१०/२१/२०१४

धनत्रयोदशी









आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे.

कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपला पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अश्या प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतो. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.

धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.


आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.



-http://www.marathimati.com/

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search