कोकणातील चाकरमान्यांना दाटीवाटीच्या आणि गर्दीच्या प्रवासातून दिलासा देण्यासाठी आता लवकरच या मार्गावर डबलडेकर रेल्वेगाडी धावणार आहे. या डबलडेकर गाडीला दहा प्रवासी डबे असतील आणि प्रत्येक डब्यातून १२० प्रवासी आपल्या गावी जाऊ शकतील. सध्या कोकण रेल्वेच्या हद्दीतील मडगाव ते कोलाड या स्थानकांदरम्यान या गाडीची व मार्गाची चाचणी होणे बाकी आहे. ही चाचणी मंगळवारी व बुधवारी होणार आहे. त्यामुळे कोकणातील प्रवाशांना लवकरच या आलिशान गाडीने प्रवास करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
कोकणात जाणाऱ्या मार्गावर चाचणी करण्यासाठी ही गाडी मध्य रेल्वेच्या हद्दीत लोकमान्य टिळक टर्मिनस ते रोहा या स्थानकांदरम्यान यशस्वीपणे धावली. त्यानंतर शनिवारी या गाडीने कोकण रेल्वेच्या हद्दीत कोलाड ते रत्नागिरी हा टप्पा पार केला. या चाचणीदरम्यान रिसर्च, डिझाइन अॅण्ड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनचे (आरडीएसओ) आणि कोकण रेल्वेचे अधिकारी उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवारी या अधिकाऱ्यांनी रत्नागिरी ते मडगाव या टप्प्यात या गाडीची चाचणी घेतली. ही चाचणी ११० किलोमीटर प्रतितास एवढय़ा वेगापर्यंत घेण्यात आली. चाचणीदरम्यान कोणताही अडथळा न आल्याचे कोकण रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
आता मंगळवारी ही गाडी मडगाव ते रत्नागिरी चालवण्यात येईल. या टप्प्यातील मार्गावर सर्व प्रकारे गाडीची आणि मार्गाची चाचणी घेण्यात येईल. बुधवारी ही चाचणी रत्नागिरी ते कोलाड या टप्प्यात पार पडेल. त्यानंतर मग मध्य रेल्वेच्या हद्दीत रोहा ते लोकमान्य टिळक टर्मिनस या दरम्यान ही गाडी धावेल. तसेच ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी ठाण्याहून चालवण्याचा विचार असल्याचे मध्य रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. याबाबत कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांना विचारले असता, त्यांनी चाचणीबाबत काही सांगण्यास नकार दिला. सध्या चाचणी चालू असून या चाचणीचे अहवाल आरडीएसओ कोकण रेल्वेला देईल. त्यानंतर मग रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी चाचणी करून हिरवा कंदील दाखविल्यानंतरच ही गाडी सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा