रेल्वेच्या लोकल सेवेच्या मासिक पासामध्ये करण्यात आलेली 100 टक्के दरवाढ मागे घेण्यात आलीय. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, लांब पल्ल्यांच्या आणि लोकल सेवेमध्ये फक्त 14.2 टक्के एवढीच दरवाढ लागू राहणार आहे. त्यातही 10 टक्के सरसकट दरवाढ आणि 4.2 इंधन अधिभार अशी फोड असणार आहे. अर्थातच ही दरवाढ जे लोकल प्रवासी सेकंड क्लासने 80 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करतात त्यांच्यासाठी लागू नसेल.
म्हणजे सेकंड क्लासने आपल्या घराच्या जवळच्या स्टेशनपासून 80 किलोमीटरपर्यंत प्रवास करणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांच्या मासिक तसंच दैनंदिन कार्ड तिकीटात कसलाही फरक पडणार नाही.
तर फर्स्ट क्लासने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना फक्त 14.2 टक्के भाववाढ सोसावी लागणार आहे. त्यांच्यासाठी 80 किमीची सवलत लागू नसेल.
तसंच लोकलच्या मासिक पास आकारणीचा जुनाच फॉर्म्युला यापुढेही कायम राहणार आहे. म्हणजे 15 एकेरी प्रवास भाड्याच्या रकमेत जाण्या-येण्याचा महिनाभराचा मासिक पास मिळणार आहे. रेल्वेने भाववाढ जाहीर करताना जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, हा फॉर्म्युला बदलत 15 ऐवजी 30 एकेरी फेऱ्याची आकारणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुंबईतील पासधारकांना 100 टक्के दरवाढ सोसावी लागणार होती. मात्र ती रद्द करण्यात आली आहे.
मुंबई-ठाण्यातल्या भाजप खासदारांनी रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेतल्यानंतर रेल्वेने आपला निर्णय मागे घेतला. विरोधी पक्ष तसंच सर्वमासामान्य मुंबईकरांनीही या दरवाढीला मोठा विरोध केला होता.
सर्वात महत्वाची बातमी म्हणजे लोकलची प्रस्तावित दरवाढ ही आता 25 जूनच्या ऐवजी 28 जूनपासून लागू होणार आहे. त्यामुळे ही दरवाढ टाळण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पास काढण्याचा पवित्रा घेतला होता. गेल्या तीन दिवसांपासून दिवसरात्र लाखो पास काढण्यात आले होते.
ठळक वैशिष्ट्ये
लोकलच्या पासमध्ये जो 30 फेऱ्यांचां फॉर्म्युला वापरणार होते तो रद्द
आता सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लासच्या पासवर 14.2 टक्यांची वाढ
सेकंड क्लासच्या तिकीटावर 80 किलोमीटरपर्यंत दरवाढ नाही
त्याच्या पुढे 14.2 टक्के वाढ लागू होईल.
लोकलची ही दर वाढ 28 तारखेपासून लागू होईल.
याच्यामध्ये पासमधील जो फरक होता तो घेतला जाणार नाही. म्हणजेच ज्यांनी गेल्या तीन दिवसांत किंवा दरवाढ जाहीर झाल्यानंतर, सहामाही किंवा वार्षिक पास काढले आहेत, त्यांच्याकडून 14.2 टक्क्यांचा फरक वसूल केला जाणार नाही. म्हणजेच ज्यांनी पास काढला, ते फायद्यात आहेत.
पंरतु फस्ट क्लासच्या तिकीटावर पहिल्या स्टेशनपासून 14.2 टक्के दरवाढ लागू होईल.
लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर उद्या म्हणजे 25 तारखेपासून 14.2 दरवाढ लागू होईल.
| किमी. | जुना दर | प्रस्तावित वाढ | सुधारित दर (दरवाढ मागे घेतल्यानंतर) |
| पहिले 15 किमी | 85 रुपये | 150 रुपये | 100 रुपये |
| 16 ते 40 किमी | 160 रुपये | 300 रुपये | 185 रुपये |
| 41 ते 65 किमी | 235 रुपये | 450 रुपये | 270 रुपये |
| 70 किमी. | 235 रुपये | 450 रुपये | 270 रुपये |
| 75 ते 100 किमी | 310 रुपये | 600 रुपये | 355 रुपये |
| 100 ते 115 | 385 रुपये | 750 रुपये | 440 रुपये |
| 115 ते 130 | 385 रुपये | 900 रुपये | 440 रुपये |
टिप्पणी पोस्ट करा