११/२५/२०१४
मुंबईतील अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमीपूजनासाठी शिवजयंती म्हणजेच 19 फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.
यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसं निमंत्रण पाठवलं आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी ठाण्यात याबाबतची माहिती दिली.
“अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या भव्य स्मारकाचं भूमीपूजन, 19 फेब्रुवारी 2015 रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली, गिरगाव चौपाटी इथं हे भूमीपूजन होईल”, असं मेटे म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयानं मात्र अजूनही तारखेबद्दल निश्चित माहिती दिलेली नाही. पण गेली अनेक वर्ष रखडलेला अरबी समुद्रातल्या महाराजांच्या स्मारकाचं काम यानिमित्तानं दोन ते तीन महिन्यात सुरू होईल, अशी चिन्हं मात्र दिसू लागली आहेत.
फडणवीस सरकार सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी याविषयी एक विशेष बैठक घेऊन लवकरच भूमीपूजन करणार असल्याची माहिती दिली होती.