अजय- अतुल.. मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या संगीताची भूरळ घालणारी संगीतकार जोडी. या जोडीनं मराठी सिने संगीताला एक नवी ओळख मिळवून दिली. नटरंग चित्रपटातील त्यांचं संगीत अनेक वर्ष मराठी कानसेनांच्या स्मरणात राहिल असंच.. फॅण्ड्री या चित्रपटातील एकमेव गाणंही अजय-अतुलनं तयार केलं आणि हे गाणंही प्रेक्षकांच्या थेट हृदयात उतरलं.
पण त्यानंतर काहीसे गायब झालेली ही जोडी पुन्हा एकदा एका नव्या नजराण्यासह तुमच्या भेटीला येते आहे. बऱ्याच दिवसांनतर अजय अतुल ही मराठी संगीतप्रेमींची लाडकी जोडी, आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी नवीन घेऊन आली आहे. सध्या हळुहळु राज्यात पंढरीपुरच्या वारीचा रंग चढू लागला आहे.
हाच वारी फिवर अजय-अतुलच्या आगामी चित्रपटात टिपण्यात आला आहे. या वारीच्या निमित्तानं प्रेक्षकांना पुन्हा एकदा अजय अतुलच्या संगीताची जादू अनुभवायला मिळणार आहे. रितेश देशमुख पहिल्यांदा मराठीत पदार्पण करत असलेल्या लय भारी या चित्रपटात अजय-अतुलचं 'माऊली-माऊली' हे गाणं सध्या सर्वांच्याच पसंतीला उतरतं आहे. त्यामुळं अनेक दिवसांपासून अजय-अतुलच्या संगीत ऐकण्यास आतूर झालेल्या संगीतप्रेमींसाठी अजय-अतुलनं वारीच्या निमित्तानं स्पेशल कम बॅक केलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा