११/१५/२०१४

रिव्ह्यू : मनाला स्पर्शून जाणारी 'एलिझाबेथ एकादशी'


स्क्रीनवर फिल्म सुरू होण्यापूर्वी मयसभा असं येतं, त्यावेळीच मनात बरेच तरंग उमटलेले असतात. अगदी समुद्रसारखं अतुल कुलकर्णीसोबत ज्यावेळी परेशने नाटक केलं त्यावेळी माझ्या आयुष्यात मयसभा आली. संगीत डेबूच्या मुलीपासून परेशचं वेगळेपण जाणवलं. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी असेल, संगीत लग्नकल्लोळ असेल वा समुद्र मग अगदी हरिश्चंद्राची फॅक्टरीपर्यंतचा प्रवास मग त्याच्यामधील वेगळेपण जाणवून दिलं. इतिहासाबद्दल त्याला वाटणारं कुतूहल...विज्ञान अन् पुराण या सगळ्याची त्याने घातलेली सांगड आतापर्यंत त्याच्यामधलं वेगळेपण कायम अधोरेखित करणारं होतं. आता सिनेमाच्या नावावरूनच घ्या ना...'एलिझाबेथ एकादशी'...हे नाव काही क्षणांसाठी तुम्हाला स्तिमित करतं...थांबून थोडा विचार करायला लावतं.

'एलिझाबेथ एकादशी'मध्ये ज्या पद्धतीने त्या मुलांच्या गँगला प्रेझेण्ट केलंय. त्याची मांडणी, त्याचे सादरीकरण, त्यांच्या तोंडी असणारी वाक्यं, त्यामधला साधेपणा अन् त्यामधली अर्थगहनता, त्या साऱ्या गोष्टींचा मेळ ज्या प्रकारे परेश मोकाशीने घातला आहे, त्यामध्ये खरी गंमत आहे. दीड तासाचा हा खेळ करण्यात त्याने दाखवलेली कल्पकता. कारण सुमारे दोन तासाचा ओढून ताणून सिनेमा बनवण्यात धन्यता न मानता ती गोष्ट अन् त्याचा आवाका लक्षात घेता, त्याची केलेली मांडणी आपल्यामधल्या प्रेक्षकाला नक्कीच भावेल. कारण सिनेमाच्या सादरीकरणात असलेला साधेपणा हे त्याचं शक्तीस्थान आहे

मुळात चेहरे ओळखीचे नाहीत. त्यामुळे नवं पुस्तक वाचताना त्याच्या पात्रांशी आपली तोंडओळख जशी होते. त्या भावविश्वात आपण कसे गुंतलो जातो, ती सगळी प्रोसेस-प्रक्रिया आपण या सिनेमात एन्जॉय करू लागतो. त्यांच्या दु:खाशी समरस होतो, त्यांच्या उत्सुकतेने आपण हुरळून जातो, त्यांच्या प्रयत्नांना दाद द्यायला उद्युक्त होतो. या सिनेमामध्ये थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, ज्या पद्धतीने अप्लाय केली आहे, ते पाहताना आपल्याला जाणवतं की, आपण ज्या प्रकारे या सिनेमाशी कनेक्ट होतो. त्यामधली पात्र असतील वा त्यांचे प्रॉब्लेम्स आपण त्याच्याशी समरस होतो, तिथे परेश मोकाशी जिंकलेला असतो.

बाबांशिवाय चालणारं घर...आईवर दोन मुलांची जबाबदारी ज्ञाना, झेंडु अशी दोन गोंडस, गुणी बाळं. आईला त्यांच्या आजीसोबत या दोघांच्या शिक्षणाचा खर्च, उदरनिर्वाहाचा ताळमेळ बसवण्यात तिची जद्दोजहद सुरू आहे. त्यासाठी तिने शिवणकामाचा विडा उचललाय, पण त्यासाठी आणलेल्या मशीनच्या मागे शुक्लकाष्ठ लागलंय. ते संपवण्यासाठी हे चिल्लीपिल्ली काय करतात, त्याची रंजक कहाणी म्हणून 'एलिझाबेथ एकादशी'कडे पाहता येईल.

माजिद माजिदीचा 'चिल्ड्रेन्स ऑफ हेवन' आपल्या मनात घुमतो. मुलांच्या भावविश्वावर ज्या पद्धतीने तो बोलतो, तितक्याच प्रभावीपणे बोलण्याची ताकद परेशमध्ये आहे, याची जाणीव अन् चुणूक आपल्याला हा सिनेमा पाहताना होते.

त्यामधील मुलांच्या भावविश्वातलं अंतरंग ज्या पद्धतीने टिपलं आहे, त्यांचे स्वभाव अन् त्यासगळ्यांमधला मैत्रीचा बंध, त्यामधल्या निरागस भावविश्वाने आपल्या मनात वेगळं घर करतो. कारण इतकं निरागस विश्व आपलं आहे का, त्यामधल्या माणसांचे स्वभाव अन् त्यामधील विषयांना आपलं रिअॅक्ट होणं हे तितकं साधंसोप्पं राहिलंय का, हा प्रश्न आपला आपण विचारून पाहिला तर त्याचं उत्तर जे मिळतं. त्यामध्ये हा निरागसपण मिसिंग आहे, याची जाणीव आपल्याला पटकन होते.

पंढरपूरच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सिनेमामध्ये संत न्यूटन अन् संत आइनस्टाइन करण्याची त्यांची पद्धत...जबरदस्त...त्या नियमांचा आयुष्याशी असणारा अन्वय ज्या पद्धतीने सांधला आहे, ते पाहणं आपल्याला थक्कं करतं. मित्रांचं एकमेकांशी असणारं नातं, आपल्याकडे पुस्तक नसतानाही दुसऱ्याची गरज ओळखून त्याला देण्याची जाणीव या गोष्टी इतक्या सहजपणे सांगून जातो. घरची असणारी बेताची परिस्थिती, त्याची मुलांना असणारी जाण, आपली आई काय काय करते, या सगळ्यावर त्यांची असणारी रिअॅक्शन, त्यांचं व्यक्त होणं अन् त्यामधून त्यांनी शक्कल लढवणं अन् त्यामध्ये होणारी फसगत अन् त्यावर उत्तर मिळतं. बाबांनी बनवलेली एलिझाबेथ ही सायकल...विकू द्यायची नाही, इथपासून पैसे जमावण्याच्या द्वादशीपर्यंतचा खेळात एकादशीला घडणाऱ्या या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व. त्यामध्ये काही गोष्टींची उत्तरं शोधण्यासाठी आपण प्रश्न सोडवायलाच लागतात असं नाही. काही घटनांच्या परिणामांमध्ये कधी कधी आपले प्रश्न आपसूक सुटलेही जातात, या सगळ्यासाठी चांगुलपणावर, प्रामाणिकपणावर अन् एकूणच आपल्या आयु्ष्यातून निघून जात असलेल्या मूल्यव्यवस्थेवर परेश मोकाशी ज्या प्रकारे भाष्य करतो, ते लाजबाब आहे. आख्यानातून वा कीर्तनातून एखादी गोष्ट सांगण्याची पोहोचवण्याची जी क्लृप्ती केली जाते ती लाजबाब आहे.
श्रीरंग महाजन हा चिमुरडा आपली छाप पाडतो. त्याच्या व्यक्त होण्यामध्ये असणारी स्वाभाविकता...त्याच्याकडे असणारा सहजपणा आपल्याला थक्क करतो. त्यामध्ये त्या प्रकारची गंमत आहे. त्याच्या जिवामध्ये होणारी घुसमट, सध्यपरिस्थितीवर काढलेला त्याने तोडगा, त्यासाठी करावे लागणारे कष्ट, मित्रांशी असलेलं त्याचं नातं, या साऱ्यामध्ये एक सच्चेपणा आहे, तो खरेपणा ती निरागसता आपल्याला भावते. सायली भंडारकवठेकरने साकारलेली झेंडू आपल्या चांगलीच लक्षात राहते कारण तिची बोलण्याची ढब अन् त्यासोबत तिचा असलेला वावर. या सगळ्यात शाबासकी घेऊन जातो तो गण्या. त्याची रेड्याची असलेली रिंगटोन इथपासून ते त्याचा असणारा वावर. सहज बोलण्यात येणाऱ्या शिव्यासदृश शब्द या सगळ्याला त्याने ज्या प्रकारे वळण दिलंय अन् त्याच्या वागण्याबोलण्यातला मस्त फॅक्टर आहे तो अनुभवण्याजोगाच आहे. त्यामध्ये एक सामाजिक भानही वेगळ्या अर्थाने जपलं गेलं आहे.

वेश्यावस्तीमध्ये राहणारा त्यांच्या शाळेत असलेला महादेव त्याचं या सगळ्या सिनेमातलं अस्तित्त्व... कान्होपात्राचं झाड... कान्होपात्रा ते गणिका अन् महादेवची आई अशी लिंक शोधण्यामधलं त्या पार्श्वभूमीवर दाखवलेली गोष्ट निश्चितच कमालीची आहे. नंदिता धुरीने साकारलेली आई जिवंत वाटते. तिचा त्रागा, तिचं वावरणं, आपण मुलांना मारल्यानंतर काही वेळाने मुलांना जवळ घेणं वा त्या क्षणी तिच्या डोळ्यात आलेलं पाणी त्या सगळ्यामध्ये एक मायेची ओल आहे. ती आपल्याला अभावाने पाहायला मिळते.

परेश मोकाशीने दिग्दर्शक म्हणून असलेली प्रगल्भता 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'मध्ये दाखवली होती, पण इथे त्यामधल्या मनाचा हळवेपणा अन् त्यामध्ये पुराण अन् विज्ञानाची कास धरण्याचा केलेला प्रयत्न कमालीचा आहे.

मधुगंधा कुलकर्णीच्या या गोष्टीला परेशने दिलेला न्याय चोख आहे. परेश अन् मधुगंधाच्या लिखाणात असलेलं प्रवाहीपणा हा कमालीचा आहे तो आपल्या पटकथा अन् संवादामध्ये दिसतो.

पहिल्या फ्रेममध्ये विठ्ठलाचं घडणारं दर्शन ते प्रत्येक फ्रेम नजाकतभरी करण्यापेक्षा त्यामधल्या वास्तववादाला स्पर्श करणारा बोलक्या सिनेमॅटोग्राफीमुळे सिनेमाला चार चाँद लागले आहेत. त्यामुळे अमोल गोळेचं विशेष कौतुक करायला हवं.

या सिनेमाचं संगीत हे विशेष वाटतं कारण ते एकीकडे आपल्या मनात रूंजी घालतं. ते बडबडगीतासारखं वाटत असलं तरी त्यामधील असणाऱ्या शब्दांमध्ये गेयता आहे. त्यामधला नाद हा स्वर्गीय आनंद मोडकांनी ज्याप्रकारे टिपला आहे. त्याला आपसूक दाद तुमच्या मनातून मिळेल. नरेंद्र भिडेच्या पार्श्वसंगीतातही ती जादू आहे. त्या सगळ्याचा पोत ओळखून नरेंद्रने तो रंग भरला आहे हे महत्त्वाचं आहे.

परेश, मधुगंधा अन् मुलांसाठी त्यांच्या भावविश्वाच्या अंतरंगात एक इंद्रधनु आहे. त्याचे रंग हे नेहमीच्या सात रंगांपलीकडचे आहेत. म्हणून एलिझाबेथ एकादशी आवर्जून पाहायला हवा...


-abpmajha

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search