६/२८/२०१४

मान्सून बरसणार जुलै,ऑगस्टमध्ये

monsoon

राज्यात मान्सूनच्या आगमनाला झालेल्या उशिरानंतरही पावसाने दडीच मारल्याने राज्यात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. राज्यात आतापर्यंत जून महिन्याच्या सरासरीपेक्षा तब्बल ६० टक्क्यांहूनही कमी पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर जूनच्या उर्वरित चार दिवसांतही राज्यात जोरदार पावसाची शक्यता नसल्याने यंदाचा जून महिना कोरडाच ठरण्याची शक्यता आहे.

यंदाच्या मान्सूनवर 'एल निनो'चा प्रभाव असण्याची शक्यता आहे; तसेच यंदा सरासरीच्या ९३ टक्के पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर २५ जूनपर्यंत देशभरात सरासरीपेक्षा ४० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे; तर राज्यात सरासरीपेक्षा ६२ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे.

लांबलेला मान्सूनचा प्रवास, त्यानंतरही पावसाने मारलेली दडी, खोळंबलेल्या पेरण्या आणि धरणांमधील आटत चाललेल्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांचेच डोळे जोरदार पावसाकडे लागले आहेत. परंतु, जूनच्या उर्वरित चार दिवसांतही राज्यात कोठेही जोरदार पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. राज्यात बहुतांश ठिकाणी चांगला पूर्वमोसमी पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांचे काम हाती घेतले होते. त्यानंतर मात्र पावसाने ओढ दिल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. राज्यात खरिपाच्या फक्त दोन ते तीन टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे आधीच गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकटही उभे ठाकले आहे. दुसरीकडे राज्यातील धरणांमध्ये केवळ २० टक्के पाणीसाठा असल्याने राज्यावर अस्मानी संकटाची छाया आहे.

मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. त्या दरम्यान कोकण किनारपट्टीभागात जोरदार पाऊस झाला, तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आणि उर्वरित राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र राज्यात पावसाने दडी मारली असून, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे.

मान्सूनची सद्यस्थिती...

यंदा बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र ईशान्येकडे सरकल्याने आपल्याकडे फारसा पाऊस झालेला नाही.

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सध्या राज्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण कमी आहे. त्यातच बहुतांश भागात ढगाळ वातावरण नाही. एकूणच पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्याने राज्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे.

जूनअखेरपर्यंत वातावरण असेच राहणार असल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतरच पाऊसमान सुधारण्याची शक्यता आहे.

जुलैमध्ये सरासरीच्या ९३ टक्के, तर ऑगस्टमध्ये सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता आहे.

(डॉ. मेधा खोले, हवामान विभागाच्या उपमहासंचालिका यांनी दिलेली माहिती)

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search