१२/०१/२०१४

दोन्ही बाजूंनी कायम सामंजस्य दाखवले तर भारताची देशात व परदेशात प्रतिमा चांगली होण्यास वेळ लागणार नाही.प्रार्थनेच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्यातील तादात्म्य पावण्याचा संबंध महत्त्वाचा असतो. मंदिर, मस्जिद, चर्च ही फक्त प्रतीके आहेत. भारतात जसा राममंदिराच्या जागेचा मुद्दा वारंवार पुढे केला जातो, तसे अनेक ठिकाणी मंदिर व मस्जिद एकत्र असल्याचे चित्र मात्र फारसे दाखवले जात नाही. हजारो वर्षे गुण्यागोविंदाने नांदणार्या समाजात एखादी घटना विष पेरून जाते. परस्परांवरचा विश्वास उडून जातो. कालपर्यंत एकत्र असलेले एकमेकांचे गळे घोटायला निघतात. खरे तर रमजानमध्ये राम आहे आणि दीपावलीमध्ये अली आहे, हे कोणी लक्षातच घेत नाही. परस्पर सहचर्याने समाजाचा विकास होतो. एकीने असाध्य ते साध्य करता येते; परंतु या बाबी गौण ठरल्या आहेत. महापुरुषांच्या शिकवणींचे अनुकरण करण्याऐवजी त्यांच्या अस्मितांनाच भाले फुटायला लागले आहेत. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संघटना तसेच अन्य संघटनांच्या एका अहवालात भारतात दरवर्षी हिंदू-मुस्लिम दंगलीत १३१ जणांचे बळी जातात. मुझफ्फरनगरच्या हिंदू-मुस्लिम दंगलीचे पडसाद संपूर्ण उत्तर प्रदेशात उमटले होते. दंगलीच्या होरपळीवर स्वत:च्या फायद्याच्या पोळ्या भाजण्यात राजकीय पक्ष आणि समाजकंटकांना रस असतो. सामान्यांचे नुकसान होते. नुकसान भरून काढता येते; परंतु मनावर झालेल्या जखमा भरून काढता येत नाहीत. अयोध्येतील वादग्रस्त ढाचा पाडल्यानंतर देशभर विशेषत: मुंबईत झालेल्या दंगलीने दोन समाजांत निर्माण झालेली अविश्वासाची दरी बुजवायलाच कित्येक वर्षे लागली. मंदिर, मस्जिदीची विटंबना झाल्यानंतर राग येणे स्वाभाविक आहे. तो व्यक्तही झाला पाहिजे; परंतु तो व्यक्त करताना दुसर्या समाजांवर अविश्वास व्यक्त करण्याची किंवा शहरे, गावे पेटवून देण्याची आवश्यकता नसते. अयोध्येच्या घटनेनंतर एकीकडे मंदिर-मस्जिद मुद्दा गाजत असताना दुसरीकडे पुण्याजवळील घोरपडी येथे दोनशे वर्षांच्या मस्जिदीच्या भिंतीलगत मंदिर बांधण्यात आले. गावातील मुस्लिमांनी मंदिराच्या बांधकामात योगदान दिले. मुस्लिमांनी मंदिराचा पाया घातला. मंदिरातील आरतीमुळे मुस्लिमांना त्रास होत नाही आणि मस्जिदीतील नमाजामुळे हिंदूंच्या भावना दुखावत नाहीत. हिवरेबाजार या आदर्श गावात एकच मुस्लिम कुटुंब असताना गावाने या कुटुंबासाठी मस्जिद बांधून दिली. अशी उदाहरणे समाजात भरपूर असताना प्रसिद्धीमाध्यमेही त्याची फार दखल घेत नाहीत. विनोबा भावे यांच्या एका प्रवासाच्या वेळी त्यांच्यासमोरच्या बाकावर एक मुस्लिम व्यक्ती बसली होती. नमाजाची वेळ झाल्यानंतर दोन बाकांच्यामध्ये चादर अंथरून त्याने नमाज पठण केले, तर संध्याकाळच्या प्रार्थनेची वेळ झाल्यानंतर विनोबाजींनी प्रार्थना केली. दोघांनी धर्मपालन करताना परस्परांच्या धर्मांचा आदर केला. मंदिर, मस्जिदीत जायलाच हवे असे नाही, तर त्यासाठी योग्य जागा हवी, असाच त्या दोघांच्या कृतीचा अर्थ. देशात अविश्वासाचे, विद्रोहाचे, कलहाचे वातावरण असताना इराणी महिलांनी हनुमान मंदिरात नमाज केल्याच्या घटनेचा तरी दुसरा काय अर्थ आहे? आग्रा येथे ताजमहाल पाहायला आलेल्या इराणच्या दोन पर्यटक महिलांना नमाजाची वेळ झाल्यानंतर ती कोठे पठण करावी, असा प्रश्न पडला. त्यांना फारसीशिवाय अन्य भाषा येत नव्हती. नमाज कोठे पठण करायची, याचे उत्तर त्यांना मिळत नव्हते. इकडेतिकडे भटकत असलेल्या या दोन महिलांची अडचण मंदिराबाहेरच्या फूलविक्रेत्याच्या लक्षात आली. त्यानेही मागचा-पुढचा विचार न करता हनुमान मंदिराचे प्रांगण दाखवले. इराणच्या या दोन महिलांना मंदिरात नमाज पठण करता येईल, असे अजिबात वाटले नव्हते. फूलविक्रेत्याचाही धर्म आडवा आला नाही. महिलांनी नमाजासाठी खाली अंथरण्यास कागद मागितला. तोही या फूलविक्रेत्याने आनंदाने दिला. विशेष म्हणजे हनुमान मंदिराच्या पुजार्यानेही महिलांना मदत केली. त्याबाबत काहींनी शंका उपस्थित केल्यानंतर मंदिराचे पुजारी रामब्रज शास्त्री यांनी दिलेले उत्तर लक्षात घेण्यासारखे आहे. 'मंदिर सर्वांसाठी आहे. धर्माच्या नावावर मंदिरात येण्यास कोणालाही बंदी घालता येणार नाही. ईश्वर व अल्ला एकच आहे. त्यामुळे पूजा केली काय किंवा नमाज पठण केले काय, दोन्हींचा अर्थ सारखाच' हे त्यांचे उत्तर सर्वांनी हृदयात कोरून ठेवण्यासारखे आहे. देवबंद दारूम उलूम किंवा अन्य संस्थांच्या मौलानांनी जमीन व हेतू स्वच्छ असेल, तर कोठेही नमाज पठण करता येते, असे स्पष्ट केले आहे. दोन्ही बाजू कायम असे सामंजस्य दाखवत राहिल्या, तर भारताची देशात व परदेशात प्रतिमा चांगली होण्यास वेळ लागणार नाही.