७/२३/२०१४

इस्त्राईल आणि पॅलेस्टिन संघर्षाचा शतकी इतिहास

इस्त्राईल आणि पॅलेस्टिनमध्ये सुरु असलेल्या संघर्षात पॅलेस्टिनमध्ये आतापर्यंत 550हून अधिक ठार झाले आहेत. गाझा पट्टीतल्या सुरु असलेल्या या संघर्षानं पुन्हा एकदा इस्त्राईल आणि पॅलेस्टिन यांच्यातील जुना वाद उफाळून आला आहे. त्यामुळं या दोन्ही देशातील संघर्षाचं मूळ कारण काय याची उत्सुकता आपल्यातील अनेकांना असेल. त्यामुळं या रक्तरंजित संघर्षाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.    

इस्त्राईल-पॅलेस्टिन संघर्षाची मूळे इतिहासात खोलवर दडलेली आहेत. शंभर वर्षाहून अधिक काळापासून या दोन्ही देशात वेळोवेळी युद्ध होत आलं आहे आणि दोन्ही देशातील शेकडो जणांचे बळी या संघर्षात गेले आहेत. 

इस्त्राईल-पॅलेस्टिन संघर्षाचा इतिहास :

1897 ते 1918 चा कालखंड :

यूरोपमधील ज्यू विरोधी वातावरण आणि छळाच्या पार्श्वभूमीवर 1897 मध्ये पहिल्या झिओनिस्ट काँग्रेसची बैठक स्विर्झलँडमधील बेसल येथे झाली. या बैठकीत ज्यूंसाठी पवित्र भूमी म्हणून श्रद्धास्थान असलेल्या पॅलेस्टिनमध्ये वसाहत उभारण्याचा निर्णय झाला. युरोपमधील 25 हजार ज्यू 1903पर्यंत पॅलेस्टिनमध्ये स्थायिक झाले. त्याकाळात ओटोमान राजवटीखाली जवळपास पाच लाख अरबांचे वास्तव्य तिथं होतं.

त्यानंतर 1904 ते 1914 या कालखंडात 40 हजार ज्यू नागरिक पॅलेस्टिनमध्ये स्थालंतरित झाले. त्याकाळात आजचा इस्त्राईल तसंच गाझा आणि वेस्ट बँक हे पॅलेस्टिनचा एक भाग होते. ब्रिटनने 1917 साली ज्यूंसाठी पॅलेस्टिनमध्ये हक्काचे स्थान निर्माण करण्याची घोषणा केली. यालाच बॅलफोर डिक्लेरेशन नावानं ओळखण्यात येतं. त्यानंतर पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर ब्रिटनने पॅलेस्टिनवर कब्जा केला.


1920 ते 1940 चा कालखंड :

या काळात अनेक ज्यूंनी युरोपमधून ब्रिटनच्या अधिपत्याखाली असलेल्या पॅलेस्टिनमध्ये स्थालंतर केलं. ब्रिटिश सर्वेक्षणानुसार 1922 साली पॅलेस्टिनमधील 7 लाख 50 हजार लोकसंख्येत ज्यूंच्या लोकसंख्येत अकरा टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यानंतरच्या पंधरा वर्षात तीन लाख स्थलांतरित पॅलेस्टिनमध्ये वास्तव्यासाठी आले. त्यानंतर ज्यू, अरब आणि ब्रिटिश पोलिस यांच्यात हिसंक चकमकी झडू लागल्या.

ब्रिटनने 1947 मध्ये हा वाद संयुक्त राष्ट्र संघात मांडला. जर्मनी आणि युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात ज्यूंच्या घुसखोरीनंतर मोठ्य़ा प्रमाणावर ज्यू पॅलेस्टिनमध्ये स्थलांतरित होऊ लागले. पॅलेस्टिननं संयुक्त राष्ट्र संघाचा विभाजनाचा प्रस्ताव धुडकावला. या योजनेनुसार पॅलेस्टिनच्या भूमीपैकी 56.47 टक्के अरब तर 43.53 टक्के ज्यू स्थलांतरितांनी देण्यात येणार होती. ब्रिटनननं 1948 साली पॅलेस्टिनमधून माघार घेतली.

पण त्याचवेळेस ज्यूंना अधिक प्रमाणावर तेथे वसवण्याचा अमेरिकेच्या दबावाचा त्यांनी विरोध केला. इस्त्राईल राष्ट्र अस्तित्वात आल्याची घोषणा 14 मे 1948 साली करण्यात आली. त्यानंतर हजारो अरबांनी लेबेनॉन, इजिप्त आणि वेस्ट बँकच्या दिशेने पलायन केले. जॉर्डन, इजिप्त, लेबेनॉन, सिरिया आणि इराक यांनी 16 मे रोजी इस्त्राईलवर आक्रमण केले.  पण त्यात त्यांना अपयश आले.


1960 ते 1970 चा कालखंड :

1967 साली सहा दिवस चाललेलं अरब- इस्त्राईली युद्ध भडकलं. त्यादरम्यान इस्त्राईलने इजिप्तच्या ताब्यातील गाझा आणि सिनाई, सिरियाच्या गोलन हाईटवर, तसंच जॉर्डनच्या वेस्ट बँकवर ताबा मिळवला. यासर अराफत यांच्या नेतृत्वाखाली पॅलेस्टिन लिबरेशन ऑरगनायझेश तसेच इतर पॅलेस्टिन गटांनी इस्त्राईलवर निकराचे हल्ले चढवले. अराफत 1977 साली पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र संघात उपस्थित राहिले आणि त्यांनी शांतता प्रस्थापित व्हावी असं आवाहन केलं.

इस्त्राईलमधील उजव्या विचारसरणीचा लिकूड पक्ष सत्तेत आला आणि त्यांनी वेस्ट बँक आणि गाझात अधिक वसाहतींची उभारणी सुरु केली. इस्त्राईल आणि इजिप्त यांच्यात 1979 साली शांततेचा करार झाला आणि इस्त्राईलने सिनाई प्रदेश इजिप्तला परत केला.


1980 ते 1990 चा कालखंड :

गाझा आणि वेस्ट बँकमध्ये 1987 साली इस्त्राईलच्या विरोधात उठाव झाला. या उठावात मोठ्य़ा प्रमाणावर दगडफेक, दंगल आणि बंद झाले. इस्त्राईलने त्याला दिलेल्या प्रत्यूत्तरात पॅलेस्टिनी जनतेला याच्या झळा मोठ्या प्रमाणावर सोसाव्या लागल्या. 1993 मध्ये ओस्लो शांतता करार अस्तित्वात आला. त्यानुसार इस्त्राईलने कब्जा केलेल्या वसाहती परत पॅलेस्टिनला देण्याच्या अटींवर इस्त्राईलला मान्यता देण्यास पॅलेस्टिनने संमती दिली.

पण इस्त्राईलमधील कट्टरपथीयांना हे मान्य झाले नाही आणि त्याचमुळे 1995 साली इस्त्राईलचे पंतप्रधान यितझॅक राबिन यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर 1996 साली उजव्या विचारसरणीचे बेंजामीन नेत्यानयाहू सत्तेत आले. नेत्यानयाहू यांनी ओस्लो कराराचे पालन न करत कब्जा केलेल्या प्रदेशात नव्या वसाहती उभारण्यावर असलेली बंदी उठवली. ओस्लो करारानुसार अंतिम ठरावाची मुदत 4 मे 1999 रोजी संपुष्टात आली. पण यासर अराफत यांनी पॅलेस्टिन राष्ट्राची घोषणा एकतर्फी करु नये यासाठी त्यांचे मन वळवण्यात आले.


2000 नंतरचा कालखंड :

इस्त्राईलचे परराष्ट्र मंत्री एरियल शेरॉन यांनी 2000 सालच्या सप्टेंबर महिन्यात जेरुसलेममधील अल अक्सा मशिदीला भेट दिली. या भेटीविरोधात पॅलेस्टिन जनतेने हिंसक बंड केले. एहूद बराक यांच्या जागी फेब्रुवारी 2001 मध्ये शेरॉन पंतप्रधानपदी विराजमान झाले. हमासच्या आत्मघातकी बॉम्बरने 2002 साली एका हॉटेलवर हल्ला चढवला त्यात 30 इस्त्राईली मृत्यूमुखी पडले. हा हल्ला ज्यूईश पासओव्हर हॉलिडेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर देताना इस्त्राईलने यासर अराफत राहत असलेल्या भागाला वेढा दिला त्यात ते पाच आठवडे अडकून पडले. वेस्ट बँकवर परत एकदा ताबा मिळवण्यासाठी इस्त्राईलने हजारो सैनिक आणि रणगाडे पाठवले.

अराफत यांचा नोव्हेंबर 2004 साली गुढ मृत्यू झाला. पॅलेस्टिन ऑथोरिटीच्या अध्यक्षपदी मोहम्मूद अब्बास यांची निवड झाली. त्याच वर्षी दोन्ही बाजूंचे हिंसाचार थांबवण्यावर एकमत झाले आणि इस्त्राईलने गाझा पट्टीतून माघार घेण्यास सुरवात केली. पॅलेस्टिनमध्ये जानेवारी 2006 साली निवडणुकीत पॅलेस्टिनिअन ऑथोरिटी (फतह)ला पराभूत करत हमासने विजय प्राप्त केला. फतह आणि हमास यांच्याती तणावानंतरच्या संघर्षात 100 अधिक लोकांचा बळी गेला.

इस्त्राईलने हमासला मान्यता देण्यास नकार दिला आणि पॅलेस्टिनवर निर्बंध लादले. हमास आणि इस्त्राईलने जून 2008मध्ये सहा महिन्यांच्या युद्धबंदीची घोषणा केली. पण वर्षाच्या अखेरीस गाझा पट्टीतून इस्त्राईलवर रॉकेटचा मारा करण्यात आला आणि इस्त्राईलने हवाईहल्ले करत त्याला प्रत्यूत्तर दिले. त्यानंतर मृतांचा आकडा वाढतच गेला. शांततेच्या बोलणी चालु असताना त्याला एप्रिल 2014 साली फतह आणि हमास यांच्या झालेल्या सलोख्याच्या करारामुळे खीळ बसली.


फतह आणि हमास यांच्यात निर्माण झालेल्या जवळीकीमुळे इस्त्राईली सरकार संतप्त झालं. या महिन्याच्या सुरवातीला एका बेपत्ता झालेल्या पॅलेस्टिन मुलाचा मृतदेह सापडला. त्या अगोदर एक दिवस जून महिन्यात वेस्ट बँकमध्ये गिर्यारोहणासाठी गेलेल्या तीन ज्यू तरुणांचे मृतदेह सापडले होते. या तिघांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर तणावात भर पडली. हमासने इस्त्राईलवर रॉकेट हल्ले चढवल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देत इस्त्राईलने हवाई हल्ले आणि पायदळाचे हल्ले अधिक तिव्र केले.

सध्याच्या संघर्षात आतापर्यंत शांततेची बोलणी करण्यास पॅलेस्टिनने नकार दिला आहे. या इस्त्राईल आणि पॅलेस्टिनच्या संघर्षाचा सर्वाधिक फटका पॅलेस्टिनलाच बसला आहे. कारण या सघर्षात आतापर्यंत 550 हून अधिक पॅलेस्टिनींचा बळी गेल्यानं सध्या दोन्ही बाजुंवर जागतिक दबाव वाढत चालला आहे.


ABP Majha




Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search