१२/०४/२०१४

ओएलएक्सवरून खरेदी करताय.. सावधान!



ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. घरबसल्या अनेक वस्तू खरेदी केल्या जात आहेत. पण, जुन्या वस्तू विकण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी तुम्ही ओएलएक्स या संकेतस्थळावरून वस्तू खरेदी करत असाल तर खबरदारी बाळगा! कारण या संकेतस्थळावर चोरीच्या वस्तू नोंदवून त्यांची विक्री केल्याचे प्रकार पुण्यात उघडकीस आले आहेत. त्यामुळे आपण खरेदी करत असलेली वस्तू चोरीची तर नाही ना, याची खात्री करा.
ओएलएक्स या संकेतस्थळावरून मोबाइल, वाहने, घरातील सर्वप्रकारच्या वापरलेल्या वस्तू खरेदी अथवा विक्री करता येऊ शकतात. त्यासाठी त्या वस्तूचा फोटो काढून ती वस्तू किती किमतीमध्ये विक्री करायची आहे ते टाकले जाते. त्याबरोबरच संपर्कासाठी मोबाइल क्रमांक दिला जातो. ज्या व्यक्तीला वस्तू आवडली असेल आणि ती खरेदी करायची असेल तर ती व्यक्ती संपर्क साधून वस्तू खरेदी करते. अलीकडे नागरिकांना जुन्या वस्तू हव्या असतील तर ओएलएक्सद्वारे खरेदी करण्याचा कल वाढला आहे. पण, या संकेतस्थळावर नोंद केलेल्या वस्तू खरेदी करताना काही जणांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे नागरिकांनी ओएलएक्सवरून वस्तू खरेदी करताना काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
वानवडी येथील योगेश भोगणे या तरुणाची अशाच पद्धतीने फसवणूक झाली आहे. ओएलएक्स संकेतस्थळावर मोटार विक्रीसाठी नोंदवण्यात आली होती. त्यानुसार योगेश याने संपर्क साधला असता त्या व्यक्तीने एका बँकेचे खाते देऊन त्यावर पैसे भरायला आणि त्याची पावती ईमेल करण्यास सांगितले. त्यानुसार योगेशने तीन लाख रुपये भरून पावती मेल केली. मात्र, त्याला मोटार मिळाली नाही. बिबवेवाडी येथील तरुणाची अशाच पद्धतीने फसवणूक झाली आहे. मोबाइल विक्रीची जाहिरात देऊन त्याने त्यानुसार पैसे भरले तरी मोबाइल न देता फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर, कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महाविद्यालयाच्या वसतिगृहातून विद्यार्थ्यांने चोरलेला टॅब ओएलएक्सवर टाकून विक्री केला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांला अटक केली आहे. त्याचबरोबर आणखी काही प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदी करताना सर्व गोष्टी पडताळूनच खरेदी करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.





Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search