एके दिवशी अचानक माझ्या मेंदूच्या एका भागात
एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि……
त्या भागात साठवलेले सारे शब्द
वावटळीत सापडलेल्या कागदाच्या कपट्यांसारखे भिरभिरत
माझ्या सा-या शरीरभर पसरले
त्याच वेळी मला जाणीव झाली
'मला कविता होणार' याची
मी लगेचच पेन आणि कागद हातात घेतले.
भिरभिरणारे शब्द उजव्या हातातून निघून
पेनमधून झरझर कागदावर उमटू लागले.
शब्दाखाली शब्द ……….
ओळींखाली ओळी भरून गेल्या
माझ्या हातून खरोखरच एक कविता लिहीली गेली होती.
शांतपणे मी ते सारं वाचून काढलं
पण कहीच बोध होईना
बायकोला,मुलांना,शेजा-यांना,मित्रांना
जो भेटेल त्याला मी ते वाचायला दिलं .
वाचून झाल्यावर प्रत्येकाच्या चेह-यावर
मला एक प्रश्नचिन्ह दिसायचं!
माझी कविता त्यांना कळतच नव्हती
(मला तरी कुठं कळली होती?)
बिच्चारे! ते तरी काय करणार?
मी मग माझ्या एका कविमित्राला गाठले
तो पण असंच काहीतरी लिहून
"ही बघ माझी नवीन कविता" असं म्हणून
कधीकधी मला वाचायला द्यायचा
मला त्याने आपल्या कंपूत सामावून घेतले
तेव्हांपासून अधूनमधून लहर आली की
मी माझ्या मेंदूत
एक कमी दाबाचा पट्टा तयार करतो
आणि मग एक नवीन कविता जन्माला येते.
आता मी ख-या अर्थानं कवी झालोय.
मित्रांनो, तुम्हीही कवी होऊ शकता
फक्त तुमच्या मेंदूत कुठंतरी
एखादा कमी दाबाचा पट्टा तयार करा
तो कसा तयार करायचा
ते मात्र तुम्हीच बघा हं!