६/२९/२०१४

पंढरपूरच्या विठ्ठलपूजेचे जातीयवादी मंत्र बदलण्याची मागणी

vithoba


'पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पूजेला जातीयवादी रंग चढवणारे मंत्र बदलावेत, अन्यथा आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना सरकारी महापूजा करू देणार नाही,' असा इशारा 'विठ्ठल रुक्मिणी मुक्ती आंदोलना'चे अध्यक्ष भारत पाटणकर यांनी दिला आहे.

पूजेवेळी ऋग्वेदातील जातीयवादी पुरुषसुक्त आणि स्त्रीसुक्त म्हणण्याने वारकरी सांप्रदाय आणि विठुरायाचा अपमान होत असून, त्याऐवजी संत तुकारामांचे मंगलचरण आणि संत ज्ञानेश्वरांचे पसायदान म्हटले जावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बडवे उत्पात हटविण्याचा दिलेल्या निर्णयानंतर देवाच्या पूजेच्या वेळी म्हटले जाणारे ऋग्वेदातील पुरुषसुक्त आणि स्त्री सुक्त म्हणण्यास पाटणकर यांनी विरोध दर्शविला आहे. हे सूक्त अत्यंत जातीभेद असणारे मंत्र असल्याने यामुळे वारकरी संप्रदाय आणि विठुरायाचा अपमान होत असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. याबाबत दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी याबाबत कायद्यात बदल करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र बडवे उत्पात यांना हटवून देखील बहुजनाच्या मुलांना पूजा करताना हे मंत्र म्हणून स्वतःचा अपमान करून घ्यावा लागत असल्याचे पाटणकर यांनी सांगितले.

पुरुष सुक्त आणि स्त्री सूक्ताच्या ऐवजी देवाच्या पूजेला तुकोबारायांचे मंगलचरण आणि ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान म्हणण्याची मागणी पाटणकर यांनी केली. वारकरी सांप्रदाय हा जातीभेद मानत नसल्याने हे जातीयवादी मंत्र तातडीने म्हणणे बंद करण्याबाबत कायद्यात सुधारणा करण्याचे आश्वासन असलेले लेखी पत्र मुख्यमंत्र्यांनी न दिल्यास त्यांना आषाढी च्या महापूजेस जाताना आम्हाला तुडवून जावे लागेल असा इशारा पाटणकर यांनी दिला. 

http://maharashtratimes.indiatimes.com/

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search