मराठीत आता सिनेमाचं आधुनिक तंत्र चांगलंच रुजायला लागलंय याची खात्री या दोन सिनेमांकडे बघून पटेल. ‘विटीदांडू’ हा सिनेमा तर विकास कदमच्या क्रिएटिव्ह दिग्दर्शनाखाली बनलेला आहे. विकास कदम हा गुणी कलाकार गेली काही वर्षं रोहित शेट्टीसोबत काम करतोय. रोहित शेट्टीच्या सिनेमांचा पसारा खूप मोठा असतो, त्यामुळे विकासने लेखन-दिग्दर्शनाबरोबरच तांत्रिक बारकावेही जवळून पाहिलेत. याचाच प्रत्यय विटीदांडू बघतानाही येतो. मराठीचं बजेट तुलनेने कमी असतं हे लक्षात घेऊन काही स्टंट्स, स्पेशल इफेक्ट्स यांचं दर्शन सिनेमात घडतं.
या सगळ्यामुळे सिनेमाचा तांत्रिक दर्जा सुधारतो पण या सगळ्यातून जी गोष्ट सांगितली जातेय तिचा जीव छोटा असेल तर प्रेक्षक या तांत्रिक भुलभुलैय्याला फसत नाही, उलट कंटाळतो विटीदांडूबद्दल अगदी असंच घडू शकतं. गोष्ट नवीन आहे, पण गोष्ट सांगण्याची जी शैली आहे. त्यामध्ये अजून नावीन्य हवं होतं असं राहून राहून वाटतं. अनावश्यक गोष्टी टाळून सिनेमाची लांबीही आणखी कमी करता आली असती. सिनेमा दोन तासांचाच असला तरी बराच वेळ सुरू आहे असंही वाटतं ते यामुळेच.
विटीदांडूची गोष्ट आहे 1947 मधली…15 ऑगस्टला आपण स्वतंत्र झालो पण त्याआधी पंधरा दिवस जे वातावरण होतं त्या वातावरणात घडलेली ही गोष्ट आहे. कथा काल्पनिक आहे, पण देशप्रमाने ओतप्रोत भरलेली. तो काळच असा होता की जेव्हा बाहेरच्या जगात काय सुरू आहे हे कळण्यासाठी एखाद्या गावात तीन-चार दिवस जावे लागायचे. जुलूम जबरदस्ती करणारे इंग्रज अधिकारी, त्यांच्या चाकरीत असलेले आपलेच बांधव, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणांची बाजी लावणारे क्रांतिकारक आणि ब्रिटीशच कसे चांगले आहेत असा मतप्रवाह असलेले काही लोक…त्याकाळी प्रत्येक गावात किंवा शहरात हे असंच चित्र असायचं.या सर्व वातावरणाचा लहान मुलांवरही प्रभाव पडायचाच आणि हे सगळं विटीदांडूमध्ये बघायला मिळेल. सिनेमा सुरू झाल्यावर काही वेळातच पुढे काय होणार याचा अंदाज यायला लागतो. आधुनिक काळातले एक आजोबा आपल्या नातवाला एक गोष्ट सांगतायत अशी सुरुवात आहे आणि मग तिथून स्वातंत्र्यपूर्वकाळातील गोष्टीला सुरुवात होते.
दिलीप प्रभावळकर, बालकलाकार निशांत भावसार, विशेष भूमिकेतला अशोक समर्थ यांचा अभिनय ही सिनेमाची जमेची बाजू म्हणावी लागेल. निशांत भावसारचा चेहरा गोड आणि खट्याळ आहे. लहान वय असूनही आणि समोर दिग्गज कलाकार असतानाही त्याने अतिशय समजून काम केलेलं आहे. गेल्या वर्षी ‘नारबाची वाडी’ गाजवणारे दिलीप प्रभावळकर यांनी विटीदांडूमध्ये सुद्धा अभिनयाची कमालच केली आहे, मराठी कलाकार अभिनयात मागे नाहीत, आता आपण तंत्रातही मागे नाही, गरज आहे ती प्रेक्षकांना बांधून ठेवणार्या पटकथेची…ती गरज हा सिनेमा पुरवू शकत नाही…