१०/२४/२०१४

दंगलीच्या पार्श्वभूमीवर घडणारी 'प्यारवाली लव्हस्टोरी'


दुनियादारी'चं संचित घेऊन उभी राहिलेली ही 'प्यारवाली लव्हस्टोरी' ही रोमॅण्टिक फिल्म आहे. जगणं आमूलाग्र बदलून टाकणाऱ्या सगळ्या लव्हस्टोरीजचा लसावि अन् मसावि काढला तर येणाऱ्या उत्तराचं फलित म्हणून आपल्याला 'प्यारवाली लव्हस्टोरी'कडे पाहता येईल. आपल्या मनावर हिंदी फिल्म्स त्यामधल्या लव्हस्टोरीजचा एक वेगळा पगडा आहे. त्या फिल्मी अंदाजातला दिलखेच नजारा आपल्याला मराठीत अनुभवायला मिळाला तर नेमका कसा असू शकेल. याच्या साऱ्या शक्याशक्यता आपल्याला 'प्यारवाली लव्हस्टोरी'मध्ये अनुभवायला मिळतात.

हा सिनेमा आपलं वेगळेपण अन् कसा हटके आहे, असं सांगण्याची कुठेही अॅक्यूट घाई करत नाही. हा सिनेमा व्यावसायिक मराठी सिनेमामधलं एक वेगळा पर्याय खुला करणारा ऑप्शन असेल. अर्थात कॅलक्युलेटेड रिस्कसकट घेतलेलं हे एक आव्हान आहे. संजय जाधवने ज्या पद्धतीने त्याच्या लाडक्या स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, उपेंद्र लिमये अन् ऊर्मिला कानेटकर कोठारे यांना प्रेझेण्ट केलंय तो दिलखेच अंदाज लुभावणारा आहे. जर एखाद्या फिल्ममध्ये एण्ट्री चित्रित करण्याचा जो अंदाज दाखवला आहे तो कमाल आहे. संजयच्या प्रत्येक फिल्ममधल्या कलाकारांच्या एण्ट्री आजही डीव्हीडी काढून तपासून पाहिलात तर तुम्हाला मी काय म्हणतोय हे तुम्हाला कळेल.

इथली प्रेमकथा म्हणून 'प्यारवाली'कडे पाहता येईलच, पण त्याला असलेला सोशिओ-पोलिटिकल बॅकड्रॉप. 1992 हे वर्षं म्हटलं की तत्कालीन राजकीय परिस्थिती. त्यावेळी अमर म्हणजे स्वप्नील अन् अलियाची म्हणजे सईची लव्हस्टोरी घडत असेल तर वातावरण कसं असू शकतं, याची कल्पना पुरती एव्हाना तुम्हाला आली असेल. त्यावेळचं चाळीतलं वातावरण, त्या काळात असणारा तो माहौल, चाळीच्या बाजूला असलेला मोहल्ला, तिथली अमानुल्ला चाळ, तिथलं मैत्रीचं सौहार्दपूर्ण वातावरण अन् त्या सगळ्याला दंगलीमध्ये लागलेल्या गालबोटाने नेमकं काय होतं, कशाप्रकारे भोवताल धुमसत असताना अमर अन् आलियाची ही लव्हस्टोरी कशाप्रकारे फुलत गेलीय, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

पूर्वार्ध हा खच्चाखच्च एण्टरटेन्मेण्टचं पॅकेज आहे. फुल ऑन एण्टरटेन्मेण्ट आहे. ज्या पद्धतीने हा भाग फुलत जातो तो इतका कमाल आहे, इथलं प्रत्येक पात्र आपल्या मनात घर करतं. चाळीतल्या साध्यासुध्या जगण्याचा तिथल्या अंदाजाचा तयार केलेला माहौल, आजच्या व्हॉट्स अॅप अन् फेसबुकवरच्या प्रेमाच्या आणाभाकांच्या कैक वर्षांपूर्वीचं प्रेमाची ही अभिव्यक्ती नेमकेपणाने टिपण्याचा संजयने केलेला प्रयत्न कमाल आहे. या सगळ्यामध्ये असलेला यारी दोस्तीचा माहौल उपेंद्र लिमये अन् समीर धर्माधिकारीमधला तो बॉण्ड. उपेंद्र अन् सईमधली केमिस्ट्री. समीर अन् ऊर्मिलाचं समीकरण इतकंच काय स्वप्नील अन् ऊर्मिलाच्या नात्याचा असलेला बंध या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने अधोरेखित केला आहे. ते पाहणं कमाल आहे.

इतकंच काय चाळीतल्या प्रेमापासून तिथल्या अंधचाचाच्या नजरेनं पाहणं, त्यांचा असलेलं व्हिजन हे ज्या पद्धतीने येतं ते कमाल आहे. समीर अन् ऊर्मिलाच्या लग्नाच्या वेळेस अख्खी चाळ मदत करायला येताना करण्यात येणारं आवाहन, हे कशाप्रकारचं आहे, ते पाहणं हा एक सोहळा आहे.

सई अन् स्वप्नीलमधला बॉण्ड आपण दुनियादारीमध्ये आपण पाहिलाय, अनुभवला आहे, ज्या पद्धतीने तो इथे अधोरेखित झाला आहे. त्या काळातला फिल्मीपणा, त्यामधली रंजकता, त्यावेळच्या प्रेमाच्या आणाभाका अन् त्यामध्ये येणारा मजहब, धर्म, त्या सगळ्याच्या पलीकडे नेण्यात आलिया अन् अमरला यश मिळालंय का, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

या सिनेमामध्ये मांडलेल्या समीकरणांना वेगळा रंग आहे. त्यामध्ये धर्म, वंश, राजकारण अन् समाजकारण यापेक्षा प्रेमाला असलेला रंग हा वेगळा अन् वरचढ आहे. हे सांगण्याचा केलेला प्रयत्न हा वाखाणण्याजोगा आहे. राजकीय अन् सामाजिक जाणिवा असणारा लेखक अरविंद जगताप याची असणारी गोष्ट. ही वरपांगी पाहता लव्हस्टोरी वाटली तरी त्याचे अण्डरकरण्ट्स हे अधिक गहिरे आहेत. पूर्वार्ध हा ज्या पद्धतीने रंजक केला आहे, तितकाच उत्तरार्ध हा रंजक अन् गहिरा झाला असता तर धमाल आली असती, पण अर्थात त्यामध्ये असणाऱ्या घटना अन् त्यांचा परिणाम हा निश्चित वेगळा आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी अन् त्यासाठी तुम्ही प्रेमात पडायला हवं. त्या प्रेमात नुसतं पडून नव्हे तर तुम्ही ते जगणं अनुभवायला हवं.

पण या सगळ्या माहौलात ते सगळं योग्य अयोग्याच्या पलीकडे असतं, पण तरीही या गोष्टीचा शेवट हा मनाला चटका लावणारा आहे. त्या सगळ्याला आणखी कलाटणी देता आली असती. कारण दंगल अन् त्याचे पडसाद उमटत असताना घडणाऱ्या प्रेमकथेमध्ये अधिक सघनता आली असती तर मजा आली असती, असं राहून राहून वाटतं. या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने आशिष पाथरेचे संवाद चुरचुरीतपणा आणतात ती गंमत आहे.

दिग्दर्शक म्हणून संजय जाधवचा असणारा अंदाज कमाल आहे. 'दुनियादारी'तला संजय अन् इथला संजय वेगळा आहे. त्यामध्ये दिसणाऱ्या संजयच्या स्टाइलमध्ये काहीसा फरक पडलाय अन् सकारात्मक अर्थाने पडायला ही हवा. पण या सिनेमाच्या पूर्वार्धातील पकड अन् क्लायमॅक्सचं गणित चटका लावणारं असलं तरी पुन्हा तपासून पाहायला हवं होतं, असं सारखं वाटतं.

त्यामधल्या एण्टरटेनिंग व्हॅल्यू वाढवण्याचं काम जे संजय जाधव करतो. त्याच्या पूर्वार्धात असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी मांडण्यातील गंमत लाजबाब आहे. चिन्मय मांडलेकरचा असलेला ट्रॅक वा उपेंद्र लिमयेच्या व्यक्तिरेखेमधील गंमत वा ऊर्मिलेच्या तोंडी असलेल्या शिव्या त्यांचा अंदाज दिलखेच आहे. चाळीतल्या व्यक्तिरेखा लाजबाब आहेत. ती चाळ उभी करण्यात, ती पात्रं आपल्या मनात घर करण्यात अन् अर्थात सई अन् स्वप्नीलच्या अंदाजातील लव्हस्टोरीमध्ये आपल्याला दिसणारी गंमत कमाल आहे. या सिनेमाचा असलेला जॉनर...लार्जर दॅन लाइफची मांडणी करण्याचा संजयला गवसलेला सूर कमाल आहे.

या सगळ्यामधला उपेंद्र लिमये हा आपल्या लक्षात राहतो. फुल ऑन फॉर्ममध्ये आहे. धग, यलो, गुरूपौर्णिमा अन् आता प्यारवाली लव्हस्टोरी यंदाचं वर्षं त्याने आपल्या कामामधील वैविध्य कमालीचं अधोरेखित केलं आहे. त्याची देहबोली, त्याचा नूर, त्याचा रोखून बघण्याचा अंदाज कमाल आहे. ऑथर बॅक नसूनही आपलं पात्र प्रेक्षकांच्या मनात घर कसं करेल, याचा त्याने दाखवलेला अंदाज कमाल आहे. इतकंच काय तर त्याच्या संवादफेकेत असलेला कादरचा अंदाज ए बयाँ कमाल आहे. त्यासोबत ऊर्मिला तिचा अंदाज. दिवसागणिक ही अभिनेत्री चकित करतेय असं काम करायला लागलीय. तिला या सिनेमात बघा अनुभवा मी काय म्हणतोय ते समजेल. ऊर्मिला या सिनेमातलं सरप्राइज पॅकेज आहे.

स्वप्नील जोशी, सुपरस्टार लव्हरबॉय...त्याच्या प्रेमातला अंदाज अगदी मुंबई पुणे मुंबईपासून ते दुनियादारीपर्यंतचा. इथला स्वप्नील हा मराठीतला शाहरूख बनण्याचा प्रयत्न करतोय, हे त्याच्या आविर्भावातून तुम्हाला जाणवेल, पण त्याची अन् सईची केमिस्ट्री, त्यांना गवसलेला सूर कमाल आहे. सई ताम्हणकर आपल्याला चकित करतेय. इथली अलिया, तिच्या बोलण्याचा वागण्याचा, तिचा नमाज पढतानाचा चेहरा, तुमच्या मनात नक्कीच राहील. प्रेमात आकंठ बुडाल्यानंतर वडिल नागेश भोसलेंसोबतचे तिचे संवाद, उपेंद्रसोबतची तिची केमिस्ट्री. मग दूध देण्यापासून ते टॅक्सीपर्यंतचा सिक्वेन्स कमालीचे वठलेले आहेत.

उत्तरार्धात मात्र त्या गोष्टींना मिळणाऱ्या कलाटणी नसत्या मिळाल्या तर चित्र काही वेगळं झालं असतं. यामधला नागेश भोसलेचा अंदाज. त्याचा शांत राहण्यात, त्याच्या रोखून बघण्यातला अंदाज कमाल आहे. चिन्मय मांडलेकरची छोटीशी असलेली व्यक्तिरेखा लक्षात राहते. उदय टिकेकरचा पॉलिटिकल अंदाज अगदी मोजकेच सीन्स असूनही लक्षात राहण्याजोगाच.

संगीत अमितराज, समीर सप्तिस्कर अन् पंकज पडघन या त्रिकूटाने पुन्हा कमाल केली आहे. कव्वाली असेल वा लग्नाचं हलदुले असेल वा शटर का तालासारखा राऊडी अंदाज, त्यांनी कमाल केली आहे. प्रसाद भेंडेचा कॅमेरा कमाल आहे. त्याच्या दृश्यचौकटीतून पाहणं नजाकतभरं आहे. या शिवाय व्हीएफएक्सची कमाल आहे. प्रेमात पडल्यावर वाजणारं व्हायोलिन. यह बात... आओ ना फिर... बादशाह नी बेगम.. हे वाक्प्रचार चर्चेत येण्याची शक्यता आहे. दंगलीच्या काळात प्रेमाचे सिक्वेन्सेस त्यामधला फिल्मीपणा थोडासा कमी करता आला असता तर आणखीन वास्तवदर्शी वाटलं असतं, पण हा सिनेमा प्यारवाली लव्हस्टोरी आहे. त्यामुळे संजयने नावातून ती ढाल पुढे केली आहे. त्यामुळे त्या फिल्मी मेलोड्रामाला संयतपणे वापरलं असतं तर असं एकदा मनात येऊन जातं.

या सिनेमाचा शेवट पुन्हा तपासून पाहायला हवा होता असं वाटतं. या सिनेमाचा असलेला अंदाज, त्याचं लार्जर दॅन लाइफ असणं, चटका लावणं, यासाठी पुन्हा प्रेमात पडण्यासाठी हा सिनेमा एकदा आवर्जून पाहायला हवा. हिंदीच्या तोडीस तोड हा सिनेमा झाला आहे. 


ABP Majha


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search