७/२२/२०१४

ट्रेकिंगला जाताय? गोटेन्ना सोबत ठेवा!



सध्या स्मार्टफोनची खूपच क्रेझ आहे. एकवेळ ऑक्सिजन नसला तरी फरक पडणार नाही; पण स्मार्टफोन पाहिजेच अशी अवस्था आहे. यातील गमतीचा भाग सोडून देऊया. पण स्मार्टफोन ही काळाची गरज होऊन बसली आहे. स्मार्टफोनवरील अवलंबन वाढल्यामुळे जेथे अद्याप रेंज नाही, तेथे गेल्यानंतर खरी अडचण होते. हल्ली ट्रेकिंग अथवा पावसाळी पर्यटन वाढले आहे. अशा ठिकाणी गेल्यानंतर पर्यटकांना मुख्यतः आवश्यकता भासते ती मोबाइल रेंजची...डोंगराळ भाग अथवा घनदाट जंगलांत संवाद साधता येत नाही. वैद्यकीय उपचार मिळविण्यातही अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कच्या रेडिओ हार्डवेअर निर्मात्या कंपनीने 'गोटेन्ना' हे वायरलेस उपकरण केले आहे. ज्या ठिकाणी मोबाइलची रेंज नाही अथवा वायफाय सिग्नल मिळत नाहीत, अशा ठिकाणी 'गोटेन्ना' स्मार्टफोनशी कनेक्ट केले असता किमान गरजेपुरती कनेक्टिव्हिटी मिळते, असा कंपनीचा दावा आहे. 'गोटेन्ना' हे पेनसारखे सहा इंची उपकरण असून, ते आयओएस अथवा अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टमवर चालते. निर्जन ठिकाणी ज्या व्यक्तींना एकमेकांशी संपर्क साधायचा असेल, त्यांच्याकडे 'गोटेन्ना' असायला हवे. या उपकरणाच्या माध्यमातून ते एकमेकांशी सहज संवाद साधू शकतात. 

कमी फ्रिक्वेन्सी अथवा कमी रेडिओ लहरींवर कार्य करणारे हे उपकरण ५० मैल परिसरात स्वतःचे नेटवर्क तयार करते आणि ज्यांच्या मोबाइलमध्ये 'गोटेन्ना'चा समावेश आहे; त्यांच्याशी संपर्क साधते. हा संपर्क कॉलिंगच्या स्वरुपात न होता प्रायव्हेट चॅट मेसेजेसच्या माध्यमातून होते. हे मेसेज संपूर्ण सुरक्षित असून, त्याचा कसलाही गैरवापर होत नसल्याचा कंपनीचा दावा आहे. एकदा उपकरण खरेदी केल्यानंतर ते कायमची मोफत सेवा देते. त्यासाठी केवळ 'गोटेन्ना'चे डोंगल असायला हवे. चॅटिंगशिवाय 'गोटेन्ना'चे स्मार्टफोन अॅपही (अँड्रॉइड आणि आयओएस) आहे. या अॅपच्या माध्यमातून निर्जनस्थळी अथवा जेथे मोबाइलची रेंज नाही अशा ठिकाणी गेल्यानंतर तपशीलवार ऑफलाइन मॅप अथवा ग्रुप मेसेज पाठविण्याची सोय आहे. 'गोटेन्ना'चे डोंगल हे पाणी आणि धुळीला दाद देत नाही. डोंगलसमवेत मायक्रो यूएसबी कनेक्टरही असून, त्या समवेत या उपकरणाची किंमत १५० डॉलर आहे. सध्या हे उपकरण अमेरिका आणि कॅनडातच मिळत असून, लवकरच आशिया खंडातही येणार आहे. 

Maharashtra Times

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search