११/२४/२०१४
जन्म:- २९ जुलै १९२२
बाबासाहेब पुरंदरे मराठी इतिहाससंशोधक...छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक…इतिहासाच्या अभ्यासाबरोबरच तो अतिशय रोचकपणे सांगण्याची कला अवगत असलेले... शिवचरित्र केवळ अभ्यासणारे नव्हे, तर ते जिव्हाळ्याने अनुभवणारे आणि जणू शिवकाळातच राहून शिवचरित्र अक्षरश: जगणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे...!!
‘इतिहासातून राष्ट्राचे शील शोधायचे असते, केवळ तहांचा आणि लढायांचा तपशील नव्हे’ असा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून शिवचरित्र साकारणारे...आपल्या लेखनातून व व्याख्यानांतून शिवकाळ महाराष्ट्राच्याकानाकोपर्याेत पोचवणारे बाबासाहेब पुरंदरे... “इतिहास माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळणाघरापर्यंत गेला पाहिजे, इतकंच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,” असे म्हणणारे शिवशाहीर बाबासाहेब हे एकमेवाद्वितीयच...!!!
शिवचरित्र म्हणजे बाबासाहेबांचा श्वास आहे, प्राण आहे. शिवप्रेमानं झपाटलेले ‘शिवशाहीर’ बाबासाहेब पुरंदरे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहेत.... सातारच्या राजमाता “सुमित्राराजें”नी बाबासाहेबांना दिलेली ही पदवी बाबासाहेबांबरोबरच महाराष्ट्रानंहीशिरोधार्य केली.
बाबासाहेब पुरंदरे उर्फ बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांचा जन्म जुलै २९, १९२२ पुणे जिल्ह्यातील सासवड या गावी झाला... पण प्लेगच्या साथीमुळे ते स्थलांतर करून पुण्याला स्थायिक झाले...शिक्षण कला संस्कृतीचे माहेरघर असलेल्या पुण्यात त्यांचे बालपण गेले... संस्कार हे शिकवण्यापेक्षा अधिक रक्तातून येतात, आई-वडिलांच्या आचरणातून सहज मिळतात. घरातल्या वातावरणातून मिळतात...बाबासाहेबांचा काळ हा संस्कारवर्गाचा नव्हता. माणुसकी, प्रामाणिकपणा, दातृत्व, शिवाजी प्रेम, देशभक्ती हे सारे संस्कार त्यांना घरातच, वडिलांकडून मिळाले. वडिलांच्या आणि त्यांच्या गुरुजनांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तसेच समाजाकडून, संस्थांकडून होणाऱ्या संस्कारांनी बालपणापासूनच बाबासाहेबांचं जीवन, चारित्र्य घडत गेलं, विकसित होत गेलं, समृद्ध होत गेलं.... पण इतिहासाचे खरे वेड लागले ते त्यांच्या वडिलांमुळे... त्यांनी चिरंजीवांना लौकिक शिक्षणातच न रामावता रामायण,महाभारत,साधुसंत आणि वयाच्या ६व्या वर्षापासूनच शिवरायांच्या गडकिल्ल्यात घुमवायला सुरवात केली..आणि त्यांची एका अलौकिक वाटेने सुरवात केली...तरुणपणीचबाबासाहेबांना जणू शिव्रताची दीक्षा दिली..तर ती दीक्षा अंगीकारत बाबासाहेबांनी महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्या, भुईकोट, किल्ले, जलदुर्ग, डोंगरी किल्ले, भुयारे यांना शिवप्रभुंची आन घातली अन् तीनशे वर्षापेक्षा जास्त काळ उराशी बाळगलेले गुपित मोकळे करायला लावले.
शिवाजीमहाराजांबद्दल प्रेम, आदर, अभिमान वाटणं, त्यांच्याविषयीच्या कथा ऐकून रोमांचित होणं वेगळं आणि या प्रेमानं भारावल्यामुळे प्रामाणिक शिवचरित्र लिहिण्याचा संकल्प करणं वेगळं- तेही छानछोकी आणि मौजमजेचं मानल्या गेलेल्या वयात.. बालवयापासूनच आवेशपूर्ण शब्दांत शिवचरित्रातील थरारक घटना सांगून आपल्या सख्यासोबत्यांनामंत्रमुग्ध करून सोडणं हा बाबासाहेबांच्याव्यक्तित्वातील वक्ता आणि कलाकाराचा आरंभ होता, तर कुलोपाध्याय वासुदेव कवी गुरुजींना शिवचरित्र लिहिण्याचा शब्द देणं हा त्यांच्यातील इतिहास अभ्यासक आणि संशोधकाचा आरंभ होता.
इतिहासाच्या अभ्यास आणि संशोधनाकरिता आवश्यक ऐतिहासिक कागदपत्रं आणि अन्य साधनं मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी भारत इतिहास संशोधक मंडळाचा आश्रय घेतला.. शिवचरित्राच्या निर्माणासाठी मिळतील ती साधनं अभ्यासताना बाबासाहेबांनी इतिहास संशोधक मंडळात रात्रंदिवस अपरिमित कष्ट घेतले. प्रस्थापित इतिहास संशोधकांच्या विक्षिप्तपणाचे भरपूर फटकेही खाल्ले... सरकारी-बिनसरकारी, मराठी, उर्दू, फारशी, इंग्रजी सारी दफ्तरे धुंडाळली...शिवकालीन सरदार, दरकदार, साधुसंतांचे वंशज आणि महाराष्टारील तमाम दैवतांना शिवलीला सांगण्यासाठी “दार उघड बायोSSS” म्हणून जणू विनवणी घातली.. जिथे जिथे छत्रपतींची सोन्याची पाऊले पडली, तिथे तिथे पायी, सायकल, बैलगाडी, मोटार, होडी, जहाज, विमान मिळेल त्या साधनाने जाऊन, हजारो मैलाचा प्रवास करीत आपल्या लेखणीने शब्दांची रांगोळी घालायला सुरवात केली...आणि शिवचरित्र आकार घेऊ लागले.
पण...!!! या सर्वांमध्ये अर्थार्जन तर राहूनच गेले... त्यात वडिलांच्या निधनानंतर अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत ‘राजा शिवछत्रपती’च्याछपाईकरता पैसा जमवण्यासाठी बाबासाहेबांनी मुंबईच्या बाजारात कोथिंबिरीच्या जुड्या विकण्यापासून तर गावोगाव भ्रमंती करून स्वत:ची आणि इतर लेखकांची पुस्तकं विकण्याचा खटाटोपही केला.. नियतीने शिवप्रभुंची एकेकेळी अशीच द्रव्यपरीक्षा घेतली होती आता शिवशाहीराची घेतली..!! पण सर्व संकटांवर मात करत शेवटी शिवचरित्र “राजा शिवछत्रपती” अवतरले.. त्यांच्या झपाटून टाकणाऱ्या ‘राजा शिवछत्रपती’या गद्य काव्याने तर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले.
परदेशातल्या शिवभ्रमंतीत १९७८ साली बाबांना रोम जवळील एका गावात क्यारेकेला नावाचे एक महानाट्य बघण्याचा योग आला... युद्धाच्या पार्श्वभूमीवर एका प्रेमकथेचा आधार घेऊन ही मंडळी एक महानाट्य बनवतात...मग ज्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग एक महानाट्य आहे. त्या शिवप्रभूंच्या जीवनावर असेच महानाट्य का बनवता येणार नाही...या कल्पनेला बाबासाहेबांनी ११ वर्ष अथक परिश्रम करून साकार केले आणि उभे राहिले ते अदभूत, भव्य असे समूह नाट्य “जाणता राजा”..... या महानाट्याने भारतात नव्हे तर परदेशातही इतिहास घडवला.. ४० लाखांपेक्षा जास्त शिवप्रेमींनी हा आनंद सोहळा “याची देही याची डोळा” अनुभवला.. जनता जनार्दनानेही बाबांवर सत्कार, पदव्या, मानमातराब, धनाची मुक्त हस्ताने उधळण केली. पण , या कार्मयोग्याने “जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी” या तुकोबांच्या वचनाप्रमाणे लिहिण्याचे, व्याख्यानाचे पैसे गरजू व्यक्ती, संस्थाना वाटून टाकून पुन्हा विरक्तच राहिले.
बालकलाकार बाबांसाहेबांना केवळ नकलाकार न राहता स्वतंत्र कलाकार बनण्याची प्रेरणा दिली ती स्वा. सावरकरांच्या “आयुष्यभर केवळ लोकांच्याच नकला करू नकोस. स्वत:चं म्हणून काहीतरी असू दे” या शब्दांनी... त्या क्षणापासून बाबासाहेबांनी नकला करणं सोडलं खरं, पण आज आपल्या अमोघ, चैतन्यमय वक्तृत्वानं हजारो श्रोत्यांना एकाच वेळी शिवरसात चिंब भिजवून काढणारे बाबासाहेब म्हणतात, “मी आजपर्यंत जे करतोय तीसुद्धा एक नक्कलच आहे. फक्त ती माझ्या वडिलांची आहे.” बाबासाहेबांच्यावक्तृत्वावर त्यांच्या वडिलांच्या बोलण्याच्या शैलीची छाप तर आहेच, त्याबरोबरच वर्षांनुवर्षांची मैत्री असलेल्या गोंधळी, कीर्तनकार, निरूपणकार, शाहीर, चित्रकथी, तमासगीर, भारुडी, भुत्ये वासुदेव अशा लोककलाकारांचाहीप्रभाव त्यांच्या वक्तृत्वावर आहे.
बाबासाहेबांच्याकळत्या वयापासून त्यांचं अखंड जीवन केवळ आणि केवळ शिवप्रेमानं भरलेलं आणि भारलेलं आहे. बालपणापासून ते अद्यापपर्यंत त्यांनी सिंहगड, पुरंदर, राजगड, रायगड अशा गडांना वारंवार दिलेल्या भेटी, देशातच नव्हे परदेशातही केलेली भटकंती, विशेषत: ऐतिहासिक स्थळांना आणि ग्रंथालयांना दिलेल्या भेटी, पन्नास-साठ र्वष देश-विदेशात हजारो लोकांसमोर दिलेली हजारो व्याख्यानं आणि सर्वावर कळस म्हणजे बाबासाहेबांचं गद्य महाकाव्य ‘राजा शिवछत्रपती’ आणि त्याचं भव्य समूहनाटय़ ‘जाणता राजा’.. यापैकी कुठलीही गोष्ट त्यांनी वेळ घालवण्यासाठी, केवळ मनोरंजनासाठी किंवा पैसा मिळवण्यासाठी केलेली नाही. या सर्वामागे भव्य आणि उदात्त असा उद्देश आहे. आत्यंतिक परिश्रमानंतर बाबासाहेबांनी या सगळ्यातून भरपूर पैसा मिळवला आणि कसलाही गाजावाजा न करता दोन्ही हातांनी तो शिवकार्यासाठी, समाजासाठी दिलाही...’शिवचरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे’ हे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत पटवून दिले.
आपल्या भव्य शिवस्वप्नांच्यापूर्तीसाठी आणि शिवचरित्राच्या प्रसारासाठी वैयक्तिक प्रयत्न पुरेसे न वाटून बाबासाहेबांनी त्यासाठी १९६७ मध्ये ‘महाराजा प्रतिष्ठान’ची स्थापना केली. शिवाजीमहाराजांचं संपूर्ण जीवनचरित्र चित्रं, शिल्पं, चित्रपट, वस्तूंच्या रूपानं एखाद्या किल्ल्यावर उभं करणं हे बाबासाहेबांचं भव्य स्वप्न आणि बाबासाहेबांचा जीवनोद्देश आहे.. अंश रूपानं अकलूजकर मोहित्यांच्या सहाय्यानं अकलूजमध्ये हे स्वप्न उभं राहिलं आहे. १९७४ मध्ये शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकाला ३०० वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्तानं अनेकांच्या साहाय्यानं बाबासाहेबांनी परिश्रमपूर्वक मुंबईत शिवसृष्टी उभी करून हजारो लोकांना शिवाजीमहाराजांचं जीवनदर्शन घडवलं... इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा -वेडेपणा, प्रखर बुद्धिमत्ता, विश्र्लेषण क्षमता आणि प्रेरक इतिहास अभिव्यक्त करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला आदी गुणांसह सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातदिसतात.. सध्या पुण्याजवळ आंबेगावात कायमस्वरूपी शिवसृष्टी उभारण्याच्या प्रचंड कामात बाबासाहेब गुंतलेले आहेत.
आज वयाच्या नव्वदीतही शिवचरित्राचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचे त्यांचे अथक प्रयत्न चालूच आहेत. शिवचरित्राच्या संस्कारातून तरुण पिढीत देशप्रेम, राष्ट्रीय चारित्र्य निर्माण व्हावं ही त्यांची तळमळ, शिवचरित्र ब्रह्मांडाच्याही पलीकडे घेऊन जाण्याची त्यांची इच्छा आहे.. बाबासाहेब वक्ता दशसहस्रोषु आहेत, शिवचरित्रकार आहेत, कलावंत आहेत, अभिनेता आणि दिग्दर्शकही आहेत. आपल्या या सगळ्या पैलूंच्या माध्यमातून खेडय़ापाडय़ातील माणसांपर्यंत शिवचरित्र पोचविण्यासाठी ते अजूनही प्रयत्नशील आहेत.
डॉ. सागर देशपांडें यांनी ‘बेलभंडारा” या पुस्तकात बाबासाहेबांच चरित्र लिहिलंय .... सुमारे ११ वर्षे परिश्रम घेऊन डॉ. देशपांडे यांनी बाबासाहेबांसारख्या एका भारतमातेच्या दिग्गज सुपुत्राचं शिवाव्रती शिव शाहिराच चरित्र भव्यतेनं, कलात्मक पद्धतीनं सादर केलं आहे...
पिताश्रींच्या प्रेरणेने बाबासाहेबांच्यामनाचे तळे शिवचरित्र संशोधन , लेखन ,कथन यांनी काठोकाठ भरले .. तिथे शिवालीलेची सुवर्णकमळे फुलली , अपार भ्रमंतीचा बेलावृक्ष उभा राहिला.... बाबांनीही शिवकथाकमलांनी भारतमातेची पूजा केली आणि तिला सातासमुद्रा पार नेली..... या महाराष्ट्राच्यासुपुत्रावर मानसन्मानाचा भंडारा पुन्हा पुन्हा उधळला.....!!!
आयुष्यभर शिवचरित्राला जगणाऱ्या अशा या शिवप्रेमानं झपाटलेल्या शिवशाहिराला मानाचा मुजरा...!!!
जय शिवराय !!
जय महाराष्ट्र !