२/२०/२०१५

आम्ही लाजा विकल्या...????



आत्मसन्मान कधीचाच सोडून दिला,
शिवराय हे नाव स्वतःच्या गरजेपुरतेच वापरतो हे परत सिद्ध केलं आम्ही,
षंढपणाच्या पांघरुणात आम्ही सुखनैव निद्राधिन झालोय.
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आम्हाला कधीच पेललं नव्हतं आणि पुढेही ते पेलवणार नाहीच हे आता तरी जगजाहीर मान्य करूया.

"शिवाजी महाराज की जय" असं बेंबीच्या देठापासून तारस्वरात ओरडलं की आमचा आत्मा स्वर्गात पोहोंचतो.
महाराज माझ्या जातीचे, माझ्या धर्माचे म्हणून माझे आवडते, बाकी तसं राजांशी आमचं काही देणं घेणं नाही.
खरंच महाराजांना, त्यांच्या दूरदृष्टीला मानणारे आम्ही असतो तर ज्या राजाच्या नावाने आम्ही छाती फुगवतो, गाड्या रंगवतो, मिजाशी करतो, त्या राजाची राजधानी शिवतीर्थ रायगड अशी प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्याच्या खचात खितपत पडलेली असताना अन्न-पाणी तरी आमच्या घश्याखाली कसं उतरलं असतं.

मित्रहो हाच तो किल्ले रायगड ज्याने महाराजांच्या राज्याभिषेकाचे सारथ्य केले, पोलादी पंखाखाली स्वराज्य रक्षिलं, गडपती शिवछत्रपतींनी स्वतःचा चंदन देह ठेवला तोही ह्याच गडावर. स्वतःच्या कातड्याचं आवरण जरी रायगडला घातलं तरी त्यांचे उपकार फिटायचे नाहीत.
जगाच्या पाठीवर कुठेही असा राजा आणि त्यांची अशी बुलंद राजधानी असती तर तिथल्या लोकांनी ती सोन्याने मढवली असती.
आणि तुम्ही आम्ही असे कपाळकरंटे- कर्मदरिद्री.
आम्ही छातीठोक ओरडतो,
"महाराज, पुन्हा जन्माला या." म्हणून,
कश्याला यायचं परत महाराजांनी त्यांच्या प्राणप्रिय गडांची ही अशी विकलांग अवस्था पाहायला?
प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्यात भेसूर बनलेला रायगड टाहो फोडतोय "मला वाचवा" म्हणून.
साला आपणच षंढ झालोय,
नाहीतर रायगडावर दारू नेण्याची कोणा भ्याडाची हिम्मतच कशी झाली असती.

_________________________________
_________________________________

मागे रायगडी महाराजांच्या मूर्तीवर अंधार असतो म्हणून महाराष्ट्रभरातील काही शिवभक्त संघटनांनी मिळून आंदोलन छेडलेलं, एका दिवसात गडावर महाराजांच्या मूर्तीबाजूला विजेची सोय झाली, पण पुन्हा "पहिले पाढे पंचावन" अशी अवस्था झालीय. होळीच्या माळावरची मूर्ती परत अंधारात लोटली गेलीय.
केवढी ही हरामखोरी,
महाराजांच्या गडावर महाराजांनाच उपरं करतोय आपण.
महाराजांची समाधी अक्ख्या देशाचं शक्तीपीठ,
तिथला वीजपंप गेली कित्त्येक महिने बंद आहे, समाधीस्थळाभोवतीची सगळी हिरवळ केंव्हाच सुकून गेलीय.
आणि या उलट बाजारपेठेमागे हत्तीखाण्यात पुरातत्वखात्यातील ऑफिससमोर मात्र पाणी कायम खेळतं आहे. बाग बनवली जातेय तिथे. पंचतारांकित हॉटेल वाटावं असं ऑफिस बांधलंय गडावर. फरशीला रेड कार्पेट अंथरलीय, काचेचे विविध आकाराचे ग्लास ठेवलेत रायगडावर, कशाला म्हणून विचारल्यास सांगतात पाणी प्यायला. आता पाण्यात काय मिसळत असतील हे सांगायलाचं नको.
सगळा भोंगळ कारभार.
बिनदिक्कत प्लास्टिक कचरा जाळला जातो गडावर.

रोपवे तर शाप आहे रायगडाला लागलेला,
सगळी दारू तिकडूनच गडावर येते.
"तपासणी करा" म्हणून सांगितलं तर म्हणतात ते आमच्या हातात नाही. चार पैसे जास्त मिळावे म्हणून बिनदिक्कत गडावर दारू जाऊ दिली जाते.

शिव-सह्याद्री मित्रहो,
आता वेळ दडवून फायदा नाही.

आपल्यात थोडंही स्वत्व आणि महाराजांप्रती आदर शिल्लक असेल तर गटा-तटाचे राजकारण दूर लोटून सर्व ताकदीनिशी हे कार्य ऐरणीवर घ्यायला हवं.
_________________________________
_________________________________

पुरातत्व खात्याकडून नको तिथे नियम दाखवले जातात,
सरकारकडून नको तिथे पोलिस यंत्रणा ठेवली जाते. मग दोन पोलिस रोपवे जवळ का नसावेत?
तिथे पिशव्यांची तपासणी का होऊ नये?
रोप-वे सांभाळणाऱ्या संस्थेकडून रोप-वे मधून दारूची वाहतूक होणार नाही असं लेखी का घेतलं जाऊ नये?

_________________________________
_________________________________

मित्रहो परत एकदा ऐकीची वज्रमुठ आवळायची वेळ आली आहे.
ही छायाचित्र बिनदिक्कत वापरा,
सोशल मिडियावर वादळ उठवा,
यंत्रणेला धारेवर धरा,
भटक्यांनी या विषयावर ब्लॉग लिहा,
वार्ताहरांनी बातम्या द्या.
आता हा विषय असा हवेत सोडायचा नाही. याचा तुकडा पाडायचाच.
_________________________________
_________________________________



Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search