मुंबई: तृतीयपंथीयांच्या आयुष्यातील समस्यांना वाचा फोडणारा अन् त्यांना सन्मानाने जगायला शिकवणारा चित्रपट म्हणजे जयजयकार हा सिनेमा आहे. मात्र हा उपदेशाचा डोस नर्मविनोदी पद्धतीने देण्याचा पर्याय शंतनू रोडेने स्वीकारल्याचं आपल्याला जाणवतं.
कारण यापूर्वी मच्छिंद्र मोरेने लिहिलेलं जानेमन हे नाटक त्यांच्या आयुष्यावर एका वेगळ्या प्रकारे प्रकाश टाकणारं होतं. नकळत त्याची आठवण होते. कारण वामन केंद्रेंच्या दिग्दर्शनात उभा राहिलेला तो एक वेगळा प्रयोग होता, पण या सगळ्या गोष्टींचा कोलाज आपल्या मनात दाटून येतो.
पण जयजयकार हा चित्रपट नावावरून जरी आपल्याला क्रांतिकारी वगैरे वाटत असेला. तसेच त्यामधला विचार हा त्या पद्धतीचा असला, तरी आपल्याला तो वरपांगी नर्मविनोदी वाटला तरी तो अण्डरकरण्ट स्ट्राँग असलेला सिनेमा आहे.
आयुष्यात प्रॉब्लेम कोणाला नसतात, पण त्या प्रश्नांचा बाऊ करत बसायचं अन् येणारं जगणं आणखी बख्तर करणारी धारणा अंगी बाळगायची हे कुणी शिकवलंय. पण हात दगडाखाली असतात, त्यावेळी असणारी परिस्थिती अन् त्यावेळी प्रत्येकाचं व्यक्त होणं अन् तेही जर उदरनिर्वाहासाठी असेल अन् जर ती परिस्थिती आणखी बेदरकार होत असेल तर त्यामध्ये अगतिकतेची पराकोटी आपल्याला दिसत असते.
तृतीयपंथीयांच्या आयुष्याला लागलेलं शुक्लकाष्ठ काय अन् त्यांचे नेमके प्रश्न याकडे जयजयकार हा सिनेमा लक्ष वेधून घेतो. पण ज्यावेळी या सिनेमाच्या पहिल्या फ्रेममध्ये असणारे रिटायर्ड मेजर अखंड, म्हणजे दिलीप प्रभावळकर आपल्यासमोर त्यांच्या विक्षिप्तपणासह येतात, त्यावेळी त्यांचा मजेशीर स्वभाव, पण त्यांना असलेलं सामाजिक भान त्यांनी मरणाचं केलेलं नाटक अन् त्यामधून त्यांना सोसायटीचा प्रश्न सोडवण्यामागची त्यांची असलेली तळमळ आपल्याला दिसत असते.
पण त्या सगळ्यांमधून त्यांच्या आयुष्यात आलेले तृतीयपंथी लोक, त्यांनी त्यांच्या घरची अंगठी चोरणं. अन् त्यामधून त्यांनी त्यांचा पाठलाग करणं. ही गोष्ट काहीशी ताणलेली वाटते. पटकथेच्या फॉर्ममध्ये या सा-या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या तरी त्यामधील रंजकता ही काहीशी टप्प्याटप्प्याने कमी होत राहते.
या सा-या गोष्टी घडत राहताना त्यामधला प्रभावळकरांचा हट्टीपणा अन् त्यामधली स्वाभाविक कारणं ही काहीशी सिनेमाच्या एकूण गांभीर्याशी फारकत घेणारी वाटतात. कारण ती चोरलेली अंगठी लोखंडाची असणं अन् त्यामधला खडा हा मुलाच्या दुधाच्या दाताचा असणं. तरीही त्या अंगठीची होणारी चोरी अन् त्यासाठी असलेली त्यांची तगमग. त्यासाठी तृतीयपंथीयांच्या घराबाहेर तळ ठोकून असणं वा जिलेबीवाल्याच्या विस्तवातून हात भाजून अंगठी काढण्याचं दिव्य करणं, या सा-या गोष्टी काहीशा या लॉजिकल सिनेमामधल्या अनाकलनीय वाटत राहतात.
तृतीयपंथीयांना स्वत;च्या पायावर उभं करण्यासाठी मेजर अखंड यांनी रचलेला प्लॅन अन् त्याला यशस्वी करण्यासाठीची त्यांची आखणी या सा-या गोष्टींमुळे निश्चितच आपण त्यामध्ये गुंग होतो. पण या सिनेमामध्ये दिलीप प्रभावळकरांसारख्या कसलेल्या अभिनेत्याने स्वत:ला आजमावून पाहणं अन् त्यासाठी प्रयोग करण्याचा प्रयत्न आजही ते करतात, यामध्येच खरं तर वेगळेपण आहे.
सिनेमाचा आशय, विषय अन् त्याला असलेलं सामाजिक भान त्यामध्ये आपण असा प्रयोग होत असताना त्यामध्ये असावं, ही त्यांना वाटणारी गरज यामध्ये या सिनेमाचं बरचंसं शक्तीस्थान दड़लेलं आहे.
शंतनु रोडेने हा वेगळा विषय अन् तो मांडण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत प्रामाणिक आहे. पण त्याने त्या गावातील वयस्कर माणसांनी मेजर अखंड यांचा केलेला निषेध अन् त्यांचा तो ट्रॅक, काहीसा भरक़टलेला आहे, तो ट्रॅक करेक्ट केला असता अन् नंतर या सगळ्यांनी त्यांचा अचानक सत्कार करणं वगैरे ही औपचारिकता टाळली असती तर त्यामधली गंमत आणखीन वाढली असती.
चारही तृतीयपंथीयांपैकी एकाची बॅकस्टोरी आलीय. एकाच्या रडण्याचा अर्थ सांगता सांगता ते सारं काही राहून गेलंय, असं वाटत राहतं.
संजय कुलकर्णी ही या सिनेमात ज्या पद्धतीने वावरलाय ते पाहता त्याने बारकाईने केलेलं निरीक्षण अन् त्याचा अभ्यासू स्वभाव हा इथे कामी आल्याचं आपल्याला जाणवतं. या सिनेमात असणारा एक सहज, साधेपणा मग तो लोकेशनमध्ये दिसतो. त्यामध्ये गंमत जाणवते. सुहिता थत्ते यांनी साकारलेली मैत्रीण मनाला भावणारी आहे. भूषण बोरगांवकरचं वेगळेपणही अधोरेखित होतं.
मेजर अखंडना या चार तृतीयपंथीयांमध्ये पोटेन्शिअल जाणवणं अन् त्यांनी त्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवण्यासाठी संधी देणं ही महत्त्वाची बाब आहे. हा सोकॉल्ड पुढारलेल्या महाराष्ट्राला नव्हे तर देशासाठी एक वेगळा संदेश आहे. तसेच माझ्या गावाच्या रातीला कोणी चांदण गोंदलं बाई हे गाण वेगळं अन् चांगलं झालंय.
तृतीयपंथीयांना भीक मागण्यापासून प्रवृत्त करून त्यांच्या अंगभूत गुणांना न्याय देऊन वंचितांसाठी काहीतरी करू पाहणा-या लढवय्याची रंजक गोष्ट म्हणून जयजयकार पाहायला काहीच हरकत नाही. त्यामधला नर्मविनोदीपणा हे शक्तीस्थान वाटलं तरी उपदेशाचा डोसही काही प्रमाणात आहे. तो नाकारता येत नाही. पण तो प्रचारकी न होता महत्त्वाच्या प्रश्नाला हात घालतो, ही बाब महत्त्वाची.
प्रॉब्लेमवर लक्ष केंद्रित न करता त्याच्या सोल्युशनवर भाष्य करणारा हा सिनेमा असल्यामुळे त्याला देता येतील तीन स्टार.
टिप्पणी पोस्ट करा