुरू झाला तो मुख्यत्वे नवरा बायकोच्या नात्यात!
 जोडीदारांमधील हा दुरावा म्हणजे बेडरूम स्टोरीज! कपातलं वादळ, पण गेल्या काही महिन्यांत मोबाइल-सोशल नेटवर्किंगमुळे दुरावा आलेल्या जोडप्यांच्या प्रमाणात, सल्ला घ्यायला यायच्या प्रमाणात वाढ होऊ लागलेली दिसली. त्यांचे अनुभव ऐकले तेव्हा त्यातल्या आणि भविष्यातल्या संभाव्य भयाण सत्याची जाणीव झाली. दरम्यान, या समस्येवर केलं गेलेलं एक परदेशी संशोधनही वाचनात आलं आणि संशोधकाने काढलेल्या निष्कर्षांवरून या भयाण सत्याच्या जाणिवेला पुष्टी मिळाली.
कोलंबियातील 'युनिव्हसिर्टी ऑफ मिझुरी स्कूल ऑफ जर्नालिझम' येथील डॉक्टरेट करणाऱ्या रसेल क्लायटोन याने हे संशोधन केलंय. सोशल नेटवर्किंग साइटस्मुळे तयार झालेल्या नात्यातील संबंधांवर त्याने अभ्यास केला आणि अतिशय धक्कादायक माहिती पुढे आली. सतत सोशल नेटवर्किंग, चॅटिंगच्या माध्यमातून दुसऱ्याशी संपर्कात राहणाऱ्या व्यक्तींचे त्यातल्या लिखित संवाद, संपर्कामुळे जोडीदाराबरोबरचे संबंध खूप बिघडले आहेत. यात नोंदवलेल्या निष्कर्षांनुसार जोडीदार एकमेकांबरोबर भावनिक फसवणूक, शारीरिक फसवणूक याच बरोबरीने नाती तुटणं, (ब्रेक अप) आणि जोडपी विभक्त होणं इतपर्यंत पोहोचलं आहे. याच संशोधकानं यापूर्वी केलेल्या 'फेसबुक आणि नातेसंबंधामधील दुरावा' या संशोधनात असं दिसलं की, सोशल नेटवर्किंग साइटस्मुळे फक्त नवीन लग्न झालेलीच नव्हे तर कोणत्याही वयातील जोडीदारांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात.
 हल्लीच्या वेगवान आयुष्यात कुटुंबाला, एकमेकांना द्यायलाच आधी वेळ कमी मिळतो. त्यात पूर्वी या सोशल साइटस् फक्त इंटरनेटद्वारे संगणकावर उघडता यायच्या. घरात एकच संगणक, त्यामुळे घरी दमून आल्यावर संगणक उघडून चॅटिंग करण्याचा उत्साह तुलनेत कमी असायचा. पण आता स्मार्टफोन, टॅब, आयपॅडवरही नि:शुल्क अॅप्स मिळत असल्यानं संपर्क अहोरात्र सहज करता येऊ लागला. किंबहुना तुम्ही सतत ऑनलाइन असता आणि म्हणूनच सतत दुसऱ्यांच्या नजरेखालीही असू शकता. तुम्ही इंटरनेट कनेक्शन बंद केलं तरच तुमचा संपर्क तुटतो. म्हणूनच हल्ली अनेकांचा दिवस एकमेकांना गुड मॉर्निग स्माइली पाठवून सुरू होतो आणि गुड नाइटच्या स्माइलीने संपतो. पण विरोधाभास असा की इतरांना या 'स्माइली' पाठविताना बेडरूममध्ये असलेल्या आपल्या जोडीदाराला मात्र प्रत्यक्षात 'गुड मॉर्निग', 'गुड नाइट' फारच अभावानं म्हटलं जातं, म्हणजेच सहवास आहे, पण संवाद नाही!

   
तो संवादच महत्वाचा, कारण आयुष्य सतत स्माइली (आनंदी) नसतं. कुटुंबातील, व्यक्तिगत जीवनातील अनेक निर्णय एकमेकांशी चर्चा, वाद-विवाद करून घ्यावे लागतात, पण या सततच्या चॅटिंग, ऑनलाइन राहण्यानं साधे-मोठे निर्णय घेताना पूर्ण लक्ष नसतंच, मग त्यांच्या जोडीदाराची चिडचिड व्हायला लागते. बहुतांश वेळा ही चिडचिड स्त्रियांमध्ये आधी दिसते, कारण अजूनही अनेक घरांत व्यवस्थांची घडी बसवून ती सुरळीत चालू ठेवायची जबाबदारी स्त्रियांवरच असते. त्यामुळे अनेक जणींचं म्हणणं, नवऱ्याला काही सांगायला गेलं तर तो म्हणतो, 'माझा फ्रेण्ड ऑनलाइन आहे. महत्त्वाचा विषय चालू आहे.' किंवा 'तुला घरातल्या निर्णयाचं स्वातंत्र्य दिलंय, काय ते तू बघ आणि निर्णय घे!' अनेक र्वष एकमेकांनी बोलून निर्णय घ्यायची सवय असते, सुरुवातीला हे बरं वाटतं, स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंदही होतो. पण हे सतत व्हायला लागलं की चिडचिड होते. अर्थात हा त्रागा फक्त स्त्रियांचाच होतो असे नाही. अनेक जणी काम आटपत, झोप येईपर्यंत चॅटिंग करत राहतात. अशा वेळी पुरुषांच्या गरजेच्या गोष्टी वेळेत झाल्या नाही की त्यांचीही चिडचिड सुरू होते.
अशी चिडचिड होणं हा जोडीदाराबरोबरचा संवाद कमी होत असल्याचं लक्षण आहे. सोशल नेटवर्किंगमध्ये लिखित संवाद करून संपर्क वाढवता येतो हे खरं, पण जोडीदाराबरोबरच्या प्रत्यक्ष संवादाने जोडप्यांमध्ये तना-मनाची, भावनिक गरज भागविली जाते व नात्यात प्रेम, जिव्हाळा, विश्वास टिकतो. किंबहुना याच वैवाहिक त्रिसूत्रीचा, सोशल साइटवरील संवादाच्या प्रेमात पुरत्या बुडालेल्या जोडीदारांना विसर पडतोय आणि भावनिक गरज वैवाहिक जीवनात लुप्त होत चालल्यानं मग दोघांपैकी जो थोडा किंवा जास्त पझेसिव्ह असतो. त्याला जोडीदाराचं आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण होते. सुरुवातीला नकळत होणारे दुर्लक्ष थोडं सहन केलं जातं, पण जोडीदार असाच लेखनसंवादात, अर्थात चॅटिंगमध्ये मग्न राहू लागला तर मात्र जोडीदार 'मुद्दामच' दुर्लक्ष करत आहे अशी ठाम भावना मनाला ग्रासून टाकते. मोबाइल नव्हते तेव्हा कामं होतंच नव्हती का, असा विचार येण्याइतपत मन नकारार्थी होतं.
त्यातच चुकून एकमेकांपैकी कुणाच्या लक्षात आलं की, नवरा एखाद्या मैत्रिणीशी आणि बायको तिच्या मित्राशी चॅटिंग करण्यात मग्न असते तर मग चलबिचल अधिकच वाढते. मनच ते, तंत्रयुगात असलं तरी काय झालं? ते लॉजिकली थोडीच चालतं? मग जोडीदाराची मैत्री हा एकमेकांच्या काळजीचा अजेंडा होतो. या दुर्लक्षितपणातून दोन अती तीव्र स्वरूपाचे अविवेकी दृष्टिकोन जोडीदाराच्या मनात जागृत होतात. एक म्हणजे आपण जाणूनबुजून जोडीदाराकडून दुर्लक्षिले जातोय आणि दुसरा विचार आपल्याला कायम गृहित धरलं जातंय! हे अविवेकी विचार इतके वाढतात की संशयकल्लोळाचा भोवरा निर्माण होतो. मग त्याची वा तिची प्रत्येक पोस्ट, रिप्लाय मैत्रीण वा मित्रालाच या निर्णयावरच मन सारखं जात राहातं. आणि मनात निर्माण होते असुरक्षिततेची भावना! ती कोणाहीमध्ये निर्माण होऊ शकते. पण पुरुषांच्या तुलनेत अधिकतर स्त्रिया बोलून दाखवतात. कारण निसर्गत: त्या भावना व्यक्त करण्याला प्राधान्य देतात आणि त्यावर कृती फार उशिरा करतात. तर पुरुष भावना बोलून न दाखवता सरळ कृती करतात. उदाहरण द्यायचं तर आमच्या परीचितांमध्ये तिघा पुरुषांनी व्हॉट्स अॅप, फेसबुक आदी सोशल नेटवर्किंगवर आपल्या बायकांना चॅट करण्यास बंदी घातलीय. कारण काय तर तिचं 'फ्रेण्डस'बरोबरचं सातत्याने असलेलं चॅटिंग! त्यांच्या बायकांनी हे स्वीकारलं का? का स्वीकारलं? हा चर्चेचा विषय, पण हे होतय, अर्थात बायकोने सांगितलं म्हणून पुरुषांनी अशी कृती केलीय, असं उदाहरण अजून तरी माझ्या ऐकिवात नाही. असेल तर उत्तम! कारण सदृढ कुटुंबासाठी हे गरजेचं.
आजही भारतीय कुटुंबामध्ये 'नवरा बायको' मुळेच आपल्या कुटुंबाचं व आपलं अस्तित्व आहे, अशी ठाम भावना आहे आणि हे नातं फक्त विश्वासावरच टिकतं. या विश्वासानेच प्रेम जिव्हाळा वाढून कौटुंबिक कर्तव्याची आदर्शवत पूर्तता केली जाते. अशी विश्वासाची ठाम बैठक असताना आपला जोडीदार आपल्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या गोष्टींना जास्त महत्त्व देतोय हेच पचवणं कठीण असतं. म्हणून एक बाजूला विश्वास असला तरीही आजची बदलती सामाजिक परिस्थिती, मैत्रीची बदलती समीकरणं, कमजोर झालेली जीवनमूल्य, जोडीदाराचं बदलेलं वागणं, या सर्व गोष्टींकडे कितीही समजून घ्यायचं तरी कानाडोळा करताच येत नाही. त्यामुळे समोर घडणारी परिस्थिती आणि जोडीदारावरील विश्वास या मनातील संघर्ष युद्धात मन सत्य परिस्थितीकडेच कौल देतं. असं असलं तरीही दुसरं मन सांगतं की, जोडीदाराविषयी विश्वास ठेवलाच पाहिजे. तुझ्या मनात असं आलंच कसं? या मनाच्या संवादात संघर्ष इतका वाढतो की या समस्येवर तर्कशुद्ध विचार करण्याची ताकद संपते, बरं हा विषय इतका खासगी असतो की तो कुटुंबाच्या प्रतिष्ठेमुळे कुणाशी बोलताही येत नाही. आणि हा भावनिक संघर्ष असाच अधिक काळ राहिला तर निराशा, मग निद्रानाश, रक्तदाब वाढणं हेही घडू शकतं. हे वेळेत संभाळलं नाही तर विभक्त होण्यापर्यंत परिणाम होऊ शकतात!
सोशल साइटस्वरून निर्माण झालेली मैत्रीची नाती ही कशी निर्माण होतात? आणि ती कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकतात हे पहायचं असेल तर इरा आणि सोहिलचं उदाहरण घ्यायला हवं. हे दोघेही विवाहित आणि आपापल्या कामातही अखंड गुंतलेले. दोघंही पस्तिशी दरम्यानचे. एका कम्युनिटी गेट-टूगेदरमध्ये दोन्ही कुटुंबांची ओळख झाली. मग फेसबुकवर एकमेकांनी रिक्वेस्ट पाठवून मैत्री 'केली'. दोघंही आपल्या कुटुंबाचे फोटो फेसबुकवर, व्हॉट्स अॅपवर टाकत. हळूहळू शेअरिंग वाढलं तसं मैत्रीचा फोकस कुटुंबाकडून वैयक्तिक पातळीवर कधी आाला ते इरा-साहिलला समजलेच नाही. त्या दोघांशी बोलताना लक्षात आलं की साध्या मैत्रीला विशेष मैत्रीचं कोंदण लाभलं ते 'इरा'ने टाकलेल्या तिच्या फोटोवरून. तिचा फोटो, तिचं दिसणं, त्याने फोटो 'लाइक' केला विशिष्ट कॉमेंटसह. इराच्या रुटीन आयुष्यात असा 'लाइक' अनेक वर्षांत जोडीदाराकडून कधी मिळालाच नव्हता. त्यामुळे साहिलकडून मिळालेल्या 'लाइक'मुळे मन मोहरलं. तीही मैत्रीत पुढाकार घेऊ लागली. एकमेकाशी सतत चॅटिंग करणं, घरातले, वैयक्तिक, मुलांचे प्रश्न शेअर करणं, सल्ला देणं-घेणं वाढू लागलं, मग चॅटिंग किती करणार. एकदा प्रत्यक्ष भेटून कॉफी पिऊ, या पुढाकारानं मैत्री वाढत राहिली. ही मैत्री इतकी वाढली की कौटुंबिक महत्त्वाच्या कार्यक्रमाला दांडी मारून एकमेकांना भेटणं सुरू राहिलं. असं वर्षभर मैत्रीचं 'गुडी-गुडी' शेअरिंग, भेटणे सुरू झालं. पण नंतर इराच्या लक्षात आलं की तिच्या आणि नवऱ्याच्या संबंधाबाबत तो पझेसिव्ह होतोय. तू नवऱ्याबरोबर फिरायला जायचं नाहीस. तू फक्त माझ्याबरोबर शेअरिंग करायचं, असं सांगणं सुरू झालं. मग मात्र इराला साहिलची 'दखल घेणं' सहन होईना. भांडणाला सुरुवात झाली. इरा आता अशा मन:स्थितीत आहे की साहिलशी मैत्री मर्यादेपर्यंतच हवीय, पण त्याचं तिच्या कौटुंबिक आयुष्यात दखल देणं नकोय. आपण या नात्यात इथेच थांबूया, असं इराने त्याला सांगितलंय तर साहिल ती कृतघ्नपणे वागतेय, स्वार्थी आहे, असं म्हणतोय. या घडामोडीमुळे दोघेही अस्वस्थ, चिडचिडे बनलेत. मैत्रीचा आनंद तर कधीच विरलाय. या नात्याला कोणताही सामाजिक, कायदेशीर आधार नाही त्यामुळे ब्रेकअप घेता येत नाही. आणि मैत्रीत वैयक्तिक शेअरिंग इतकं केलेलं असतं की दोघांना आपल्या जोडीदाराला कळलं तर कुटुंब उद्वस्त व्हायची भीती! म्हणून साहिलची मैत्री तुटली तर मनाला खूप दु:ख होईल आणि मैत्री ठेवली तर वैयक्तिक, कौटुंबिक आयुष्यात वेदनेशिवाय काहीच मिळणार नाही, अशा वळणावर इरा येऊन पोहचलीय. समृद्ध वैवाहिक जीवनाचा जोडीदारही हवाय व मन उल्हसित होणारी मैत्रीही या हव्यासापोटी हे वळण दोघांच्यात निर्माण झालंय!
अशीच मैत्री आणि त्याचे गहिरे रंग निर्माण झाले जिग्नेश व काव्या यांच्या जोडीत. अगदी बी. पी. चित्रपटाला शोभेल असं शाळेच्या कोवळय़ा वयातील पहिलं प्रेम, त्यावेळी अव्यक्त. मनाच्या तळाशी जाऊन लुप्त झालेलं, पण सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून ते सुमारे ४० वर्षांनी भेटले. दोघंही आपापल्या कुटुंबात रमलेले. मनाच्या तळाशी लुप्त झालेलं प्रेम एकमेकांना पाहिल्यावर कधी उसळी मारून बाहेर आलं ते कळलच नाही. त्यात मैत्रीचं, प्रेमाचं शेअरिंग, 'लाइक्स' आल्या आणि संवादातून गोंधळ वाढला. त्यांनाही एका वळणावर हे कुटुंबाच्या दृष्टीनं योग्य नाही हे कळतंय पण वळत नाही!




रोहन आणि कुहू एकाच क्षेत्रात, पण प्रतिस्पर्धी कंपनीत कार्यरत. एका कॉन्फरन्समध्ये भेट झाली. छान मैत्री झाली, हळूहळू गहिरी झाली. अशाच एका क्षणी त्याने महत्त्वाच्या प्रोजेक्टची माहिती सहज शेअर केली. कुहू काही गुप्तहेर नव्हती, पण स्पर्धेत वरचढ राहण्यासाठी तिने या माहितीचा व्यावसायिक उपयोग केला. आणि मोठा प्रोजेक्ट मिळवला. हे जेव्हा रोहनला कळले त्यावेळी मैत्रीत फसवलो गेलो, या भावनेबरोबरच कंपनीशी कृतघ्नपणे वागलो, व्यावसायिक मूल्य जपू शकलो नाही. या अपराधी भावनेने त्याला उद्ध्वस्त केले.
म्हणूनच असे शरीर-मन-कौटुंबिक नात्यावर होणारे दुष्परिणाम टाळणं हे केवळ आपल्याच एका 'क्लीक'वर अवलंबून आहे. अॅप्सचा, चॅटचा 'व्हायरस' आपल्या नात्यात आलाय का, येऊ घातलाय का? हे विवाहितांनी तपासायला हवं. हे तपासण्यासाठी अर्थात प्रत्यक्ष शाब्दिक संवादच करावा लागेल. तोही न रागावता व चिडता. नात्यात काहीतरी बिघडतंय आणि सुधारता येत नसेल तर तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी.
इंटरनेट, सोशलनेटवर्किंगचा नात्यांवर खूप खोल परिणाम होऊ लागला आहे. म्हणून आपल्या देशातीलच नाही तर जगातील संशोधक, समाजशास्त्रज्ञ कळवळीनं सांगताहेत, कुटुंब असलेल्यांनी सोशल नेटवर्किंगमध्ये 'लाइक' करताना एक क्षण थांबा, याचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचार करा आणि मगच 'लाइक' करा. कारण एका 'लाइक'वर तुमच्या कुटुंबाचं 'लाइफ' अवलंबून आहे.
(लेखांतील व्यक्तींची नावे बदललेली आहेत.)    






Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search