११/१३/२०१४

मुंबईचं ‘फॅशन स्ट्रीट’ होतंय ‘अप टू डेट’!



फॅशनच्या बाबतीत नेहमीच ‘अप टू डेट’ राहणारं फॅशन स्ट्रीट आता व्यवसाय आणि पादचाऱ्यांच्या सोयीसाठीही ‘अप टू डेट’ होत आहे.

फॅशन शोमध्ये रॅम्पवरचे कपडे लाखो रुपयांना विकत घेतले जात असताना त्याच प्रकारची डिझाइन पुढच्याच आठवड्यात फॅशन स्ट्रीटला सहज उपलब्ध होत असतात.

मुंबईत चर्चगेट स्टेशनपासून अगदी दोन मिनिटांवर असलेल्या फॅशन स्ट्रीटवर कॉलेजच्या मुलामुलींची नेहमीच गर्दी असते.

फुटपाथवर मांडलेले स्टॉल आणि तेथील झुंबड अनेकदा वाहतुकीसाठी तसंच पादचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरतात.

पालिकेकडून अनेक वर्षे कारवाई होऊनही ही दुकानं आणि त्यांची लोकप्रियता कायम राहिली आहे.

त्यामुळं ही दुकानं आणि फुटपाथ दोन्हींसाठी उपयुक्त ठरणारा मधला मार्ग पालिकेनं दोन वर्षांपूर्वी शोधून काढला.

आता तो अंतिम टप्प्यावर आला असून दोन महिन्यात फॅशन स्ट्रीटच्या सुशोभिकरणाला सुरुवात होणार आहे.

पुढील दोन महिन्यात सुशोभिकरणाचे काम सुरू करण्यात येत असून या रस्त्यावरील फेरीवाल्यांची दुकानं योग्य पद्धतीनं लावली जातील.

त्यामुळं क्रॉस मैदानाची भिंतही मोकळी होईल आणि फुटपाथ मोकळा झाल्यानं पादचाऱ्यांना चालतांना अडचणी येणार नाहीत.

क्रॉस मदानापासून मेट्रो सिनेमापर्यंत जाणाऱ्या या मार्गावर पालिका प्रकाशासाठी दिवेही लावणार आहे.

तसंच पालिकेची चौकी इतरत्र हलवण्यात येणार असून अनधिकृत बांधकामं तोडली जाणार आहेत.

सध्या एकाच दिशेनं असलेली दुकानं एकमेकांसमोर उभी केली जाणार आहेत.

त्यामुळं खरेदी करणाऱ्यांनाही फायदा होईल तसंच फुटपाथ मोकळा झाल्यानं चालणाऱ्यांची अडचण होणार नाही.

काही ठिकाणी तुटलेला फुटपाथ नीट केला जाणार असून अनधिकृत पार्किंग करणाऱ्या गाड्यांसाठी सूचना फलकही लावले जातील.

त्यामुळं या रस्त्यांवर सध्या दिसत असलेला गोंधळ कमी होईल आणि सर्वांनाच याचा फायदा होईल. त्यामुळं नव्या रूपातील फॅशन स्ट्रीटवर शॉपिंग करायला तयार राहा.

-  झी २४ तास

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search